सुमारे ४२ एकर जागेवर
भाविकांसाठी विविध सुविधा
पुणे : श्री स्वामी समर्थ यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या अक्कलकोट येथे ४२ एकरांवर ‘अनुभूती’ प्रकल्प साकारला जात आहे. सुमारे तीन वर्षांत येथे भाविकांसाठी अनेकविध सुविधा उपलब्ध होतील. हा प्रकल्प अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्टतर्फे साकारला जात आहे. माहिती श्री अक्कलकोट संस्थानचे नरेश श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले (तिसरे) यांनी ही माहिती सोमवारी (दि. ११) दिली.
या प्रकल्पासाठी भोसले यांनी संस्थानची ४२ एकर जागा सेवा स्वरुपात दिली आहे. प्रख्यात वास्तुविशारद महेश नामपूरकर हे प्रकल्पाची जबाबदारी पाहत आहेत. येथे श्री स्वामी समर्थ यांची पंचधातूची १०८ फूट उंचीची मूर्ती, दिव्य दर्शन, रुग्णालय, प्रसादालय, निवास व्यवस्था, हत्तींच्या मुक्त संचारासाठी कुंजरबन साकारले जाईल. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे २५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
यात सरासरी ७० टक्के कामांची पूर्तता करण्यात येणार असून, संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे ३५० कोटी रुपये खर्च येणार आहे. उद्योगांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) आणि भाविकांच्या देणगीतून हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे, असे मालोजीराजे भोसले, नामपूरकर यांनी सांगितले. मंदिरापासून काही मिनिटांच्या अंतरावर हा प्रकल्प असेल.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये –
- ब्रह्मस्थान (स्टॅच्यू ऑफ मिरॅकल) नावाने श्री स्वामी समर्थ महाराज यांची १०८ फूट उंचीची मूर्ती
- मूर्ती परिसरात भाविकांसाठी ध्यान आणि पारायण केंद्र
- कुटुंबासाठी छोटेखानी निवासव्यवस्था असलेले स्टुडिओ अपार्टमेंट
- वैद्यकीय सेवेसाठी चारशे खाटांचे बहुउद्देशीय रुग्णालय
- मनःशांती देणारे भारतीय आध्यात्मिक वृक्ष आणि नक्षत्रवन
- दगडांवरील कोरीव कामातून स्वामींच्या जीवनातील प्रसंगदर्शन
- फूड कोर्टमध्ये चविष्ट उपहारगृह, सांगीतिक कारंजे