मुंबई : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या ७२५ व्या वर्षानिमित्त आळंदीत त्यांच्या समाधीशेजारी असणाऱ्या पवित्र अजानवृक्षाची लागवड मुंबईतील राजभवन येथे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते नुकतीच करण्यात आली.
पर्यावरण व जैवविविधता अध्ययन, संरक्षण व संवर्धन या क्षेत्रात कार्य करणाऱ्या ‘बायोस्फिअर्स’ या संस्थेतर्फे वृक्षारोपण तसेच पर्यावरण रक्षणासंबंधी संबंधी माहिती पत्रकांच्या प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन राजभवनावर करण्यात आले होते.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते अजानवृक्ष, सुवर्ण पिंपळ आणि शमी या वृक्षांची शास्त्रीय माहिती देणाऱ्या माहितीपत्रांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच आळंदी येथील सुवर्ण पिंपळाचा बीज प्रसाद देखील उपस्थित लोकांना देण्यात आला. कार्यक्रमस्थळी जलसंवर्धन आणि जलसाक्षरता या विषयावरील लघुपटाचे प्रदर्शन करण्यात आले.
यावेळी राज्यपाल म्हणाले, भगवान श्रीकृष्णांनी संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिली, तर भगवान बुद्धांना बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले. तसेच स्थान संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीजवळ असलेल्या अजानवृक्षाचे आहे. आपल्या देशात तुळशीपासून तर वटवृक्षापर्यंत प्रत्येक झाडाला सांस्कृतिक महत्व आहे. वृक्षारोपण हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. वृक्षारोपण ही लोकचळवळ होऊन त्याद्वारे पर्यावरण रक्षणाचे कार्य केले जावे, असे आवाहन राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी केले.