
डॉ. सदानंद मोरे यांच्या
हस्ते चित्रपटाचा मुहूर्त
पुणे : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या जीवनावर हिंदी चित्रपट येतो आहे. ‘संत तुकाराम’ या नावानेच येत असलेल्या या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच तुकोबारायांचे महाराजांचे वंशज आणि महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते पार पडला.
अभिनेता सुबोध भावे यात तुकोबारायांची भूमिका साकारणार असून त्याने याबाबत आपल्या फेसबुक पेजवर माहिती दिली आहे. “संत तुकाराम” या मी करत असलेल्या चित्रपटाचा मुहूर्त आज तुकाराम महाराजांचे वंशज आणि ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक सदानंद मोरे यांच्या हस्ते संपन्न झाला. चित्रपटाचे शूटिंग निर्विघ्न पणे होऊदे हीच तुकाराम महाराज आणि विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना🙏🙏🙏 राम कृष्ण हरी!” असे सुबोधने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. यासोबत त्याने मुहूर्ताचा आणि विठ्ठलरखुमाईच्या मूर्तींचा फोटो शेयर केला आहे.
या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन आदित्य ओम, तर पुरुषोत्तम स्टुडिओज आणि बी गौतम निर्मिती करत आहेत. या चित्रपटाबाबत आदित्य ओम म्हणाले, “तुकाराम महाराजांच्या भूमिकेसाठी योग्य अभिनेता शोधणं सोपं काम नव्हतं. संत तुकोबा हे काही केवळ पांडुरंगाच्या भक्तीत लीन झालेले संत नव्हते. ते बंडखोर समाजसुधारक होते. आपल्या अभंगांतून, कीर्तनातून त्यांनी समाजातील अनेक वाईट रूढी आणि परंपरांवर बोट ठेवलं. जातिव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं केलं.
त्यामुळं त्यांच्यावर चित्रपट करणं हे अवघड आहे. तसंच त्यांची भूमिका साकारणं हे आव्हानात्मक काम आहे. त्यामुळं सगळा विचार करूनच आम्ही सुबोध भावेची या भूमिकेसाठी निवड केली. या भूमिकेसाठी कलाकार म्हणून जो अभ्यास, शिस्त लागते, ती सुबोधकडे आहे.” मराठमोळा अभिनेता सुबोध भावे याने साकारलेल्या ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य: एक युगपुरुष’, ‘आणि ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ यांच्या भूमिका प्रचंड लोकप्रिय झाल्या. आता तो यानिमित्ताने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करतो आहे. त्यामुळे तो साकारत असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे.
१९३६ मध्ये ‘संत तुकाराम’ या मराठी सिनेमात विष्णुपंत पागनीस यांनी संत तुकाराम महाराजांची भूमिका केली होती. या भूमिकेमुळे ते घराघरांत पोहोचले. एवढेच नव्हे तर, संत तुकाराम महाराजांच्या वेषातील त्यांचे फोटोही लोकांनी तुकाराम महाराजांची प्रतिमा म्हणून आपल्या घरात लावले. या चित्रपटाने पागनीस यांच्या स्वतःच्या आयुष्यातही आमूलाग्र बदल झाला. उर्वरित आयुष्यातही ते ‘तुकोबा’मय होऊन गेले. दामले आणि फत्तेलाल यांनी दिग्दर्शन केलेल्या या सिनेमाची व्हेनिस येथे १९३७ मध्ये जागतिक चित्रपट महोत्सवात जगातील सर्वोत्कृष्ट तीन चित्रपटामध्ये निवड करून गौरविण्यात आले होते. हाच ‘संत तुकाराम’ चित्रपट प्रभातने १९४८ मध्ये हिंदीत डब करून पडद्यावर आणला होता.
उदय चित्र या संस्थेने १९६४ मध्ये ‘तुका झालासे कळस ‘ हा मराठी चित्रपट प्रदर्शित केला होता. राजा नेने यांनी तो दिग्दर्शित केला होता. तर कुमार दिघे आणि सुलोचना यांनी यात प्रमुख भूमिका केल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता.
‘महाभक्त तुकाराम’ नावाचा मूळ तमिळमध्ये बनलेला सिनेमा १९७४ मध्ये मराठीत डब होवून आला होता. यात ए. नागेश्वरराव यांनी तुकारामांची भूमिका साकारली होती, तर आवलीच्या भूमिकेत अंजली देवी होत्या. विशेष म्हणजे नंतर हिंदी सिनेमात सुपरस्टार झालेल्या श्रीदेवीने तुकाराम महाराजांच्या मुलीची भूमिका या चित्रपटात केली होती.
२००२ मध्ये ‘जगद्गुरू संत तुकाराम’ नावाचा चित्रपट आला होता. त्यात श्याम पाण्डेय यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. दिग्दर्शनही त्यांनीच केली होते. विशेष म्हणजे त्या चित्रपटात २१ गाणी होती. स्वप्नील बांदोडकर, रवींद्र साठे, साधना सरगम, त्यागराज खाडिलकर, स्मिता पाटील, चारूलता, डॉ. राहुल आदींनी ही गाणी गायली होती.
अलिकडच्या काळात मराठीत म्हणजे २०१२ मध्ये चंद्रकात कुलकर्णी दिग्दर्शित ‘तुकाराम’ हा चित्रपट आला. यात अभिनेता जितेंद्र जोशीने तुकाराम महाराजांची भूमिका साकारली. पागनिसांच्या ‘मवाळ’ तुकोबांपेक्षा या सिनेमातले तुकोबाराय ‘रोखठोक’ होते, असा अभिप्राय चित्रपट समीक्षकांनी दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर हिंदीतील संत तुकाराम महाराज कसे असतील, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.