श्रीगोंदा येथे यात्रोत्सवानिमित्त
हिंदू-मुस्लीम ऐक्याचा गजर
श्रीगोंदा : हिंदू- मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या येथील संत शेख महंमद महाराजांच्या ३२६व्या संजीवन समाधी सोहळा आणि यात्रोत्सवानिमित्त सुमारे तीन लाख भाविकांनी दर्शन घेतले. विविध कार्यक्रमांना भाविकांनी केलेल्या गर्दीने परिसर फुलून गेला होता. तर मंदिर परिसरातील आकर्षक विद्युत रोषणाईमुळे भोवताल उजळून गेला होता.
बुधवारी (दि. २०) पहाटे शेख महंमद महाराजांच्या समाधी स्थळावर शेरा चादर चढवून यात्रेला प्रारंभ झाला. दिवसभर विविध मंडळांच्या वतीने भाविकांना शेरणी वाटप करण्यात आले. पोलिसांच्या वतीने पोलिस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे पोलिस, निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी मानाची चादर अर्पण केली.
दिवसभरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. बबनराव पाचपुते, राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, बाळासाहेब नाहाटा, डॉ. प्रणोती जगताप, नितीन दिनकर पोटे, तहसीलदार क्षितिजा वाघमारे, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत, गटविकास अधिकारी राणी फराटे यांनी दर्शन घेतले.
रात्री महाराजांच्या अश्वांची मिरवणूक काढण्यात आली, तसेच लोकनाट्याचा कार्यक्रम झाला. गुरुवारी (दि. २१) दुपारी कुस्त्यांचा जंगी आखाडा पार पडला. सद्गुरू श्री संत शेख महंमद महाराज यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष गोपाळराव मोटे पाटील यांचे हस्ते नारळ फोडून आखाडा सुरू करण्यात आला. यावेळी यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यापूर्वी सोमवारी (दि. १८) गाथा पारायण आणि हरिनाम सप्ताहाचा काला पार पडला. रात्री समाधी स्थळावर ‘चंदन लेप’ सोहळा झाला. प्रसिद्ध कव्वाल युसूफ शोला यांचा कव्वालीचा कार्यक्रम झाला. यावेळीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.