दर्शन देऊन ताटकळलेल्या
विठुरखुमाईची प्रक्षाळ पूजा
आषाढी वारीसाठी आलेल्या भाविकांना दर्शन देण्यासाठी अहोरात्र उभ्या असणाऱ्या पंढरीच्या विठुरायाला आजपासून (दि. १८ जुलै) विश्रांती मिळणार आहे. देवाचा शीण आणि थकवा घालविणाऱ्या प्रक्षाळ पूजेची आजपासून सुरुवात झाली आहे. भल्या पहाटेच विठुरायाच्या चरणाला लिंबू आणि साखर चोळून ठेवण्यात आली. त्यानंतर संपूर्ण मंदिर धुवून साफ करण्यात आले. दुपारी देवाच्या प्रक्षाळ पूजेस सुरुवात झाली. प्रक्षाळपूजेनंतर श्री विठ्ठल रखुमाई पारंपरिक दागिन्यांमध्ये सजले आहेत.
– अभय जगताप
यात्रा काळात देवाचा पलंग काढतात. म्हणजेच यात्रेच्या पंधरा दिवसांमध्ये देवाचे दैनंदिन नित्योपचार बंद असतात. यात्रेनंतर प्रक्षाळपूजे पासून सर्व नित्योपचार पुन्हा सुरू केले जातात. त्यानुसार सोमवारी (दि. १८ जुलै) सकाळी देवाच्या शयनगृहात पलंग ठेवण्यात आला. देवाच्या चरणांचा शिणवटा काढण्यासाठी भाविकांनी लिंबू साखर लावली. मूर्तीच्या पायांची झीज होवू नये म्हणून गेल्या १५ वर्षांपासून चरणांवर चांदीचे कवच ठेवले जाते. त्यावरच भाविकांनी लिंबू साखर लावली. दुपारी बारा वाजता प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी विठ्ठलास पहिले गरम पाण्याचे स्नान घातले. तर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दुसरे गरम पाण्याचे स्नान घालून श्री विठ्ठल व रूक्मिणीस दुधाचा अभिषेक करण्यात आला. यानंतर देवास आकर्षक दागिने परिधान करण्यात आले. प्रक्षाळपूजे निमित्त केलेली फुलांची सजावट आणि देवाने परिधान केलेले दागिने पाहण्यासाठी भाविकांनी सायंकाळी मंदिरात गर्दी केली होती.
आषाढी वारीमध्ये देवाचे दर्शन सलग २२-२३ तास सुरू असते. भाविकांना अधिक काळ दर्शन मिळावे म्हणून या काळात देवाची शेजारती, निद्रा, धुपारती, पोशाख हे सर्व उपचार बंद असतात. वारी संपल्यावर वद्य पंचमीच्या सुमारास प्रक्षाळपूजा होऊन हे उपचार पुन्हा सुरू करतात. प्रक्षाळ पूजेमध्ये मंदिराची स्वच्छता आणि देवाचा शिणवटा दूर करणे असे दोन भाग आहेत. एकादशी नंतर साधारण दहा दिवसांनी पंचमीच्या सुमारास प्रक्षाळ पूजा होते.
जागर
प्रक्षाळ पूजेच्या आदल्या रात्री म्हणजे काल रात्री देवाच्या मागे दिलेला लोड काढून ठेवला गेला. रात्री देवाच्या सर्वांगास तेल लावले गेले. सर्व मंदिर परिसर धुऊन स्वच्छ केला गेला. रात्री देवापुढे सोळखांबी मंडपामध्ये चवरे महाराजांच्या फडाचे सुमारे पाच तास जागराचे भजन झाले. पूर्वी हे भजन रात्री अकरा ते पहाटे चार वाजेपर्यंत होई. आता संध्याकाळी सहा ते रात्री दहापर्यंत भजन होते. या भजनामध्ये वीणा अरणकरांकडे असतो.
लिंबू-साखर
प्रक्षाळ पूजेच्या दिवशी सकाळपासून विठ्ठल, रुक्मिणी माता व अन्य परिवार देवतांना भाविक लिंबू-साखर लावतात. अलिकडील काळात मूर्तीची झीज होऊ नये म्हणून पायावर चांदीचे कवच ठेवून लिंबू व साखर लावले जाते.
पहिले पाणी
सकाळी साधारण अकराच्या सुमारास लिंबू साखर लावणे बंद करून देवाला स्नान घातले जाते यास पहिले पाणी असे म्हणतात. यावेळेस देवाच्या डोक्यावरून पंचा पांघरून त्यावरून गरम पाण्याने देवास स्नान घालतात. रुक्मिणी मातेकडे पहिले पाणी होत नाही. यानंतर काही स्थानिक भाविकांचे नैवेद्य यायला सुरुवात होते. वास्तविक बघता मुख्य नैवेद्य दुसऱ्या स्नानानंतर येतात पण काही भाविक पहिल्या पाण्यानंतर नैवेद्य आणण्यास सुरुवात करतात. पहिले पाणी झाल्यावर देवास पूर्ण पोशाख करत नाहीत. फक्त पांढरे सुती धोतर नेसवून, अंगावर पंचा पांघरतात. यानंतर पुन्हा दर्शन आणि लिंबू साखर लावणे सुरू होते.
दुसरे पाणी
दुपारी तीनच्या सुमारास दुसरे पाणी होते. यावेळेस पांडुरंगाला रुद्रभिषेक आणि रुक्मिणी मातेस पवमान अभिषेक करतात. अभिषेकावेळी देवावर गाईच्या शिंगामधून दुग्धाभिषेक केला जातो. त्यानंतर देवाला गरम पाण्याने स्नान घालतात. यावेळेस देवाच्या अंगावरील पाणी आपल्या अंगावर पडावे म्हणून पुजारी आणि इतर सेवाधारी यामध्ये सहभागी होतात. पूर्वी बडवे, उत्पात आणि सेवाधारी मंडळी मंदिरातच देवासह स्नान करत.
पोषाख आणि अलंकार
अभिषेक झाल्यावर देवास आणि रूक्मिणी मातेस भरजरी पोषाख, अलंकार घातले जातात. यानंतर मुख्य नैवेद्य आणि आरती होते. साधारण संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही पूजा पूर्ण होते. यानंतर पूर्वी स्थानिक ब्राह्मणांचे पुरणाचे नैवेद्य येत. पुरणपोळी साखर भात आणि इतर गोड पदार्थ नैवेद्यात असत. ब्राह्मणेतर लोक पेढे आणि दूध आणतात.
औषधी काढ्याचा नैवेद्य
प्रक्षाळ पूजेनंतर देवाचे बंद केलेले सर्व उपचार पुन्हा सुरू करतात. संध्याकाळी धुपारती होते. देवाचा पलंग पुन्हा शेजघरात ठेवला जातो. श्रमपरिहारार्थ शेजारतीच्या वेळेस औषधी काढ्याचा नैवेद्य दाखवतात. तुळस, गवती चहा, आले, ओवा, बडीशेप, जेष्ठ मध, जायफळ, काळी मिरी, गूळ वगैरे औषधी वनस्पती वापरुन हा काढा बनवण्यात येतो. प्रक्षाळ पूजेनिमित्त मंडपात फुलांची आरास करतात. विठ्ठल मंदिरात चातुर्मासानिमित्त होणारे कार्यक्रम प्रक्षाळ पूजा झाल्यावर सुरू होतात