दोन वर्षांनंतर होणार उत्सव

२० लाखांवर होणार गर्दी

अयोध्या : गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालावधीच्या खंडानंतर आज श्रीराम प्रभूंची जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथे श्रीराम नवमी अर्थात श्रीराम जन्माचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. जवळपास २० लाख लोक आजच्या या उत्सवात सहभागी होत आहेत. या उत्सवासाठी उत्तर प्रदेश सरकारने मोठी तयारी केली आहे. या उत्सवाचे पहिल्यांदाच दूरदर्शन आणि रेडिओवरून थेट प्रसारण करण्यात येणार आहे. यूट्यूबवरही हे प्रसारण होणार आहे. त्यामुळे देश आणि जगभरातील भाविकांना अयोध्येतील रामलल्लाचे घरबसल्या दर्शन होणार आहे.

रामनवमीच्या सोहळ्यासाठी अयोध्येत हायवेपासून ते मंदिरापर्यंत दीडशे होर्डिंग्ज आणि २०० स्टँडी लावण्यात आल्या आहेत. रामनवनिमित्त आठ कलापथके तुलसी उद्यान, भजन संध्यास्थळ, गुप्तारघाट, दिगंबर आखाडा, वाल्मिकी भवन, दिगंबर जैन मंदिर, गांधी आश्रम आदी ठिकाणी भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत आहेत. याशिवाय ११ एलईडी डिस्प्ले बोर्ड आणि एलईडी व्हॅनमधूनही सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रसारण केले जात आहे. गेली दोन वर्षे बंद असलेले रामलीला कार्यक्रमही पुन्हा सुरू झाले आहेत. या रामलीला पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

रामलल्लासमोर ११ फुटी अगरबत्ती
अयोध्येतील यंदाच्या रामनवमीचे विशेष आकर्षण म्हणजे रामलल्लासमोर लावण्यात आलेली ११ फूट लांबीची आणि ६ इंच रुंदीची भलीमोठी अगरबत्ती. ही अगरबत्ती ४ दिवस जळत राहील आणि तिचा सुगंध दूरपर्यंत दरवळत राहील. सोमनाथवरून आलेले एक रामभक्त विपुल भाई यांनी ही अगरबत्ती आणली असून त्यांनी ती राम जन्मभूमी ट्रस्टकडे सुपूर्द केली आहे. ही अगरबत्ती बनविण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागल्याचे विपुल भाई यांनी सांगितले. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर अयोध्येतील प्रस्तावित राम मंदिर उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. फेब्रुवारीत मंदिराच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे. येत्या जून महिन्यापासून गर्भगृहाच्या बांधकामाला सुरुवात होईल. २०२४च्या जानेवारी महिन्यानंतर गर्भगृहात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजाअर्चा सुरू होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *