एक संपादक वारकरी होऊन

पंढरीची पायी वारी करतात तेव्हा…

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मनामध्ये तेराव्या शतकात उमटलेला हा ‘पंढरपुरा नेईन गुढी’च्या इच्छेचा हुंकार, ही महाराष्ट्राची खरी ओळख. गेल्या आठ शतकांपासून तो हुंकार मराठी मनामनामध्ये झंकारत आहे. अनेक परकीय आक्रमणे आली, अनेक एक नैसर्गिक संकटे आली, पण पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघणारी वारकऱ्यांची वारी काही थांबली नाही…

महेश म्हात्रे

सलग दोन वर्षांपासून अवघ्या जगाला हादरा देणारी कोविड साथ आपण सगळ्यांनी अनुभवली, पण तरीदेखील पंढरपूरची ओढ काही कमी झाली नाही… यातच महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदाय… वारकरी आणि वारी यांचं अतूट नातं पाहायला मिळतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या आधीपासून, खरं सांगायचं तर हजार वर्षांपासून वारीची परंपरा आहे, असं अभ्यासकांचे मत आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी आपल्या मुलांसह पंढरपूरची वारी केली होती, ज्ञानेश्वर माऊलींच्या एका अभंगात त्याचा उल्लेख आढळतो. साधु संत मायबाप तिही केले कृपादान। पंढरीचे यात्रे नेले घडले चंद्रभागा स्नान॥

पंढरीची वारी हा महाराष्ट्र आणि जवळपासच्या ५-६ प्रांतातील लोकांचा कुलाचार आहे. हजारो गावांचा, लोकांचा तो लोकधर्म आहे. त्यामुळं ज्याप्रमाणे कुंभमेळ्यासाठी सरकारला अनेक सोयीसुविधांची तयारी करावी लागते, रस्ते, पाणी, राहुट्या, एक ना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो, साधुसंतांचे मानपान आणि रुसवे-फुगवे याचाही विचार करावा लागतो, तसं इथं काहीच नसतं. वारीत काहीही बडेजाव नसतो. साधे लोक, त्यांचं साधं जगणं, वारीत प्रत्येक पावलावर पाहायला मिळतं. इथं प्रत्येक वारकरी पांडुरंगाकडं एकच मागणं मागत असतो, ‘पंढरीचा वारकरी, वारी चुकू न द्यावी हरी’.

अनोखी लोकपरंपरा

वारी ही हिंदू धर्मातील अन्य कुठल्याही यात्रेपेक्षा वेगळी लोकपरंपरा आहे. वारीमध्ये सामूहिक भक्तीचे, सांप्रदायिक शक्तीचं विराट दर्शन पाहायला मिळतं. आणि म्हणूनच वारी म्हणजे एक वेगळा अनुभव, तिथं भक्ताच्या उत्कटतेनं जावं लागतं. भूक-तहान विसरून पायाखालची जमीन तुडवत जाणारे वारकरी पंढरीची वारी अशाच तन्मयतेने करतात. हरिनामाची पताका खांद्यावर घेऊन ‘गाऊ नाचू प्रेमे, आनंदे कीर्तनी’ अशा विठ्ठलनामाच्या गजरात वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरीला पोहोचतात. तेव्हा नामभक्तीचा पूर चंद्रभागेच्या वाळवंटात दुथडी भरून वाहतो. म्हणूनच पंढरपूर हे नाम-भक्तीचं क्षेत्र म्हणून ओळखलं जातं.

आळंदीला मात्र ज्ञानेश्वरांच्या समाधीजवळ गेलं की, अध्यात्मज्ञानाचा दबदबा जाणवतो. तिथं गीतेच्या तत्त्वज्ञानाचा ऊहापोह कीर्तन-प्रवचनातून चालत असतो. ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीतून संन्याशाच्या त्याग धर्माची दीप्ती प्रकाशमान होताना दिसते. जवळच देहू आहे. शेजारी सोपानकाकांचे सासवड आहे. सोपान काकांमुळं मला पंढरीची वारी करता आली म्हणून माझ्यासाठी सासवड म्हणजे ब्रह्मस्थान. आळंदीला ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली, तर देहूला तुकाराम महाराजांनी अध्यात्म प्रांताच्या नकाशावर अमर केले. संत बहिणाबाई यांनी ज्ञानदेवे रचिला पाया। तुका झालासे कळस॥ असं म्हटलंय, ते उगाचच नाही.

ज्ञानोबा श्वास तर, तुकोबा उच्छवास

वारकरी संप्रदायाचा श्वास ज्ञानोबाचा तर बाहेर पडणारा उच्छवास तुकोबाचा, असे म्हटलं तर अतिशोयक्ती होणार नाही. एक बाल ब्रह्मचारी, पूर्ण विरागी संन्यासी तर दुसरा संसारी. संसारात राहूनही विरक्त, संत कसं होता येतं, याचं मूर्तिमंत उदाहरण. जोडोनिया धन उत्तम वेव्हारे। उदास विचारे वेच करी॥ हा तुकारामांचा जीवनादर्श. संसारात व्यापार-उदीम करून पैसा मिळवावा, पण त्याची आसक्ती बाळगू नये. अनासक्त राहून मिळवलेल्या धनाचा सहज त्यागही करावा. सोने रूपे आम्हा मृत्तिकेसमान। माणिके पाषाण खडे तैसे॥ अशी विरागी वृत्ती देहूला शिकावी.

ज्ञानाची आळंदी, नामाची पंढरी आणि वैराग्याचं देहू असं या तीर्थक्षेत्रांचं वर्णन केलं जातं. पण दुर्दैवाने शिकलेल्या अतिशहण्या मंडळीनी या संत विचारांना नेहमीच कमी लेखण्याचा प्रयत्न केला. विशेषत राजवाडे पंथियांनी कारण नसताना वारकरी संतांची टीकाटिंगल केली. हे टाळकुटे लोक, ‘जैसी स्थिती आहे, तैशापरी राहे’, असं म्हणतात म्हणजे त्यांना परिस्थितीशरण जीवन जगायचं आहे, असा चुकीचा अर्थ काढून संतविचार नाकारण्याचा प्रमाद या मंडळींंनी केला आहे.


पण आता या नव्या ज्ञान-तंत्रज्ञान युगात तरी आपण हे सगळं विचारधन नव्यानं समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी, देहूला, आळंदीला, पंढरीच्या वारीला गेलं पाहिजे. माझे बरेच तरुण पत्रकार मित्र कव्हर करण्याच्या निमित्तानं वारीमध्ये जातात आणि अक्षरशः वारकरी होतात. शहरी जीवन जगणाऱ्या कोणाही व्यक्तीसाठी हा दिंडीतील अध्यात्मिक स्पर्श जगणं समृद्ध करणारा असतो. मला नेहमीच या पत्रकारांचा हेवा वाटतो. वारीचा माझा अनुभव वेगळाच, मी वारी कव्हर करण्यासाठी गेलो नव्हतो. क्रिकेटची मॅच कव्हर करणं आणि थेट मैदानावर उतरणं यातला जो फरक आहे, तो फरक मला पहिल्याच अनुभवात जाणवला. परिणामी पंढरपूरची एकच वारी माझ्या विचारविश्वाला आनंद दान देऊन गेली.

पाऊले चालती पंढरीची वाट

पूर्वी गावात कुठंही सत्यनारायणाची पूजा असो वा कोणताही धार्मिक कार्यक्रम, ‘पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडूनिया गाठ’ हे प्रल्हाद शिंदे यांच्या खणखणीत आवाजातील गाणं लाऊडस्पीकरवर लागायचंच. पंढरपूरला आषाढी-कार्तिकीच्या वारीसाठी जाणाऱ्या सर्वसामान्य माणसांची मनोभावना काय असते, हे दर्शवणाऱ्या त्या गाण्याचा लहानपणी अर्थ कळत नव्हता; परंतु सरळ साध्या शब्दांची गेयता ओठावर बसली, अगदी कायमची!समज आल्यानंतर त्या गाण्याचा अर्थही समजला. ‘गांजुनिया भारी, दु:ख दारिद्र्याने, पडता रिकामे, भाकरीचे ताट.. पाऊले चालती पंढरीची वाट’, गेली अनेक दशकं अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या या गीताच्या शेवटच्या कडव्यामध्ये ‘घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, अशा दारिद्र्याचा व्हावा नायनाट’ ही भाबडी अपेक्षा मनाला चटका लावून जाते..

पंढरीच्या वारीत अशी दु:खं दारिद्र्यानं गांजलेली, संसारतापानं पोळलेली लक्षावधी जनता, सकाळी तांबडं फुटल्यापासून सूर्य मावळेपर्यंत चालत असते. पण वारीचं वैशिष्ट्य असं की, खेड्या-पाड्यातून केवळ विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या जगण्यात वेगळंच चैतन्य फुललेलं असतं. एरवी शेती आणि शेतीवर आधारित कामधंद्यात गुंतलेल्या बाया-माणसांना वारीच्या वाटेवर ‘माऊली’चं मानाचं स्थान मिळतं. वारकरी संप्रदायात चमत्कार, नवससायास याला स्थान नाही; परंतु ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीत चालणाऱ्या पाच वर्षाच्या चिमुरड्या मुलीला वा ऐंशीच्या आजोबांना ‘माऊली’ या एकाच नावानं संबोधलं जातं. तसं वागवलं जातं.

हा आजही घडणारा, डोळ्यांनी दिसणारा सामान्याला असामान्यत्व देणारा ‘चमत्कार’ फक्त आणि फक्त वारीतच पाहायला मिळतो. अशा या आनंददायी वारीच्या परंपरेनं महाराष्ट्रात सामाजिक ऐक्याची मुहूर्तमेढ तेराव्या शतकातच रोवली. संन्याशाची पोरं म्हणून बहिष्कृत जीवन अनुभवलेल्या निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताई या चार अलौकिक व्यक्तिमत्त्वांनी सोवळ्याओवळ्यात गुरफटलेल्या मऱ्हाटमोळ्या समाजात जणू ‘समताधिष्ठित आध्यात्मिक लोकशाही’चा पाया घातला!

समताधिष्ठित आध्यात्मिक लोकशाही

गीतेचा अर्थ मराठीत सांगून ज्ञानेश्वरांनी संस्कृतच्या कचाट्यात सापडलेलं धर्मज्ञान रसाळ आणि सोप्या शब्दांत लोकांपुढे नेलं. एका अर्थानं प्राकृत असलेली मऱ्हाटी मनं ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीनं सुसंस्कृत झाली. ज्ञानदेवांनी ज्ञानाची, तर नामदेवांनी नामाची साधना अगदी सहजपणे लोकांसमोर ठेवली. त्यात व्रतवैकल्य, कर्मकांड आणि रुढाचाराचं स्तोम नव्हतं. मुख्य म्हणजे भक्तीच्या बळावर चोखा मेळा, गोरा कुंभार, नरहरी सोनार, कान्होपात्रा, जनाबाई या तत्कालीन कर्मठ वातावरणात अस्पृश्य आणि हीन समजल्या जाणाऱ्यांनाही कवित्व, शुचित्वाच्या जोरावर संतपद मिळू शकतं, हे वारकरी संप्रदायानं सिद्ध केलं होतं.

अध्यात्म म्हणजे यज्ञ-याग किंवा मोठं तप नाही. नामदेवरायांच्या शब्दांत सांगायचं तर; किर्तन नर्तन वाचे जनार्दन। न पावसी पतन येरझारी।। ज्ञानदेवांच्या मते नामघोषामुळे विश्वाची दु:खं नाहिशी होतात आणि सकळजग ब्रह्मसुखानं दुमदुमून जातं. संंत जनाबाई तर हे सहजसोपं अध्यात्म नाम विठोबाचे घ्यावे। मग पाऊल टाकावे।। इतकं रोजच्या जगण्याशी एकजीव करायला सांगतात. एकनाथ महाराजही अधिकारवाणीनं, आवडीने भावे हरिनाम घेसी। तुझी चिंता त्यासी सर्व आहे।। असं वडिलकीने सांगतात.

वर्ण अभिमान विसरली याती

दिंडीत चालणाऱ्या वारकऱ्यांच्या जगण्या-वागण्यात जी सहजसुलभता असते, त्यामागे संतांच्या या साऱ्या जीवन प्रेरणा अभंगपणे चालत असतात. अगदी पहाटेपासून सुरू होणारी काकड आरतीची आळवणी
उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा।
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा।।
या लडिवाळ शब्दांतून गारव्यानं आळसलेल्या आसमंतावर बरसते, तेव्हा दिंडीतील लहान-थोरांची लगबग बघण्यासारखी असते. माऊलींची, तुकोबांची वा सासवडच्या सोपानकाकांची दिंडी रोजच्या मुक्कामावरून मार्गस्थ होण्याचे काही नियम आहेत. त्यात संकेतांना महत्त्व असतं. कुठेही आरडाओरड नाही की धक्काबुक्की नाही.

चोपदारांच्या हातातील दंडाच्या इशाऱ्यानुसार लाखो लोकांच्या हालचालींचं नियंत्रण होतं. कुठे विसावा घ्यायचा, कुठे हरिपाठ सुरू करायचा, याचे इशारे चोपदार फक्त हातातील दंड उभारून देतात. दिंडीत संतांना मान दिला जातो; पण त्याचा अतिरेक नसतो. वर्ण अभिमान विसरली याती। एकमेकां लोटांगणी जाती।। अशी या चंद्रभागेच्या वाळवंटात खेळ मांडणाऱ्या वैष्णवांची स्थिती असते. तेथे उच्चनीचतेचा भेद नसतो. दंभ-अभिमान नसतो. फक्त एकच ओढ असते, पंढरपुरातील सावळे सुंदर, रुप मनोहर पाहण्याची.

प्रपंचात राहून परमार्थ

पंढरीच्या वारीत गेल्याशिवाय वारकऱ्यांची ही लोकविलक्षण भक्ती आणि शक्ती आपल्याला कळत नाही. पंढरपूरच्या वाटेवर दिंडीत दररोज होणाऱ्या भजनांमध्ये संत तुकारामांच्या अभंगांची संख्या जास्त असते. मला तुकोबांचा खरा परिचय याच वाटेवर झाला. मनाला विचार करण्यास प्रवृत्त करणारे हे अभंग मोठे मार्मिक. एका विसाव्याच्या ठिकाणी नव्याने ओळखीच्या झालेल्या कीर्तनकारांना तुकाराम महाराजांच्या अभंगा संदर्भात विचारलं असता ते म्हणाले, ‘तुकोबा हे तुमच्या-आमच्यासारखे प्रापंचिक होते. लग्न, व्यवसाय, आर्थिक चढ-उतार आणि कौटुंबिक आघात या आपल्या सर्वांना सहन कराव्या लागणाऱ्या गोष्टींचा त्यांनी सामना केला होता. त्यामुळे तुकाराम महाराजांचे शब्द आपल्या हृदयाला भिडतात.

शिवाय ते स्वाध्याय आणि स्वानुभवातून अध्यात्म शिक्षलेले अत्यंत मोठे संत होते, मोठे म्हणजे आकाशाएवढे, पण तरीही पाय जमिनीवर असणारे. तर असे हे तुमच्या-आमच्यातील तुकोबा आध्यात्मिकदृष्ट्या उच्च पदावर गेल्यावर जे मार्गदर्शन करतात त्यात आचरण्यास सोपा आणि अंतिमत: हिताचा सल्ला असतो. तुकोबांचे मानवी व्यवहार निरीक्षण अचूक आहे. सुंदर प्रपंच आणि उत्कट परमार्थ या दोन्हींचं एकवट दर्शन घ्या. परमार्थात प्रगती करण्यासाठी कोणत्याही अघोरी मार्गाचा अवलंब करायची गरज नाही. कोंबड्या-बक-याचा बळी मागणाऱ्या ग्रामदैवतांच्या मागे लागण्याची आवश्यकता नाही. नामसंकीर्तन साधन पै सोपे। जळतील पापे जन्मांतरीची।। न लगती सायास जावे वनांतरा। सुखे येतो घरा नारायण।। असा सहज आणि सोपा मार्ग तुकोबा सांगतात. म्हणूनच असेल कदाचित, वारकऱ्यांच्या नित्यपाठात तुकोबांचे अभंग जास्त प्रमाणात असतील.’’

बंधू भेटीच्या वेळी दिंडीत चालताना एक जपानी वारकरी महिला भेटल्या होत्या. त्यांचं नाव युरिको इकेनोया. वयाच्या साठीतही नवं शिकण्याचा अमाप उत्साह. ३० वर्षांहून अधिक काळ त्या दिंडीत चालतात. आधी उत्सुकता आणि त्यानंतर पांडुरंग भेटीची आतुरता, हेच या दिंडी प्रेमामागील खरं कारण आहे, या शब्दांत त्यांनी आपल्या भावना सांगितल्या…आणि माझं मन आकाशीच्या सावळ्या विठ्ठलाची अथांग माया डोळ्यात साठवत चालू लागलं… अचानक आभाळ भरून आलं आभाळीचे फेनधवल जलबिंदू भाळावर ओघळले आणि आनंदाश्रूंमध्ये न्हाऊन निघाले.

वारी चुको न द्यावी हरी

अशाच एका पहाटे, डोक्यावर बोचकं घेऊन निघालेले वृद्ध आजोबा दिसले. दिंड्यांचा मुक्काम हलण्याआधी म्हातारबोवांनी आपली थकलेली पावलं उचलली होती. हातातील काठीवर भार टाकत, तोंडानं ‘रामकृष्ण हरी’चा जप करत आजोबा एकटेच वाटचाल करत होते. मी सहज त्यांच्या जवळ जाऊन, ‘जय हरी माऊली’चा आवाज दिला. त्यांच्या थकलेल्या शरीरात दडलेल्या प्रचंड उर्जाशक्तीनं ‘जय हरी.. जय हरीचा’ प्रतिसाद दिला. ‘माऊली, दिंड्या अजून निघाल्या नाहीत, तुम्ही एकटे कुठे निघाले?’ हातातील काठी उभारून आजोबा थांबले. म्हणाले, ‘काय माऊली, म्हाताऱ्याची गंमत करता काय, मी एकला कुठं हाव? ही पहा माझी ज्ञानेश्वर माऊली काठी बनून मला पंढरपूरला घेऊन निघाली आहे. माऊलीचा हात धरलेला असेल तर दुसऱ्या कोणाची गरज कशाला?’ आजोबांच्या त्या उत्तरानं आम्ही सारेच गप्प झालो.

आजोबा बोलू लागले, ‘‘तुम्ही मुंबईहून आलेले दिसता. फार बरे झाले, माऊली, वारी केली पाहिजे. मी पण तुमच्याएवढा होतो, तेव्हापासून दरवर्षी वारीला येतो. रोज सकाळी उठलो की, पंढरीचा वारकरी। वारी चुको न द्यावी हरी।। अशी देवाला विनवणी करतो. माझी विठाई माऊली फार प्रेमळ. बघा ना, माझे वय ८० च्यावर गेले तरी मला ती सोडायला तयार नाही. आता एकच इच्छा उरलीय. त्या पंढरीच्या वाटेवर नाय तर पांडुरंगाच्या दारात मरण यावं, बस एवढंच मागणं आहे, माझ्या विठूरायाकडं.. चला माऊली, तांबडं फुटलंय. आमची पायगाडी जुनी झालीय, तुम्ही लोक जवान आहात. धावत पंढरीला जाऊ शकता, आमची खटारा गाडी हळूहळूच चालणार.. ‘‘पांडुरंग हरी, पांडुरंग हरी.’’ एकेक पाय सावकाश उचलत, सबंध शरीराचा भार काठीवर टाकत ऐंशीच्या घरातील आजोबा चालू लागले.. ओठांवर ‘रामकृष्ण हरी’चा जप आणि डोळ्यांमध्ये पांडुरंगाचे रूप साठवत त्यांचे थकलेले शरीर उत्साहानं पंढरीच्या वाटेनं निघालं होतं…

तुका म्हणे धावा

त्याच दिवशी संध्याकाळी, ‘तुम्ही पंढरपूरला ’धावत’ जाऊ शकता’ या आजोबांच्या वाक्याचा प्रत्यय आला. पंढरी टप्प्यात आली असं लक्षात आल्यानंतर देहूकर तुकोबा खांद्यावरील पताका उंचावून पंढरीच्या वाटेनं धावत सुटायचे.. ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवर, कर कटावरी ठेवूनिया’ या एकाच ओढीनं त्यांचं देहभान हरपत असे – ‘तुका म्हणे धावा, आता पंढरी विसावा’. त्याची आठवण म्हणून वेळापूरजवळ समस्त वारकरी दिंडीच्या त्या टप्प्यावर एक किलोमीटरची वाट धावून पूर्ण करतात. त्याला ‘धावा’ म्हटलं जातं. ती जागा जवळ येताच पहिल्या दिंडीचे चोपदार हातातील चांदीचा दंड उंच उभारून इशारा देतात आणि लक्षावधी वारकऱ्यांचा जनसागर अचानक भरती आल्यानंतर सागराच्या लाटा जशा किनाऱ्याकडे धावतात, त्या गतीनं पंढरीच्या दिशेनं झेपावू लागतो.

हातात वीणा घेतलेले वीणेकरी, डोईवर तुळशी वृंदावन, हंडे, कळशा घेतलेल्या आया-बाया, वजनी मृदंग-पखवाज खांद्यावर असलेले मृदंगमणी, टाळकरी, भगव्या पताका खांद्यावर घेतलेले, झेंडेवाले, भिन्न वयोगटातील अबालवृद्ध ‘माऊली, माऊली’ म्हणत पंढरपुरात बसलेल्या विठू माऊलीच्या दिशेनं धावतात. कुणी पायात पाय अडकून पडतात, पुन्हा ‘माऊली’चा जयघोष करत धावू लागतात. दीडेकशे किलोमीटर चालून पाय थकलेले असतात; पण पंढरपूर जवळ आलं, ही बातमी तन-मनात जोष फुलवते. कारण पंढरीच्या ओढीनं प्रत्येक वारकऱ्याच्या डोळ्यासमोर विठाई, कृष्णाई, कान्हाई नाचत असते.

तू माय मी लेकरू

विठ्ठल आणि वारकरी यांच्यातील नातं माय-लेकरासारखं आहे. बाहेरून दुडूदुडू धावत येणाऱ्या बालकांना भेटण्यासाठी, हृदयाशी धरण्यासाठी आई आपले दोन्ही हात उभारून घराच्या उंबऱ्याशी उभी असते. आपल्या लाडक्या लेकराचे गुणदोष किंवा लहान-मोठेपण अशा भेदाच्या गोष्टी तिच्या मनात नसतात. एखादा मंत्री असो वा सामान्य शेतकरी, तिच्या लेखी सारेच समान. त्यामुळे आपली ही लेकरं कधी पंढरपुरात येतात आणि आपण त्यांना कधी उराशी कवटाळतो, असं विठ्ठलाला देखील वाटत असतं.

थोडक्यात काय तर, वारकऱ्यांना जेवढी पांडुरंगाला भेटण्याची आस लागलेली असते, तेवढीच किंवा काकणभर जास्त ओढ विठ्ठलाला भक्तांच्या भेटीची असते, असं संत सांगतात. नामदेव महाराजांच्या शब्दांत सांगायचं तर, सुखाचे हे सुख श्रीहरी मुख। पाहताही भूक तहान गेली।। म्हणजे मूर्तीमंत सुखालाही, साकार सुखालाही ज्याच्या श्रीमुखाकडे पाहून सुख वाटेल, असं विठ्ठलाचं सावळं, गोजिरं रूप पाहिल्यावर आपली तहान-भूक हरपणारच! मग अशी विठाई माऊली प्रत्यक्ष भेटल्यावर जिवाला दुसरं समाधान, दुसऱ्या वासना उरणंच शक्य नाही, असं नामदेवराय सांगतात. ज्ञानोबा तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी।। असा प्रेमळ सल्ला देतात. आणि तुकोबा तर त्याहून पुढे जाऊन म्हणतात, गाऊ नाचू प्रेमे आनंदे कीर्तनी। भुक्ति मुक्ती दोन्ही न मागो तुज।। अशी ही देव आणि भक्तांमधील अनुपमेय, अवर्णनीय आणि निरपेक्ष एकरूपता आपल्याला वारीच्या वाटेवर पदोपदी पाहायला मिळते.

गावागावांत माऊलींचे स्वागत

दिंडी ज्या मार्गानं जाणार असते, त्या गावातील सरपंच वा स्थानिक नेते गावाच्या वेशीवर पालखीचं स्वागत करण्यासाठी उभे असतात. दिंडीप्रमुख आणि माऊलींच्या अश्वाचं मोठ्या कौतुकानं स्वागत होतं. पालखीपुढे लोटांगणं घातली जातात. आणि गावात शिरावं तर सकाळ, दुपार असो वा संध्याकाळ, हातात खाण्याच्या वस्तू घेऊन दुतर्फा लोक उभे.. कुणी चहा, कुणी सरबत पिण्याचा आग्रह करतोय. कुणी हातात बिस्किटचे पुढे घेऊन, ‘माऊली एक तरी पुडा घ्या ना’ असा आग्रह धरत आहे, असं दृश्य बघायला मिळतं. गोपीचंदनाची उटी कपाळावर लावलेले बाळगोपाळ तर लडिवाळपणे त्यांच्याजवळील केळी वा चॉकलेट घेण्याचा हट्टच धरतात. त्यावेळी ज्ञानोबा-तुकोबांनी मऱ्हाटी समाजात रुजवलेली ‘जे जे दिसे भूत। ते ते मानिजे भगवंत’ ही सर्वाच्या ठायी परमेश्वर बघण्याची भावना डोळ्यांसमोर साकार होते.

ग्रामीण भागातील लोकांनी या जुन्या परंपरा आणि विचारांची ठेव नव्या पिढीकडे देण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. याचा प्रत्यय वारीत सातत्यानं येतो. अशाच एका सकाळी ज्या दिवशी १६ किलोमीटरचा टप्पा पार करायचा होता, आम्ही सहा-आठजण आडवाटेनं चालत दिंडीच्या पुढे निघालो होतो. सकाळीच चहा-पोह्याचा दोनदा आग्रह झाल्यानं काही खाण्याची इच्छा नव्हती. ऊन तापण्यापूर्वी किमान अर्धा टप्पा गाठावा, या ‘शहरी’ विचारानं पावलं वेगात पडत होती. एका निर्मनुष्य रस्त्यावर शाळेचा पोषाख घातलेली पाच-सहा वर्षाची चिमुरडी उभी होती. सगळ्यात पुढे असलेल्या जयसिंगबाबू जगतापांना त्या मुलीनं थांबवलं. घरापासून १०-१२ दिवस दूर असलेल्या बाबांना आपल्या नातीची आठवण झाली असावी. उत्साही आवाजात ते आम्हाला म्हणाले, ‘अरे ही दीदी बघा काय सांगतेय, घरी जेवायला चला.’

जेवणाचा प्रेमळ आग्रह

आमच्या गटानं एकमुखाने नकार दिला; पण बाबांना त्या मुलीचा आग्रह मोडवला नाही आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध आम्ही जाण्याचा प्रश्नच नव्हता. आम्ही ‘येतो’, म्हणताच ती पोरगी वारा प्यालेल्या वासरागत वस्तीकडे पळाली. ‘आये, माऊल्या आल्या गं’, अशी आसमंत घुमवणारी हाळी तिच्या नाजूक ओठातून निघाली आणि आमची पाऊले शेतातील काळ्याजर्द पाऊलवाटेवरून वस्तीकडे निघाली… माझ्या, आमच्या सगळ्यांच्या अनवाणी पायांना काळ्या आईनं अबीरबुक्क्यानं रंगवून टाकलं होतं. तोवर गाई-गुरांचा प्रशस्त गोठा, मोठी पाण्याची टाकी आणि पुढे-मागे पसरलेलं घर समोर आलं होतं, ते घर चिमण्यापोरीच्या आवाजानं सावध झालं होतं. खिल्लारी जोडी घेऊन निघालेल्या किसनरावांनी हात-पाय धुवायला पाणी दिलं. दुसरा भाऊ मोटारसायकलवर दुधाची भलीमोठी किटली अडकवत होता, तर स्वयंपाकघरात जेवणाची लगबग चालली होती. नुकताच नाश्ता झाल्यानं पोट भरलं होतं. त्यामुळे ‘चहा दिला तरी चालेल’, अशी सासवडकर आप्पा बुद्धिवंतांनी सूचना केली. ‘माऊली थोडा दम धरा, दहा मिंटात जेवन करते’, असा आतून आवाज आला. आम्ही सारे गप्प.

तेवढ्यात गोकुळासारख्या त्या घरातील चार-पाच बालगोपाळ पुढे आले. त्यांच्याशी गप्पा मारतांना १५-२० मिनिटं कशी गेली कळलीच नाही. पुन्हा एक पोक्त आवाज कानी पडला, ‘माऊली, हात धुवून घ्या, जेवण तयार आहे.’ आम्हाला बैठकीच्या खोलीत नेण्यात आलं. आमच्यापाठोपाठ गरमागरम ज्वारीच्या भाकरी, आमटी, ठेचा आणि दह्या-दुधाच्या वाट्या असलेली ताटं आली. त्या सुग्रास जेवणाच्या वासानंच, अर्ध्या तासापूर्वी भूक नाही म्हणणारे आम्ही सारे जण जेवणावर तुटून पडलो. पाचच मिनिटात चुलीवर भाजलेल्या भाकरीची चवड घेऊन आजीबाई आल्या आणि चक्क आमच्या पंगतीमध्ये बसल्या. त्यांच्या डोळ्यांत आम्हा अनोळखी लोकांबद्दल अपार माया दिसत होती. ‘सावकाश खा माऊली’ या आग्रहातून प्रेम निथळत होतं. ‘सकाळधरून वाट बघत होते बघा तुमची, त्या पोरीला कवापास्नं तुमच्या वाटेवर उभी केली होती. म्हनलं एका तरी माऊलीला घरी जेवाया घेऊन ये. मंग शाळंला जा. शाळा काय रोजचीच, माऊली काय वर्षातून एकदा येणार..’ आजीबाई बोलत होत्या.

मला पांडुरंग भेटला…

मी विचारलं, ‘माऊली, तुम्ही वारी केलीय कधी?’ तशा आजी गंभीर झाल्या. ‘‘या सगळ्या परपंचातून कुठं वेळ मिळाला? आता घर-दार सगळं ठीक, तर तब्बेत बिघडते. म्हणून पोरं म्हनतात, म्हातारे एकटी वारीला जाऊ नको. आता आपण त्यांच्या हातात हाओत. मग पोरांचं मन दुखवून कसं चालेल? म्हणून माऊलीला साकडं घातलं, मला सोबत नेत न्याय, तर घरी जेवायला तर ये.. तुम्ही घरी आलात, मला पांडुरंग भेटला.’’ असं बोलून आजीबाई भक्तीभावानं हात जोडती झाली.. आणि संस्कृत गीतेचा अर्थ सोप्या भाषेत उकलून दाखवणारी ज्ञानेश्वरी, जनगंगेच्या ओठांवर तरंगलेली तुकोबांची गाथा आणि देश-धर्म-भाषेच्या भिंती ओलांडून पसरलेली नामदेवांची अभंगवाणी मला त्या भाबडय़ा आजीबाईच्या सश्रद्ध मनात मूर्तीमंत अवतरलेली दिसली…

त्या अलौकिक साक्षात्कारानं गाव-खेड्यात वसलेल्या माझ्या मऱ्हाटी मुलखाची थोरवी कळली. वारीत असे जगावेगळे अनुभव दररोज येत असतात. लक्षावधी लोकांचा त्यांना हवा तसा प्रतिपाळ करणारा पांडुरंग मागे-पुढे उभा राहे सांभाळीसी। आलिया आघात निवाराया।। असं सांगत सोबत करत असतो. त्यामुळे दिंडीमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं विश्वरूप दर्शन घडतं. वारीमध्ये सर्व प्रकारचे लोक असतात. जगात जसे सज्जन आणि दुर्जन भरलेले आहेत, तद्वत वारीतही असणारच; पण वारीतील वारकरी त्यांच्याकडेही ‘माऊली’ म्हणूनच पाहातात. एकदा एका शहराच्या वेशीजवळ एक दारू प्यालेला माणूस दिंडीत घुसून ‘ग्यानबा-तुकाराम’च्या ठेक्यावर नाचायला लागला. दारू प्यायल्यामुळे त्याचा तोल जात होता. तेवढ्यात एका वयस्कर गृहस्थानं त्याला हाताला धरून पुढे झेंडेवाल्यांच्या रांगेकडे नेलं आणि मोठ्या प्रेमानं सांगितलं, ‘माऊली, तुम्ही इथून भजन करा.’ त्या दारूड्याच्या कानी ‘माऊली’ शब्द पडताच त्याची चर्या बदलून गेलेली दिसली.

नाठाळाचे काठी देऊ माथा
एका ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली आणि सोपानकाकांच्या पालख्यांची भेट होते. त्याला ‘बंधूभेट’ म्हणतात. त्या जागी दोन्ही पालख्या एकत्र येण्यानं प्रचंड गर्दी होते. त्या गर्दीच्या वेळी एक पोलिस इन्स्पेक्टर मोटरसायकलवरून गर्दीचं नियंत्रण करताना दिसला. वारकऱ्यांना उद्धटपणे शिव्या घालणाऱ्या त्या इन्स्पेक्टरनं एका ठिकाणी चक्क आपली मोटरसायकल रांगेत चाललेल्या दिंडीत घुसवली. त्याला दिंडी त्या जागी रोखायची होती. तेवढ्यात एक धिप्पाड तरुण वारकरी तिरासारखा पुढे सरसावला. त्यानं त्या मोटारसायकलचं स्टेअरिंग असं काही वळवलं की काही लक्षात येण्याआधी ती मोटारसायकल दिंडीच्या बाहेर पडली.

एव्हाना दोन-चार तरुण वारकरी बाह्या सरसावत धावले होते. पहिल्या तरुणानं धाव घेऊन इन्स्पेक्टरचं मनगट पकडलं आणि सांगितलं, ‘माऊली, दिंडीत भेटलात म्हणून वाचलात, परत अशी आगळीक करू नका. भारी पडंल.’ नको त्या ठिकाणी पोलिसी खाक्या दाखवायला निघालेल्या इन्स्पेक्टरचा चेहरा पडला. दिंडी आपल्या गतीनं वाट चालत होती.. तेराव्या शतकापासून ज्ञानोबांनी दिंडीचं पुनरुज्जीवन केलं, तेव्हापासून परकीय आक्रमण असो वा नैसर्गिक आपत्ती, वारकऱ्यांच्या दिंड्या टाळ-मृदुंगांच्या घोषात आषाढी-कार्तिकीला पंढरीच्या मार्गावर चालू लागतात. एकादशीला भूवैकुंठ पंढरपूर वैष्णवांच्या मेळ्यानं गजबजून जातं. अवघ्या आकाशात भगव्या पताका फडकताना दिसतात आणि आसमंतात घुमत असतो विठोबा-रखुमाईचा जयजयकार…

अनंतरूपे, अनंत वेषे देखिले म्या त्यासी

फक्त महाराष्ट-गोवाच नव्हे, तर कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथील दिंड्या पंढरपुरात दाखल होतात. अनेक परदेशी अभ्यासक या भक्तीच्या शक्तीचा अभ्यास करण्यासाठी आलेले असतात. त्यांना पांडुरंग भेटतो. ‘अनंतरूपे, अनंत वेषे देखिले म्या त्यासी, बाप रखमा देवी वरू खूण सांगितली ऐसी’ असा त्यांनाही प्रत्यय येतो. युगे अठ्ठावीस वीटेवर उभा असलेला हा विठोबा म्हणजे निर्गुण-निराकारानं घेतलेला साकार भाव. भक्तांच्या भावासाठी, भक्तीसाठी रुक्मिणीला सोडून पंढरपुरात आलेला विठोबा आणि त्याला भेटायला, वारीसाठी ‘सुखी संसाराची सोडुनिया गाठ’ चालत निघालेला खेड्यापाड्यातील, गरीब-श्रीमंत वारकरी हे महाराष्ट्राचं ‘अद्वैत’ आहे. मराठी मन आणि महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल, तर वारीला चला. अर्धशतकापासून वारी करणाऱ्या एका कीर्तनकारांनी मला सांगितलं होतं की, जे लोक वारी करतात, ते वर्षभर आजारी पडत नाहीत. कारण वर्षभर पुरेल एवढा मनाला आणि शरीराला व्यायाम होतो.. सासवडचे अशोकबापू जगताप एका वारीला थेट आयसीयूमधून आलेले मी ‘याचि डोळा’ पाहिलेले आहेत… शरीराला हरवून मनात उत्साह जागवणारा त्यांचा निर्धार मन कधीच विसरू शकणार नाही.

कारण वारी म्हणजे जीवन आनंदानं जगण्याचा मोक्षमार्ग, भक्तीचा अखंड उत्सव.. तो उत्सव अजूनही संपूर्ण महाराष्ट्राला कळलेला नाही, कारण ।।ज्ञानबातुकाराम।।चं कुणी ‘ब्रॅण्डिंग’ केलेलं नाही. खरं सांगायचं तर तसं करायची गरजही नाही. त्यासाठी पंढरीच्या वारीला चला, चाला आणि ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ म्हणजे काय ते साक्षात अनुभवा…

(लेखक ज्येष्ठ संपादक-पत्रकार आहेत.)

3 thoughts on “माझे जीवीची आवडी

  1. महेशराज, वारीमधील कथन आणि कथानक अतिशय भावस्पर्शी व मार्मिक आहे वारीमध्ये जावून मानवी जीवनाच सार्थक केले असे मला मनोमन वाटते गेल्या कित्येक वर्षापासून ह.भ.प.अनिलमहाराज यांच्याकडे वारंवार हेका धरुन देखील वारीचे दर्शन घडविले नाही माझ्या वडिलांची पण इच्छा होती की त्यांचा वारसा कोणीतरी पुढे चालवावा गळ्यात माळ घातली नाही तरी चालेल परंतू एकदा तरी वारीत जावून कळत नकळत झालेली पापे धुऊन काढावी आणि विठोबा रखुमाईचे रुप डोळे भरुन न्याहाळावे आम्ही करंटे वयाच्या 58व्या वर्षापर्यंत देखील पायी वारीचा योग आलेला नाही परंतु एक वेळा पंढरीचे आणि विठोबाचे सहज दर्शन झाले होते हे ही नसे थोडके . असूद्या योगायोगाच्या गोष्टी असतात तुझे वारीमधील कथन संपूर्ण पणे वाचून झाले .तू नमूद केल्याप्रमाणे पायी वारीचा एकदा तरी जीवनामध्ये अनुभव घ्यावा तो घेण्यासाठी ह.भ.प.अनिलमहाराजांना दंड उगारुन दाखवावा आणि एकदाचा वारीचा अनुभव आम्हास द्यावा. बाकी सर्व उत्तम येथे कर्माचा प्रसंग….कर्म केले पाहिजे संग ….. कदाचित पडले व्यंग तर प्रत्ययाव घडे….. राम कृष्ण हरी.

  2. टीव्हीवरील राजकीय बातम्या पाहून डोके गरगरू लागले म्हणून फेसबुक उघडले आणि आपला लेख समोर आला. लेखाचे अथ पासून इति पर्यंत वाचन केले. लेख संपल्यानंतरच लेख विस्तृत असल्याचे लक्षात आले. आलेली मरगळ क्षणात दूर झाली. लेखनातल्या सामर्थ्याची प्रचीती आली. वारीतील अनुभव वाचून, फोटो पाहून क्षणभर आपण स्वत: वारी अनुभवत आहोत असे वाटले. लेखक वारीत मग्न झाले. मी त्यांचा लेख वाचण्यात मग्न झालो. जपानी महिला वारकरी, वृध्द आजोबा, भोजन करून घालणा-या अन्नपूर्णेची भावना हे सर्व अनुभव हृदयस्पर्शी आहेत. आपण प्रत्यक्ष वारी अनुभवली. आणि मी लेखाचे वाचन करून. खूप छान. वारी अनुभवल्याबद्दल अभिनंदन ! लेखाबद्दल धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *