भूवैकुंठ अर्थात पंढरपुराचं

एका पत्रकारानं केलेलं वर्णन

माझं गाव पंढरपूर. पंढरपूर म्हटलं, की डोळ्यासमोर येतो तो त्याचा तीर्थक्षेत्री चेहरा. हरिनामाच्या गजरात अखंड तल्लीन झालेला मंदिर परिसर आणि विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुरलेला वारकरी. प्रत्यक्ष चक्रपाणी जिथे उभा आहे, ते पंढरपूर माझं गाव. संतमहंतांनी त्याचा महिमा वर्णन केलेला आहे. मलाही त्याचा अभिमान असणं स्वाभाविकच आहे. आध्यात्मिक वातावरणात असलेल्या पंढरपूरची बरीच वैशिष्ट्यं आहेत. पंढरपूरच्या मातीचा गुणधर्मच वेगळा आहे. कोणत्याही पंढरपूरकराला तुम्ही ‘ काय कसं चाललंय? असं विचारलं, तर लगेच उत्तर मिळेल, ‘निवांत….’

– दुर्गेश सोनार

भत्ता, गप्पा आणि पेणपाला

अस्सल पंढरपूर अनुभवायचं असेल तर तुम्हाला घोंगडे गल्ली, गांधी रोड आणि तिथून मंदिर परिसर असं फिरावं लागेल. खरं पंढरपूर पाहायला मिळतं ते तिथल्या गल्लीबोळांत… या गल्लीबोळांची ख्याती सर्वदूर पसरलीय. एखाद्या नवख्या माणसाला पंढरपूरच्या बोळात सोडले तर तो हरवण्याचीच शक्यता अधिक असते. छोटे छोटे, अरूंद बोळ… समोरासमोर असलेले जुन्या पद्धतीचे वाडे, रस्त्यावरील दुकानांबाहेर दुतर्फा असलेली फळकुटी आणि त्यावर गप्पांचे फड रंगवणारी माणसं. गप्पांचे विषयही सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचे. या गप्पांना फारसं काही लागत नाही. चिरमुऱ्याचा भत्ता केला, की झालं… त्यावर मस्त ताव मारत गप्पा रंगत जातात. पंढरपुरी भत्ताही गप्पांसारखाच चविष्ट असतो.

चिरमुऱ्यांत थोडं तिखट, थोडं मीठ आणि थोडसं तेल टाकून ते हाताने घोळलं की झाला भत्ता. त्याच्यासोबत कांदा असला, की मग त्याची चव तर विचारूच नका. एखादी सुगरण चिरते तसा कांदा इथे चिरावा लागत नाही. कांद्यावर मूठ आदळलायची आणि त्याच्यासोबत भत्त्याचा मनसोक्त बुकणा मारायचा. पंढरपूरच्या खाद्यसंस्कृतीतला भत्ता हा एक अविभाज्य भाग. तसाच आणखी एक पदार्थ खूप लोकप्रिय आहे, तो म्हणजे पंढरपुरी पेणपाला! वेगवेगळ्या डाळींची मसालेदार आमटी म्हणजे हा पेणपाला… पोळ्यांचा कुस्करा करायचा, त्यावर हा पेणपाला घ्यायचा आणि त्याच्यावर तुपाची मस्त धार ओतायची… पेणपाल्याची ही चव जशी पंढरपुरात चाखायला मिळते, तशी इतरत्र कुठेही चाखायला मिळणार नाही.

बुक्का लावायचं काम नाही…

प्रख्यात विनोदी साहित्यिक द. मा. मिरासदार यांनी तर त्यांच्या अनेक गोष्टींमधून पंढरपूरची ही खासियत सांगितलीय. पंढरपूरनं जसे मराठी साहित्याला मोठमोठे लेखक दिलेयत, तसेच काही खास शब्द आणि वाक्प्रयोगही दिलेयत. वानगीदाखल काही सांगतो. म्हणजे पाहा ‘बुक्का लावायचं काम नाही…’ अनेकांना याचा अर्थ कळणार नाही. पण हे म्हणताना ‘अजिबात फसवायचं काम नाही’, असं अभिप्रेत असतं. आणखी एक परवलीचं वाक्य सांगतो. ‘ काय तिऱ्हे मार्गे सांगताय राव…’ म्हणजे त्याला ‘असं आडवळणानं का सांगताय’ असं म्हणायचं असतं. आता तुम्ही म्हणाल हे तिऱ्हे काय प्रकरण आहे. तिऱ्हे हे एक छोटंसं गाव आहे. पंढरपूरहून सोलापूरला जाण्यासाठी असलेल्या मार्गांपैकी तो एक मार्ग आहे. काही एश्ट्या (एसटी बसेस) तिऱ्हे मार्गे जातात. या मार्गावरून प्रवास करून पाहावा असा आहे. साधारणतः दीड तास लागणाऱ्या अंतराला या मार्गाने तीन तास तर सहज लागतात. तर असं हे तिऱ्हे प्रकरण….

आशीर्वाद देण्याचा कार्यक्रम

पंढरपुरात होणाऱ्या कार्यक्रमांचंही एक वेगळेपण आहे. बाकीच्या गावात जसे कार्यक्रम होतात, तसे इथे होत नाहीत. इथल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विठ्ठल रुक्मिणीचे आशीर्वाद घ्यावेच लागतात. हे आशीर्वाद देणारी मंडळी ठरलेली असतात. म्हणजे विठ्ठलाचा आशीर्वाद देण्यासाठी असतात बडवे मंडळी आणि रुक्मिणीमातेचा आशीर्वाद देण्यासाठी असतात उत्पात मंडळी. विठ्ठलाचे सेवेकरीही आशीर्वाद देण्यासाठी तप्तर असतातच. आता तुम्ही म्हणाल हे सेवेकरी कोण? डिंगरे, बेणारे, परिचारक, डांगे, आदी ब्रह्मवृंद विठ्ठलाचे सेवेकरी म्हणून काम करत असतात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ओळीने हे तिघेजण आशीर्वाद देतात आणि कार्यक्रमाला सुरुवात होते. कधी कधी हे आशीर्वाद प्रमुख वक्त्याच्या भाषणापेक्षाही जास्त वेळ चालतात.

या मंडळींची संबोधनंही ठरलेली असतात. म्हणजे उत्पात मंडळींना पंढरपूरचे लोक प्रेमाने ‘आईसाहेब’ म्हणतात. रुक्मिणीमातेचे पुजारी असल्याने त्यांना ‘आईसाहेब’ असं म्हटलं जातं. या संबोधनामुळे होणारा विनोद मिरासदारांच्या लेखनात पाहायला मिळतो. एखादे उत्पात नावाचे गृहस्थ न्हाव्याकडे निघाले असतील, तर एखादा पंढरपुरी त्याला विचारतो, ‘काय आईसाहेब, हजामतीला का ?’ या सगळ्या गंमतीजमती फक्त पंढरपुरातच अनुभवायला मिळतात.

स्टेशन रोड…

पंढरपुरात चकाचक हॉटेलं फारशी नाहीत.. पण, जी आहेत त्यांचीही स्वतःची वैशिष्ट्यं आहे. पंढरपूरच्या स्टेशन रोडवर एक हॉटेल आहे. त्याचं नाव ‘गोल्डन टी… ’ या हॉटेलच्या पाटीवर ‘ब्राह्मणांची खानावळ’ असं मोठ्या अभिमानाने लिहिलेलं अजूनही आढळतं. माझ्या बाबांच्या मित्राचं हे हॉटेल. माझे बाबा गमतीनं चुकीच्या ठिकाणी पॉझ घेत त्याचा उच्चार ‘गोल्ड नटी’ असा करतात. तो आमच्या बाबांच्या मित्रांचा एकेकाळचा ठिय्या. पूर्वी हा स्टेशन रोडच पंढरपुरातला एकमेव चांगला रस्ता होता. चौफाळ्यापासून सुरू झालेला हा रस्ता स्टेशनपर्यंत जातो. त्यामुळे त्याचं नाव स्टेशन रोड पडलं.

खरंतर या रस्त्याला सावरकर पथ असं नाव पालिकेनं दिलंय. पण, ते फारसं प्रचलित नाही. सावरकर जसे दुर्लक्षित राहिले, तसंच या रस्त्याचं नावही. वारीत तर स्टेशन रोडवरची वर्दळ विचारूच नका. गावोगावचे फेरीवाले आपली दुकानं थाटून या रस्त्याच्या दुतर्फा बसलेले असतात. याच रस्त्यावर टिळक स्मारक मंदिर आणि मैदान आहे. मी शाळेत असताना तिथे आमचे पीटीचे ( शुद्ध मराठी – शारीरिक शिक्षणाचे) तास व्हायचे. आम्ही पीटीच्या तासाला न चुकता हजर राहायचो, त्याचं कारण या मैदानावरतीच भरणाऱ्या चौपाटीत दडलेलं आहे. टिळक स्मारक मैदानावर भेळपुरी, रगडा पॅटीस आणि आईस्क्रीमचे गाडे लागतात.

पीटीच्या तासाच्या निमित्तानं आमच्यासारखी शाळकरी मुलं इथे भेळेवर येथेच्छ ताव मारायची. पंढरपुरातली पिढी आता बदलली असेल, पण, ते भेळपुरीचे गाडे आणि त्या भेळेची चव अजूनही कायम असेल. याच मैदानावर वारीच्या काळात उंच उंच पाळणे (जायटंस व्हील) यायचे, ‘मौत का कुआ’ असायचा, नेमबाजीचं कौशल्य आजमावण्यासाठी फुग्यांचे स्टॉल्स असायचे, छोट्या मोठ्या वस्तूंचे हरेक माल दोन रुपये, पाच रुपये. अशा प्रकारचे स्टॉल्स लागायचे. वारीच्या काळात तिथे अवघी पंढरी जमायची. चंद्रभागेच्या वाळवंटात पवित्र स्नान केलं, की बहुतेक वारकऱ्यांची पावलंही इथे वळायची.

वारी किती भरली?

पंढरपूरचा सगळा व्यवहार हा वारीकेंद्रीत. वर्षभरात चार वाऱ्या पंढरपुरात भरतात. सगळ्यात मोठी आषाढी. पावसाळ्यात साधारणपणे जुलै महिन्यात ही वारी येते. त्यानंतर दिवाळी झाली, की येते ती कार्तिकी. आणि याशिवाय फारशा कुणाला माहित नसलेल्या चैत्री आणि माघी या दोन वाऱ्या. या चार वाऱ्यांवर पंढरपूरकरांचे बहुतेक सगळेच आर्थिक व्यवहार अवलंबून असतात. पंढरपूरकर या चार वाऱ्यांमध्येच भरपूर पैसे मिळवतात आणि पुढची वारी येईपर्यंत ‘अगदी निवांत’ राहतात. व्यवहाराचे वायदेही या वारीच्या भरोशावरतीच होतात. पंढरपुरात ‘वारी भरणे’ हा एक वाक्प्रयोग रूढ आहे. म्हणजे ज्यांचे वाडे आहेत, ते लोक आपल्या वाड्यात वारकऱ्यांना राहायला जागा देतात. त्याबदली वारकऱ्यांकडून पैसे घेतले जातात. याला म्हणतात वारी भरणं.

वारी भरण्यासाठी कित्येक जण एसटी स्टँड, रेल्वे स्टेशनवर फील्डिंग लावतात. आमच्याकडे चला, आम्ही व्यवस्था करतो, असं म्हणत, ते आपलं वारकरी गिऱ्हाईक पटवतात. ही वारी भरली की मगच ‘वारी किती झाली ?’ या प्रश्नाला समर्पक उत्तर मिळू शकतं. वारी भरल्यानंतर जे पैसे मिळतात, ते म्हणजे वारी होणे.. काही जणांना हजार बाराशे रुपयांची वारी होते, तर काहींची वारी ही पन्नासेक हजारांपर्यंतही जाते. एखाद्याचं देणं चुकतं करायचं असेल तर त्याला वायदा दिला जातो तो वारीचाच. ‘थोडं थांबा की राव, एवढी वारी होऊन जाऊ द्या, मग देतो तुमचं देणं..’ असे संवाद सर्रास ऐकायला मिळतात.

वारीच्या काळात चलती

वारीच्या काळात शाळांनाही सुट्टी असते. साधारणपणे आठ दिवस मिळालेल्या या सुट्टीचा सदुपयोग पंढरपुरातले अनेक विद्यार्थी पॉकेटमनी मिळवण्यासाठीही करतात. तर काहींची ती कौटुंबिक गरजही असते. वारीच्या काळात कुंकू, बुक्का, पेढे, अगरबत्ती, चिरमुरे, बत्तासे, देवाच्या छोट्या छोट्या मूर्ती, धार्मिक पुस्तकं, भजन, भक्तीगीतांच्या कॅसेटस् यांच्या दुकानांची चलती असते. या प्रकारचं दुकान थाटायचं आणि आपली वारी करायची हा पंढरपुरातला सगळ्यात चांगला उद्योग.

सर्कशीच्या आता आठवणीच

टिळक स्मारक मैदानाप्रमाणेच आणखी दोन मैदानं पंढरपुरात आहेत. त्यापैकी एक अंबाबाई पटांगण आणि दुसरं रेल्वे मैदान. अंबाबाई पटांगण हे चंद्रभागेच्या अगदी जवळ. सोलापूरकडून पंढरपुरात प्रवेश करताना जुना दगडी पूल ओलांडला, की उजव्या बाजूला हे पटांगण लागतं. तिथे बरीचशी झोपडपट्टी काळाच्या ओघात वाढलीय. पण, एकेकाळी हे मैदान चांगलं होतं. तिथे वारीच्या काळात सर्कस हमखास लागायची. या सर्कशीचा दोन खांबी, तीन खांबी किंवा चार खांबी तंबू पाहायला गंमत वाटायची.

सर्कशीच्या मुख्य तंबूच्या आजूबाजूनं सर्कशीतल्या कलावंतांचे छोटे छोटे तंबू, प्राण्यांचे पिंजरे ठेवलेले असायचे. ते पाहण्यासाठी बाळगोपाळांची झुंबड उडायची. आमच्या लहानपणी सर्कसची क्रेझ होती. कधी प्रभात, कधी रेम्बो, तर कधी जेमिनी अशा नावाने येणारी ही सर्कस आईबाबांकडे हट्ट धरून पाहायला जाण्यात वेगळीच गंमत होती. आता काळाच्या तडाख्यात सर्कसही लोप पावत चाललीय आणि अंबाबाई पटांगणाची ती भव्यताही. या पटांगणातूनच अंबाबाईच्या मंदिराकडे वाट जाते. नवरात्रीच्या काळात इथे भाविकांची तोबा गर्दी असते.

रेल्वे मैदान आणि विजूकाका

अंबाबाई पटांगणासारखंच आणखी एक मोठं मैदान पंढरपुरात आहे. थोडंस मुख्य गावापासून दूर असलं तरी या मैदानावर आवर्जून क्रिकेट खेळायला जाणाऱ्यांची संख्या कमी नाही. रेल्वे स्टेशनला अगदी लागूनच असलेलं हे मैदान रेल्वे मैदान म्हणून ओळखलं जातं. या मैदानाचा सगळ्यात पहिला परिचय झाला तो मी प्राथमिक शाळेत असताना. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं याच मैदानावर संचलन व्हायचं. त्यासाठी पांढरा शुभ्र सदरा, खाकी चड्डी आणि पांढऱ्या शुभ्र मोज्यात घातलेले पांढरे कापडी बूट. कधी कधी आधीच्याच जुन्या बुटांना आदल्या दिवशी आम्ही पांढऱ्या खडूनं रंगवायचो.

तर हे रेल्वे मैदान. माझ्या बाबांच्या खूप आठवणी या मैदानाशी निगडीत आहेत. या मैदानावर पंढरपुरातल्या कित्येक पिढ्या क्रिकेट खेळत मोठ्या झाल्या. माझे बाबा आणि त्यांचे मित्रही इथे क्रिकेट खेळायचे. बाबांच्या मित्रांपैकी असलेले विजू जोशी हे पंढरपुरातलं एक अवलिया व्यक्तिमत्त्व. अगदी अवाढव्य अशा शरीरयष्टीचे असलेले विजूकाका अफजलखानासारखे दिसायचे. त्यामुळेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांना ‘जाणता राजा’त अफजल खानाची भूमिका दिली होती. या विजू काकांना क्रिकेटचे सामने भरवण्याचा भारी छंद… जवळपासच्या खेडेगावातल्या संघांना खेळायला बोलवायचं, त्यांची आपल्या संघाबरोबर मॅच लावायची. पण, ही मॅच हारायला लागली तर विजू काका पिचच्या बरोबर मध्यभागी बसून राहायचे. आता असा गबदूल माणूस जागेवरनं सहजासहजी हालवणं इतरांना अशक्यप्रायच होतं.

विकजूकाकांचं नाटकप्रेमही पंढरपूरकरांमध्ये सर्वश्रुत होतं. त्यांनी खूप नाटकं बसवली, केली, तर काही नाटकांच्या फक्त तालमीच झाल्या. रेल्वे मैदानाच्या जवळच रिमांड होम आहे. तिथे बाबांचं बालपण गेलं. तिथेच ते शिकले, मोठे झाले आणि नंतर बालकाश्रमाचे साहेबही झाले… तिथून जवळच पाखरे चाळ होती. बाबांनी सांगितलेले तिथलेही काही किस्से चांगले स्मरणात आहेत. आता हा भाग बराच बदललाय. पण, अजूनही या भागातून जाताना येताना पंढरपूरचे ते जुने दिवस आठवत राहतात…

दुर्गेश सोनार, नवी मुंबई

durgesh.sonar@gmail.com

फोन- 992070904113

(लेखक लोकमत पेपरमध्ये पत्रकार आहेत.)

3 thoughts on “पंढरपूर माझं गाव

  1. खूप छान दुर्गेश सर. प्रत्यक्ष पंढरपूरात फेरफटका मारल्यासारख वाटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *