विठ्ठलरुक्मिणी मंदिरासमोर भजन
पंढरपूर : कोरोनाच्या कारणास्तव गेल्या दोन वर्षांपासून श्री विठ्ठल रखुमाईचे चरणस्पर्श दर्शन बंद आहे. कोरोना संसर्ग कमी झाला तरी थेट दर्शन देण्याबाबत काही निर्णय होत नसल्याने वारकरी संप्रदायात प्रचंड नाराजीचा सूर आहे. वारकऱ्यांची ही भावना शासन दरबारी पोहच करण्यासाठी ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांनी शेकडो वारकऱ्यांसह श्री विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालून, भजन आणि आरती करून मंदिर व्यवस्थापनाला या मागणी बाबतचे निवेदन दिले.
कोरोनाचा देशभर संसर्ग वाढू लागल्याने, सरकारने निर्देश देण्यापूर्वी दक्षता म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व्यवस्थापनाने १७ मार्च २०२० रोजी मंदिर पूर्णपणे बंद केले.
२०२० गेले आता २०२२ आले, तरी देवाचे चरण स्पर्श दर्शन सुरू करण्यासाठी मंदिर व्यवस्थापन पुढाकार घेताना दिसत नाही. भाविकांतून नाराजीचा सूर आहे. देवाच्या पायावर डोके ठेवण्यासाठी भाविक आतूर झालेला आहे.
१७ मार्च २०२० ते २० मार्च २०२२ अखेर म्हणजे जवळपास दोन वर्षांचा कालावधी गेला.
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यातील म्हणजे १७ मार्च २०२० ते १५ ऑक्टोबर २०२० या कालावधी दरम्यान मंदिर पूर्ण बंद होते.
१६ ऑक्टोबर २०२० ते २० नोव्हेंबर २०२० या दरम्यान मंदिर उघडून देवाचे मुखदर्शन सुरू करण्यात आले.
पुन्हा २१ नोव्हेंबर २०२० ते १ डिसेंबर २०२० या कालावधीत कार्तिकी वारी असल्याने मंदिर पूर्णतः बंद करण्यात आले.
२ डिसेंबर २०२० ते २१ फेब्रुवारी २०२१ मंदिर सुरू राहिले, मात्र पुन्हा आषाढी वारीच्या निमित्ताने बंद करण्यात आले.
एकूण दोन वर्षांची परिस्थिती पाहता मंदिर सतत बंद करणे आणि केवळ मुखदर्शन सुरू ठेवणे हा दिनक्रम मंदिर समितीने राबविला आहे.
सरकारने निर्बंध घातल्याने मंदिर समितीने त्याची अंमलबजावणी केली. आता सरकारने सर्व त्या सवलती दिल्या आहेत. नुकतीच वारी देखील भरली. सर्व गर्दीची ठिकाणे सरकारने मोकळी केली. मग वारकरी भाविकांना देवापासून दूर का ठेवता? असा सवाल ह. भ. प. जोगदंड महाराज यांनी मंदिर समिती व्यवस्थापनाला केला आहे.
श्री विठ्ठल रखुमाईसह सर्व परिवार देवतांचे पदस्पर्श दर्शन त्वरित खुले करा, बंद केलेल्या नित्यपूजा, पाद्यपूजा अन चंदन उटी पूजा पुन्हा सुरू करा अशी आग्रही मागणी ह. भ. प. जोगदंड महाराजांनी दिला आहे. आजच्या या भजन आंदोलनात मोठ्या संख्येने आबालवृद्ध वारकरी सहभागी झाले होते.