माऊलींना तोफांची सलामी;

रिंगण अन् थालीपीठ दही प्रसाद

पंढरपूर : अखेर मजल दरमजल करत विठुरायाच्या भेटीच्या ओढीने आपापल्या गावांहून निघालेल्या संतांच्या पालख्या आज (दि. ७) पंढरपूर तालुक्यात पोहोचल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत चौरंगीनाथ, संत चांगा वटेश्‍वर, संत गुलाबबाबा, संत नाथ महाराज, संत गवार शेठ लिंगायत वाणी संत गोरोबा काका, संत जगनाडे महाराज आदी पालख्यांचा समावेश आहे.

या पालख्यांचे माळशिरस तालुक्याच्या सीमेवर असलेल्या दसूर या गावी आगमन झाले. येथे माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर, नायब तहसीलदार तुषार देशमुख, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, सरपंच वंदना कागदे, उपसरपंच धनंजय वसुदेव सावंत पाटील यांच्यासह भाविकांनी तोफांची सलामी देवून संतांसह लाखो वैष्णवांना भावपूर्ण निरोप दिला. सायंकाळी संत ज्ञानदेव आणि संत सोपानकाका यांचा पालखी सोहळा भंडीशेगाव मुक्कामी, तर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिराची कुरोली मुक्कामी पोहोचला.

संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी वेळापूर येथे (दि. ६ जुलै) मुक्कामी आली, तेव्हापासून दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. गुरुवारी पहाटे संत ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यात माऊलींची विधीवत पूजा प्रमुख विश्वस्थ योगेश देसाई यांच्या हस्ते करण्यात आली आणि सकाळी साडेसहा वाजता हा सोहळा भंडीशेगाव मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.

ठाकूरबुवा येथे गोल रिंगण

सकाळी साडेआठ वाजता न्याहरी, रिंगण आणि विश्रांतीसाठी सोहळा ठाकूरबुवा येथे पोहोचला. ठाकूरबुवा येथील शेतात उघडेवाडी ग्रामस्थांनी रिंगण आखून घेतले होते. सरपंच चांद मुलाणी, उपसरपंच नितीन चौगुले, अजितसिंह माने देशमुख, सयाजी उघडे, पांडुरंग कदम यांच्यासह भाविकांनी माऊलीचे दर्शन घेतले. सकाळी साडेनऊ वाजता भोपळे दिंडीतील जरीपटक्याच्या ध्वजाने तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यानंतर शितोळे सरकार यांनी रिंगणाची पाहणी केली. १० वाजता अश्‍वांना धावण्यासाठी रिंगणात सोडण्यात आले. प्रथम स्वाराचा मोती आणि त्यापाठोपाठ माऊलींचा हिरा अश्‍वही धावण्यासाठी सज्ज झाला. माऊलीऽ माऊलीऽऽ नामाचा जयघोष सुरू झाला आणि या जयघोषातच दोन्ही अश्‍वांनी नेत्रदिपक दौड करीत लाखो भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडीत चार प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यानंतर अश्‍वांच्या टापाखालील माती भाळी लावण्यासाठी महिला, पुरूष भाविकांनी एकच गर्दी केली.

त्यानंतर दिंड्यामध्ये हुतूतू, हमामा, फुगडी आदी खेळ रंगले. चोपदारांनी उडीच्या कार्यक्रमासाठी दिंड्यांना निमंत्रण दिले. एक एक दिंडी टाळ, मृदंगाचा गजर करीत माऊलींच्या पालखीच्या कडेने गोलाकार बसू लागली. सर्व टाळकर्‍यांनी ।।ज्ञानबातुकाराम।। चा गजर सुरू केला. त्याला मृदुंग वादकांनी जोरदार साथ दिली. आसमंत व्यापून टाकणाऱ्या नादब्रह्माचा सोहळा सुरू झाला. पाहता पाहता हजारो वारकरी यामध्ये रंगून गेले. पंढरपूर समीप आल्याने वारकर्‍यांमध्ये उत्साह संचारला होता. सर्वजण आनंदात बुडून रिंगणात तल्लीन झाले होते.

तोंडले-बोंडले येथे तोफांची सलामी

न्याहरीनंतर सकाळी ११ वाजता माऊलींची पालखी ठाकूरबुवा मंदिरात आणण्यात आली. माऊलींच्या पादुका ठाकूरबुवांच्या समाधीवर ठेवण्यात आल्या. तेथे विधीवत पूजा करण्यात आली. पूजेनंतर दुपारी साडेबारा वाजता हा सोहळा बोंडले येथे पोहोचला.
तेथे सरपंच विजयराव देशमुख, उपसरपंच महेंद्र लोंढे यांच्यासह ग्रामस्थांनी माऊलींच्या सोहळ्याचे स्वागत केले आणि तोफांची सलामी दिली. येथे माऊलींची पालखी रथातून उतरवून खांद्यावर घेण्यात आली. ती तोंडले गावाच्या दिशेने नेण्यात आली. दरवर्षी तोंडले गावात जाताना नंदाच्या ओढ्याला पाणी असते. या पाण्यात माऊलींचा पालखी सोहळा ओलाचिंब केला जातो. आता नंदाच्या ओढ्यावर पूल बांधण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सोहळ्यावर गुलाब पाण्याचे शिंपण करण्यासाठी शॉवरची व्यवस्था केली होती. या गुलाब पाण्याने माऊलींना जलाभिषेक घालण्यात आला. तोंडले गावचे सरपंच भिकाजी लोंढे, उपसरपंच सुहास निकम यांच्यासह ग्रामस्थांनी माऊलींना तोफांची सलामी आणि पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करून सोहळ्याचे स्वागत केले. याठिकाणी दुपारचा नैवेद्य आणि विश्रांतीसाठी सोहळा विसावला.

घ्यारे भोकरे भाकरी…

नंदाच्या ओढ्यावर आपल्या गोपालांसमवेत श्रीकृष्णाने गोपाळकाला केल्याची आख्यायिका सांगितली जाते. हीच परंपरा पुढे चालू ठेवत गेल्या शेकडो वर्षांपासून येथे दिंड्यांना थालीपीठ, दही, विविध प्रकारच्या चटण्या, उसळ, माडगं, भाकरी, भात, लोणचे अशा प्रकारची शिदोरी तोंडले-बोंडले परिसरासह तांदुळवाडी, शेंडेचिंच, माळखांबी, दसूर, खळवे आदी भागातील गावकरी घेवून येतात. या वर्षीही वारकऱ्यांनी मोठ्या आनंदाने या शिदोरीचा आस्वाद घेतला. वासकरांच्या दिंडीतील वारकर्‍यांनीही या शिदोरीचा आस्वाद घेतला.

रंगला बंधू भेटीचा सोहळा

राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने पालखी मार्गाचे चौपदरीकरण केल्याने आज संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत सोपानदेव महाराज या पालखी सोहळ्यांमध्ये समन्वय होऊ शकला नाही. त्यामुळे बंधू भेटीचा सोहळा सावंतवाडी-दसूर येथे होण्याऐवजी तो दसूरपाटी येथे झाला. तोंडले-बोंडले मुक्कामानंतर संत तुकाराम महाराजांचा सोहळा डावीकडून उजवीकडे, तर संत ज्ञानेश्वर माउलींचा सोहळा उजवीकडून डावीकडे गेल्याने रस्ता मोठा असूनही पालखी मार्गावर प्रचंड गर्दी झाली. दसूर पाटी येथे पोलिसांनी संत तुकाराम महाराज यांचा सोहळा उजवीकडून डावीकडे, तर संत ज्ञानेश्वर माऊलींचा सोहळा डावीकडून उजवीकडे घेतला . त्याचवेळी रिमझिम पावसाला सुरुवात झाली. या पावसातच संत सोपानदेव पाठीमागून माऊलींजवळ पोहोचले आणि सावंतवाडी येथे होणारा बंधू भेटीचा सोहळा दसूरपाटी येथे झाला. यावेळी ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’चा जयघोष झाला . दोन्ही संस्थानांनी एकमेकांना श्रीफळ भेट देऊन संतांचे दर्शन घेतले. श्रीमंत उर्जितसिंह शितोळे, महादजीराजे शितोळे, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी संत सोपानदेवांचे दर्शन घेतले.


पंढरपूर तालुक्यात प्रवेश
बंधू भेटीनंतर सायंकाळी संत ज्ञानदेव आणि संत सोपानकाका यांचा पालखी सोहळा भंडीशेगाव मुक्कामी, तर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिराची कुरोली मुक्कामी पोहोचला. उद्या (दि. ८) संतांचे पालखी सोहळे शेवटच्या वाखरी मुक्कामासाठी मार्गस्थ होतील. संत ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यात बाजीराव विहीर येथे उभे आणि गोल रिंगण होईल, तर संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात उभे रिंगण होईल.

(फोटो : आशुतोष कोळी, शकुर तांबोळी, अकलूज)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *