ज्ञानबा-तुकाराम या दोन नावांमध्ये सामावली आहे, समता, बंधुता आणि मानवता पेरणारी संत मांदियाळी. या सर्व संतांनी मानवतेच्या विचारांचं मंदिर उभारलं. या मंदिरावर कळस चढवला तो जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी. तुकोबा म्हणजे साऱ्या मराठी संस्कृतीचा बा!

तुकोबारायांनी आपल्याला बोलायला, नैतिकतेनं वागायला, जगायला शिकवलं. शेतकरी, गोरगरीब, उपेक्षितांसाठी उभं राहायला शिकवलं. स्वतःकडील सावकारीची गहाणखतं इंद्रायणीत सोडून शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी करणाऱ्या या महाकवीनं आधुनिक जगाला करुणेचा मार्ग दाखविला.
आपल्यालाही तुकोबारायांच्या मार्गावरून दोन पावलं चालता यावं, म्हणून त्यांच्या सहवासात, त्यांच्याच तपोभूमीत म्हणजे चाकणजवळील भामचंद्र डोंगरावर दरवर्षी १ जानेवारीला नवीन वर्ष साजरं करण्याचा पायंडा आम्ही पाडला आहे.
याच उपक्रमाचा एक भाग आणि आपल्या वारकरी परंपरेचं जतन करावं, या उद्देशानं आम्ही यंदा

।।ज्ञानबातुकाराम।। या वार्षिक अंकाची सुरुवात केली आहे.

१ जानेवारी २०२२ रोजी या वार्षिकाचा पहिला ‘बा तुकाराम’ नावाचा संत तुकाराम महाराज विशेषांक संत तुकाराम महाराजांचे थेट वंशज आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रकाशित झाला.
या विशेषांकातून आपलं जगणं व्यापून उरलेल्या तुकोबारायांना समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
हा विशेषांक ‘अमेझॉन’ आणि ‘फ्लिपकार्ट’वर उपलब्ध आहे.

https://dl.flipkart.com/dl/product/p/itme?pid=RBKGAJVY3HFMEXA8&lid=LSTRBKGAJVY3HFMEXA8WMPLGA।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *