दादा जेपी वासवानी यांच्या
जन्मदिनानिमित्त माफी मोहीम
पुणे : साधू वासवानी मिशनचे आदरणीय दादा जेपी वासवानी यांचा जन्मदिन नुकताच जागतिक क्षमा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने तीन दिवस सत्संग, प्रवचन आणि सेवा आदी उपक्रम आयोजित करण्यात आले.
दादांचा वाढदिवस दरवर्षी जागतिक क्षमा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने यावर्षी माफी मोहीम आयोजित करण्यात आली. या मोहिमेचे प्रतीक म्हणून मनगटावर बँड बांधण्यात आले आणि ‘क्षमा दिनाच्या शुभेच्छा’ देण्यात आल्या. तसेच माफ करण्यासाठी आणि मैत्रीचे बंध दृढ करण्यासाठी सोशल मीडियावर ‘ई-बँड’ही शेअर करण्यात आले.
साधू वासवानी मिशनच्या कार्यकारी प्रमुख दीदी कृष्णा कुमारी यांनी भक्तांना बँड बांधून या उपक्रमाची सुरुवात केली. ‘तुम्ही माफ करायला तयार आहात का? असे त्यांनी यावेळी उपस्थितांना विचारले. तसेच मनगटावर बँड बांधल्यावर आपल्याला सर्वांना माफ करावे लागेल, असेही” दीदी कृष्णा कुमारी यांनी नमूद केले.
रेव्ह. दादांच्या वाढदिवसानिमित्त क्षमा दिन साजरा करण्यासाठी ‘हॅपी फोरगिव्हनेस डे बँड’ एकमेकांना बांधले जातात. अनेक लोक त्यांच्या माफीच्या नोट्स प्रवेशद्वारावर ठेवलेल्या एका भांड्यात ठेवतात. यानिमित्ताने एक ‘क्षमा गीत’ही प्रसिद्ध करणयात आले.
या मोहिमेच्या निमित्ताने साधू वासवानी मिशन आणि त्याच्या केंद्रांवर ‘क्षमापत्रे’ ठेवण्यात आली. दादा जे. पी. वासवानी यांच्या पवित्र वेदीवर वाढदिवसाचे अर्पण म्हणून ही ‘क्षमापत्रे’ ठेवण्यात आली होती. दोन ऑगस्ट रोजी दोन मिनिटे शांतता पाळण्यात आली.