मंदिरातील कामे महिनाअखेर पूर्ण

होऊन पदस्पर्श दर्शन होणार सुरू

पंढरपूर : गेले अनेक दिवस विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या वारकरी, भाविकांना आता विठुराया पावणार आहे. येत्या दोन जूनपासून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पायावर डोके ठेवून सर्वांना दर्शन घेता येणार आहे. गेले दीड महिना सुरू असलेले मंदिर संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम या महिनाअखेरीस पूर्ण होणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर संवर्धन कामांबाबत तसेच आषाढी यात्रा पूर्व नियोजनाबाबत मंदिर समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह. भ. प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ऍड. माधवी निगडे, ह. भ. प. प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह. भ. प. शिवाजीराव मोरे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, ठेकेदार रमेश येवले आणि सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

मंदिर संवर्धन आणि जीर्णोद्धाराचे काम सुरू असल्याने १५ मार्च पासून रोज पहाटे ५ ते सकाळी ११ वाजेपर्यंत देवाचे लांबूनच अर्थात मुखदर्शन सुरू आहे. तसेच मंदिराच्या बाहेर स्क्रीनवर विठुरायाच्या दर्शनाची सुविधा देण्यात आली आहे. त्याबाबत गहिनीनाथ महाराज म्हणाले, श्री विठ्ठल गाभारा आणि रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम मूर्ती संरक्षणास प्राधान्य देऊन करण्यात येत आहे. हे काम करत असताना काही कामे नव्याने निदर्शनास आली. या सर्व कामांसाठी ४५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागला आहे. तथापी ही कामे आता पूर्णत्वास येत असून, यामुळे पुढील अनेक वर्षे मंदिर मजबूत स्थितीत राहणार आहे.

मंदिराचे जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित ३० टक्के कामे आषाढी वारीआधी पूर्ण केली जाणार आहेत. आता आषाढी वारीनिमित्त विठुरायाचे पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. चैत्री वारीत म्हणजेच १५ ते २१ एप्रिल दरम्यान देवाचे मुखदर्शन दिवसभर सुरू होते. गाभाऱ्यात काम सुरू असताना विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीवर दगड, वाळू वगैरे उडू नये म्हणून मूर्तींभोवती बुलेटप्रुफ काच बसविण्यात आली आहे.

पुरातन असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला मूळ रुप मिळवून देण्यासाठी राज्यसरकारने सुमारे ७४ कोटी रुपयांचा मंदिर विकास आराखडा मंजूर केला आहे. पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली १५ मार्चपासून मंदिर संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. दोन जूनपासून भाविकांच्या शुभहस्ते पूजा देखील सुरू करण्यात येणार आहेत. बैठकीत आषाढी यात्रेच्या अनुषंगाने करावयाच्या नियोजनाचा आढावा घेऊन भाविकांना अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *