देवस्थानच्या निधीबद्दल कृतज्ञता
पंढरपूर : नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात पंढरपूर देवस्थान विकासासाठी ७३ कोटी ८० लक्ष रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला. या निधीसाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाठपुरावा केला होता. त्याबद्दल पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने पुण्यात डॉ. गोऱ्हे यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.
देवस्थान समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि समिती सदस्य संभाजी शिंदे यांनी डॉ. गोऱ्हे यांचा पुण्यातील निवासस्थानी जाऊन सत्कार केलायावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्या माधवी निगडे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, “देवस्थानला मदत मिळवून देण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी अनेक बैठका घेतल्या. पुरातत्त्व विभाग आणि सरकारी यंत्रणा यांची यशस्वी सांगड घातली. सरकारकडे निधीसाठी सतत पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आणि देवस्थानला ७३ कोटी ८० लाखांचा घसघशीत निधी मिळाला. त्याबद्दल देवस्थानतर्फे आम्ही त्यांचे जाहीर आभार मानत आहोत.”
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या “निधीच्या विनियोग प्रक्रियेबाबत देवस्थानने लवकर कार्यवाही सुरू करावी. राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. नगरपालिका, जिल्ह्यातील मान्यवर व्यक्ती, पत्रकार आणि भाविकांसोबत नियमित संवाद सुरू करावा. यामुळे सर्वांच्या भावना लक्षात घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात.”
महाराष्ट्रातील भाविक, वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार पंढरपूर येथे भाविकांसाठी उद्यान, संतपीठ सुरू करणे आदींबाबत योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासनही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिले.
शेकडो वर्षांपूर्वी उभारलेले पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर हे वास्तूकलेचा उत्कृष्ठ नमुना आहे. त्याचे मूळ रुपात जतन व्हावे यासाठी मंदिर समितीने आराखडा तयार केला आहे. तो विचारात घेऊन भारतीय पुरातत्व खात्याने मंदिराची पाहणी करुन आराखड्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर या आराखड्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आणि त्यासाठी निधीची तरतूद केली.
काळाच्या ओघात या पुरातन मंदिरातमध्ये अनेक बदल झाले आहेत. तसेच या पुरातन मंदिराला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत.
कोरोनाकाळात मंदिराचे उत्पन्नही घटले होते. त्यामुळे मंदिर समितीने राज्य सरकारकडे निधीची मागणी केली होती. आराखड्यानुसार विठ्ठल मंदिर आणि सभामंडप, रुक्मिणी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, नामदेव पायरी आणि नगारखाना, पडसाळी, स्माल टेंम्पल, विनायक मंदिर, व्यंकटेश मंदिर, टेन्साईल वर्क, दर्शनबारी, स्ट्रक्चरल ऑडीट, वॉटर सप्लाय आणि ड्रेनेज, इलेक्ट्रीकल वर्क, साऊंड सिस्टीम, फायर फायटींग सिस्टीम, लक्ष्मण पाटील देवस्थान, अंबाबाई मंदिर, श्री रोकडोबा मंदिर, श्री सोमेश्वर मंदिर, श्री विठ्ठल मंदिर सभामंडप सागवाणी काम आणि इतर देवतांच्या मंदिराचा विकास केला जाणार आहे.