रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन
पुढील दोन दिवस राहणार बंद
पंढरपूर : पंढरपुरातील मंदिरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली रुक्मिणी मातेच्या मूर्तीवरील वज्रलेपाची प्रक्रिया आज (दि. १२) दुपारी पूर्ण झाली. या वज्रलेपानंतर देवीचे चरण पूर्ववत झाले आहेत.
नित्योपचार आणि पदस्पर्शदर्शन बंद
या रासायनिक लेपनानंतर पुढील दोन दिवस श्री रुक्मिणी मातेचे नित्योपचार आणि पदस्पर्श दर्शन बंद राहणार आहे. काही दिवसांपूर्वी रूक्मिणी मातेच्या पायावरील वज्रलेप निघाल्याचे निदर्शनास आले होते. त्यावर भाविकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्याची दखल घेत मूर्ती संवर्धनाबाबत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संभाजीनगर येथील पुरात्त्व विभाग आणि मंदिरे समितीला सूचना दिल्या होत्या.
लेपनास लागले १२ तास
याबाबत बैठका होऊन आषाढी वारीपूर्वी वज्रलेपाचे काम पूर्ण करण्याचे ठरले होते. त्यानुसार शनिवारी रात्री ११ वाजता लेपन प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. आज (दि. १२) दुपारी दोन वाजेपर्यंत लेपनाचे काम सुरू होते. या प्रक्रियेला जवळपास १२ तासांचा अवधी लागला. औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी श्रीकांत मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ही वज्रलेप प्रक्रिया पार पडली. रुक्मिणी मातेच्या चरणांची झालेली झीज व मंदिर समितीने केलेले दुर्लक्ष या बाबीमुळे भक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. वज्रलेपाबाबत माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर डॉ. गोऱ्हे यांनी पंढरपुरात जाऊन पाहणी केली होती. तसेच तातडीने गाठत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार श्री रुक्मिणी मातेच्या चरणावर ‘इफोक्सी सिलिकॉन’ लेप करण्यात आल्याचे पुरातत्त्व विभागाचे श्रीकांत मिश्रा आणि मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
मातेच्या चरणांची काळजी घ्या
रुक्मिणी मातेची मूर्ती शाळीग्राम दगडाची आहे. या मूर्तीवर वज्रलेप दोन ते चार वर्षेच टिकतो. सध्या इफोक्सीचे सिलिकॉन लेपन करण्यात आले आहे. पदस्पर्शदर्शन, मूर्तीला होणारे नित्योपचार पाणी, दही, दूध, मध याचे प्रमाण मंदिर समितीने कमी करून नित्यपचार करावेत. रुक्मिणी मातेच्या चरणावर केलेला वज्रलेप जास्त दिवस राहील. मंदिर समितीच्या कर्मचारी पुजारी व्यक्तीने रुक्मिणी मातेच्या चरणाला कोणत्याही प्रकारची इजा, धका लागू नये याची काळजी घ्यावी, अशा सूचना पुरातत्त्व विभागाचे श्रीकांत मिश्रा यांनी केल्या आहेत.