आळंदी, पंढरीत स्पर्श दर्शन सुरू

पंढरपूर/आळंदी : लाखो भाविक, वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन तसेच आळंदीतील श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे स्पर्श दर्शन गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर (दि. २) सुरू होणार आहे. त्यामुळे भाविक, वारकऱ्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे.

करोना संसर्गामुळे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर १७ मार्च २०२० रोजी बंद केले गेले. त्यानंतर ते १६ नोव्हेंबर रोजी म्हणजेच दिवाळी पाडव्याला सुरू झाले. दुसऱ्या लाटेत १२ एप्रिल रोजी मंदिर पुन्हा बंद झाले. त्यानंतर नुकतेच कार्तिकी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले. मात्र कोरोनाच्या नियमांमुळे श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू आहे. पदस्पर्श दर्शन अद्याप बंद आहे. सध्या करोनाचा संसर्ग कमी झाल्याने श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरू करा, अशी मागणी भाविकांची होती.

या मागणी संदर्भात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत बैठक पार पडली. या वेळी पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन तसेच विठ्ठलाची चंदन पूजा, पाद्य पूजा देखील सुरू होणार आहे.

दुसरीकडे आळंदीतील श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे स्पर्श दर्शनही पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू होणार आहे.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माऊलींच्या समाधी स्पर्श दर्शनासाठी गेले दोन वर्षे आसुसलेल्या भाविकांची पाऊले अलंकापुरीकडे वळणार आहेत.

कोरोना महामारीच्या भीषण संकटामुळे १८ मार्च २०२० पासून श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी स्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आले होते. सद्या कोरोनाबाबतीत शासनाने विविध निर्बंध शिथिल केले आहेत. त्या अनुषंगाने आणि शासन निर्णयाला अनुसरून संस्थान कमिटीने भाविकांच्या तीव्र भावनांचा विचार करून, समाधीचे स्पर्श दर्शन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

यानुसार पाडव्याला सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत समाधी स्पर्श दर्शन सुरू राहील. दुपारनंतर गुडीपाडव्या निमित्त परंपरेनुसार समाधीवर चंदनउटीतून श्रीगणेश अवतार रूप साकारण्यात येणार आहे. यासाठी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत समाधीऐवजी माऊलींचे पादुका दर्शन घेता येणार आहे. सायंकाळी ५ ते रात्री ११ या वेळेत समाधीवरील गणेश अवतार रूप चंदन उटीचे दर्शन भाविकांना उपलब्ध असणार आहे. यादरम्यान वीणा मंडपात सायंकाळी ४ वाजता जोग महाराज वारकरी संस्थेच्या वतीने कीर्तनसेवा पार पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *