नृसिंहवाडीत कृष्णेच्या पाण्याने
केला ‘श्रीं’च्या पादुकांना स्पर्श
नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दक्षिणद्वार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून कृष्णा नदीच्या पाण्याने मंगळवारी (दि. १२ जुलै) पहाटे तीन वाजता मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केला. श्रींच्या पादुकांना स्पर्श करीत मंदिराच्या दक्षिणद्वारातून पाणी बाहेर पडले. यावेळी कृष्णा नदीत स्नान करण्यासाठी शेकडो भाविकांनी हजेरी लावली.
नृसिंहवाडी येथे कृष्णा नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. यावेळी उत्तरेकडून वाहणारे पाणी श्रींच्या स्वयंभू चरण कमलावरून दक्षिण द्वारातून बाहेर पडते. यावेळी शेकडो भाविक चरण कमलावरील कृष्णामाईच्या पाण्याच्या पवित्र स्नानाचा लाभ घेऊन कृतार्थ होतात, यालाच दक्षिण द्वार सोहळा म्हटले जाते. यावेळी मंदिरातील देव परमपूज्य नारायण स्वामी यांच्या मंदिरात आणण्यात आले.
आजपासून मुख्य दत्त मंदिरात होणारी महापूजा तसेच अन्य कार्यक्रम श्रींच्या उत्सव मूर्तीवर होणार आहेत. नित्य श्रींच्या उत्सव मूर्तीची आकर्षक फुलमाळांची सजावट सेवेकरी संजय रुके पुजारी यांच्याकडून केली जाणार आहे. पहाटे काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत सर्व देवस्थानचे नित्य कार्यक्रम पूज्य नारायण स्वामी महाराज यांच्या मंदिरातच पार पडणार आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त येथे विविध उत्सव साजरे होत आहेत.
असा असतो दक्षिणद्वार सोहळा
मुळात श्री नृसिंहवाडी हा भाग कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेला येतो. या संपूर्ण परिसरात पावसाचे प्रमाण तसे कमीच असते. कारण कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडून जसे पूर्वेकडे जावे, तसा पाऊस कमी कमी होत जातो. पण उत्तरेकडून येणारे कृष्णा-वेण्णा नदीचे आणि कोल्हापूरकडून, म्हणजे पश्चिमेकडून येणारे पंचगंगा नदीचे पाणी, या दोन्ही (प्रत्यक्षात सात) नद्यांचे पाणी नद्यांना पूर आला की श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या मुख्य मंदिरात येते. साक्षात कृष्णावेणी माता महाराजांना भेटण्यासाठी येते.
पाणी मंदिराच्या उत्तरद्वारातून पादुकांवर जाते आणि ते तीर्थ मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर येते. दक्षिणद्वारातून येणाऱ्या पाण्यात बुडी मारून ‘तीर्थस्नान’ करण्यासाठी, या दुर्मिळ घटनेचा अलभ्य लाभ घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी होते. यासाठी दत्त भक्त दूरवरून येत असतात. हा सोहळा दर वर्षी होतो.
पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या काळात कधी तीन वेळा, तर कधी पाच वेळाही महाराजांच्या पावलांना नदीने चरण स्पर्श करण्याचा हा सोहळा होतो. यालाच ‘दक्षिणद्वार सोहळा’ असे म्हणतात. पाणी जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत नृसिंह सरस्वती महाराजांच्या, नारायण स्वामींच्या मंदिरातील उत्सव मूर्तीची दैनंदिन पूजा केली जाते आणि पादुकांवर अभिषेक केला जातो.