इतर पालख्यांचे व्हावे वार्तांकन,

वारीत थांबावं राजकीय प्रमोशन

वारी कव्हर केल्यानंतर काही गोष्टी मला तीव्रतेनं जाणवल्या. त्या म्हणजे, वारीला पॉलिटीकली आणि प्रमोशनली कव्हर करणं आपण थांबवलं पाहिजे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यासोबतच इतर संतांच्या पालख्यांचीही मीडियानं दखल घेतली पाहिजे. घरदार सोडून वारीसोबत दिवस दिवस ड्युटी करणाऱ्या पोलिसांना न्याय दिला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे ‘परतवारी’ही आवर्जून कव्हर केली पाहिजे…

सिद्धेश सावंत

२०१७ हे आयुष्यातलं एक असं वर्ष आहे, ज्यावर्षी दोन नव्या गोष्टी घडल्या. पहिली – एप्रिलमध्ये लग्न झालं. आणि दुसरी – अर्थातच ‘एबीपी माझा’तर्फे वारी कव्हर करण्याची संधी मिळाली. चालत-बिलत, वारकऱ्यांसोबत किंवा पाऊल खेळत, रिंगण कधी प्रत्यक्ष पाहिलं किंवा अनुभवलं नव्हतं. ते यंदा अनुभवलं. आहा… भारावून टाकणारा प्रवास…

कोऱ्या मनानं जावं वारीला

वारीला जायचंच आहे, हे कळल्यानंतर दोघा-तिघांना फोन फिरवले. वारीविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सगळेजण वारीबद्दल भरभरुन सांगत होते. ज्यांना फोन केले त्यांच्याशी माझं बोलणं झालंच नाही. त्यांच्यामार्फत माझ्याशी फक्त वारीचा प्रभाव बोलत होता. नंतर असं वाटलं कुणालाच फोन करायला नको होता. कदाचित काहीच माहिती घेतली नसती, तर सगळं नवं नवं दिसलं असतं.

वारी दिसायला एकदम भारी दिसते. फोटोतली वारी किती देखणी आहे, हे सांगायला संत साहित्याचा अभ्यास असलेल्या जाणकाराची गरज थोडीच लागते. ‘माझा विठ्ठल माझी वारी’च्या निमित्तानं खूप माणसं सतत समोर आली. या संपूर्ण वारीमध्ये रिपोर्टर अशी ओळख लपवून अस्सल काही सापडतंय का, याचा शोध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कितपत जमला? पांडुरंगालाच ठाऊक.

प्रमोशन थांबलं पाहिजे

अनेक चुका वारीत आम्ही केल्या. वारी कव्हर करणं आणि नुसती वारी करणं, यात फरक आहे. अनेकदा पालखी आमच्या पुढे निघून गेली. अनेकदा आम्ही पालखीतल्या परंपरा कव्हर करु शकलो नाही. अनेकदा राजकीय व्यक्तिमत्वांना आम्ही वारीत गाठू शकलो नाही. कामाचा भाग म्हणून या बाबी चुकल्या, याचं दुःख वाटलं. पण वैयक्तिक विचाराल तर अजिबात नाही. वारीला पॉलिटीकली आणि प्रमोशनली कव्हर करणं आपण थांबवलं पाहिजे, असं मनोमन उगाचच वाटत राहतं. पण वारीचा पीआर आता जोरात आहे. तो थांबवण्यासाठी आता पांडुरंगालाच कमरेवरचे हात झटकावे लागलीत. असो.

एक पत्रकार म्हणून माझं हे एक प्रांजळ मत आहे. कदाचित ते चुकीचंही असेल. पण महाराष्ट्राला वारीचं खूप कौतुक आहे. कौतुकापेक्षाही कुतूहल जरा अतीच आहे. मीडिया वारीला खूप महत्व देत आलाय.. सदैव देत राहिलही. द्यायलाही हवंच! पण मराठी माध्यमं वारीचं वार्तांकन करण्याऐवजी वारीचं प्रमोशनच करतायेत की काय? हा प्रश्न मला अस्वस्थ करत राहतो. बरं नाही केलं वार्तांकन आणि फक्त वारीचं प्रमोशनच केलं, तरी त्यात काय चुकलं? याचंही उत्तर मला सापडलेलं नाही. विचारमंथन पांडुरंगासोबत सुरुच आहे.

बाकीच्या पालख्या कधी कव्हर होणार?

प्रश्न अनेक आहेत. वारीमध्ये तुकोबांची पालखी आणि ज्ञानोबा माऊलींची पालखी या दोन्ही पालखींचा मार्ग जसा वेगळा आहे. तसा या दोन्ही पालखींमधला माहौलदेखील वेगळाच आहे. पण या दोन्ही पालख्यांना सेलिब्रिटी पालखीचा दर्जा मिळालाय, हे कुणीच नाकारु शकत नाही. संत निवृत्तीनाथ, संत सोपानकाका, संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत नामदेव इत्यादी असंख्य संतांच्या पालख्यांची हवी तितकी दखल अजूनपर्यंत घेतली का गेली नाही, याचं कारणंही उमजत नाही. दरम्यान वारीच्या सोहळ्यात पालखी प्रमुख, चोपदार, सोहळा प्रमुख यांच्यावर खूप दडपण असतं. पण त्यांच्याहीपेक्षा सगळ्यात जास्त दडपण असतं, ते पोलिसांवरच.

पोलीसच खरा पांडुरंग

वारीत सगळ्यात जास्त हाल कुणाचे होत असतील, तर ते पोलिसांचे. नाव न सांगण्याच्या अटीवरुन अनेक पोलिस कर्मचारी वारीबद्दल ऑफ द रेकॉर्ड बोलतात. वारीच्या काळात वाहतुकीचे तीन-तेरा वाजलेले असतात. १२ तास उभं राहून शिफ्ट करणं म्हणजे खायचं काम असतं का? त्यात जेवणाचा पत्ता नाही. पाणी टँकरचं. ते कसं असेल माहित नाही. शिफ्ट संपली की तास दोन तास ट्रॅफिकमध्ये अडकायचं. त्यानंतर घर गाठायचं. झोपायचं कधी? उठायचं कधी? पुन्हा पालखी जिथे असेल तिथं हजर व्हायचं कधी? बापरे. किती हाल आणि कष्ट. हा पोलीस माऊलीच खरा पांडुरंग नाही, तर कोणंय? तुम्हीच सांगा.

गेली पाच-सहा वर्ष अनेक पोलिस कर्मचारी अशा प्रकारे वारीत ड्युटी करतायेत. त्यांना घर नसेल का? बायका-पोरं नसतील का? सोलापूर, सातारा, पुणे अशा तीनही जिल्ह्यांमधल्या पोलिसांना वारीची स्पेशल ड्युटी लावली जाते. त्यांचं वार्तांकन कुणी करु शकणार आहे का? त्यांची बातमी कुणी देऊ शकणार आहे का? हा प्रश्न अस्वस्थ करतो.

वारीचा मूळ गाभा कायम राहावा

वारीचं गुणगान आपण गातो. गायलाच हवं. शंकाच नाही. पण वारीत दिसणारी माणसं जरा निरखून बघा. चेहऱ्यावर सुरकुत्या, पायाला भेगा, माथ्यावर गंध, झिजलेल्या चपला, अंगावर सफेद कपडे.. असं साधारण चित्रंय. हा कष्टकऱ्यांचा उत्सव आहे. कितीही प्रमोशन वाले आले, तरी त्यांना हा वारकऱ्यांचा इव्हेंट टेकओव्हर करता येण्यासारखा नाही. बहुतांश प्रमाणात मुंबईच्या दहीहंड आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचं जे झालेलंय, त्यापासून वारी बरीच लांबय. वर्षानुवर्ष इतकं सगळं बदललं. पण वारीतली माणसं बदलली नाहीत. ती अजूनही तशीच आहेत. नेमकं या चित्रातनं आपण काय बोध घ्यायचा? वेळेनुसार सगळं बदलतं. आता मोबाईल फोन आले वारकऱ्यांच्या हातात. व्हॉट्सअप ग्रुप आलेत. फोरजीची साथ वारकऱ्यांसोबत आहे. पण वारीच्या मूळ गाभा अजूनही आहे तसाच आहे. समृद्ध करणारा.

वारीत आपण स्वतःच शिकत जातो

वारी खूप शिकवते का? तर अजिबात नाही. वारीत आल्यानंतर माणूस स्वतःच स्वतःचं शिकत जातो. घडत जातो. उलगडत जातो. समृद्ध होत जातो. हा अनुभव शब्दांत उलगडण्यासारखा आहे का? मुळीच नाही. वारीत आलेल्या सगळ्यांना ‘माऊली’च म्हणा, असा काही नियम नसतो. मग तरी सगळे माऊली कसे होऊन जातात? याला वारीची जादू म्हणतात. वारीत आपण सगळ्यांमध्ये मिसळतो. अभंग, आनंद, उर्जा, आचार-विचार, तत्वज्ञान या सगळ्याचं आदानप्रदान करतो. वारी दुनियादारीही तितक्याच आत्मीयतेने शिकवून जाते. नकळतपणे!

परत वारी कव्हर व्हावी

‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा गजर करत पंढरपुरात दाखल होतो. चंद्रभागेत स्नान करतो. विठूमाऊलींचं दर्शन घेतो. आणि सुरु होते परतीची वारी. इथून पुन्हा पहिले पाढे पंचावन्न सुरु होतात का?.. हे जाणून घेण्यासाठी माध्यमांनी परतीची वारीसुद्धा अवश्य कव्हर केली पाहिजे. एकदा ही वारीही कव्हर करायला कुणीतरी पाठवावं. पांडुरंगाचे आशीर्वाद असतील, तर तो योगही जुळून येईल. बाकी वारी काय आपल्या जन्माच्या शेकडो वर्ष आधीपासून सुरू आहे… आणि सुरुच राहिल.. पण या सगळ्यात आपण आपला विठ्ठल शोधू शकलो नाही, तर वारी करण्याला अर्थ तरी काय उरला?

(लेखक टीव्ही ९ या न्यूज चॅनेलचे पत्रकार आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *