डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आश्वासन

नाशिक : त्र्यंबकेश्वर देवस्थान विकासासाठी ३५ परवानग्या तांत्रिक बाबींमुळे केंद्रीय पुरातत्व विभागाकडे प्रलंबित आहेत. पंढपूरच्या धर्तीवर या देवस्थानची प्रलंबित विकासकामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी (दि. १५) येथे दिले.

डॉ. गोऱ्हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर आल्या असता त्यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थानला भेट दिली. त्यावेळी त्यांनी विश्वस्त आणि अधिकाऱ्यांकडून विकासकामांचा आढावा घेतला.
यावेळी झालेल्या बैठकीस इगतपुरीचे प्रांताधिकारी तेजस चव्हाण, मुख्याधिकारी संजय जाधव, नायब तहसीलदार सतीश निकम, देवस्थानचे विश्वस्त संतोष कदम, भूषण अडसरे, सत्यप्रिय शुक्ल, प्रशांत गायधनी, तृप्ती धारणे आदी उपस्थित होते.

केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या परवानग्या न मिळाल्याने देवस्थान अंतर्गत दुरुस्त्या, विकासकामे, प्रलंबित आहेत. केंद्रीय आणि राज्य पुरातत्त्व विभागासोबत चर्चा करून पंढरपूरच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वर देवस्थानची कामेही मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिले.

देवस्थान येथे स्वतंत्र घनकचरा व्यवस्थापन, घनकचरा प्रक्रिया करून पुनर्वापर तसेच सौरऊर्जा प्रकल्पाचा स्वतंत्र प्रस्ताव द्यावा, अशा सूचना त्यांनी प्रशासन आणि विश्वस्त मंडळास केल्या.

डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी त्र्यंबकेश्वराची आरती केली तसेच देवस्थानला ११ हजार रुपयांची देणगीही दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.