सर्व संतांनी गुढी उभारली

समतेची, बंधुतेची अन् प्रेमाची!

आज गुढीपाडवा अर्थात मराठी नव्या वर्षाची सुरुवात. हा सण शेतकऱ्याचा. शेतातील पीक नियोजनाचा. मशागतीला सुरुवात करण्याचा. त्यामुळे शेतीमातीतूनच उगवलेल्या आणि मराठी संस्कृती घडविणाऱ्या संतांच्या साहित्यामध्ये या दिवसाचा उल्लेख येणे साहजिकच होते. कारण शेतकऱ्यांच्या परंपरा, त्यांचे सण उत्सव यांच्या माध्यमातून तर संतांनी विठुरायाचा समतेचा, बंधुभावाचा, प्रेमाचा संदेश जनमाणसांपर्यंत पोहोचवला.

संतांच्या अभंगातून वा लीळाचरित्रातून जे गुढीचे उल्लेख येतात ते वारकरी संप्रदायाच्या पताकेशी निगडित येतात. आणि ही पताका म्हणजेच गुढी होय. असा पुरावा त्यातून प्राप्त होतो. म्हणूनच ही पताका गुढी म्हणून उभारावी असेही काहींचे मत आहे. उदा. या गुढीचे काही उल्लेख पुढीलप्रमाणे. वारकरी संप्रदायाचा पाया घालणारे संत ज्ञानेश्वर माऊली आपल्या एका अभंगात म्हणतात,

माझिया जीवींची आवडी।
पंढरपुरा नेईन गुढी॥
पांडुरंगी मन रंगलें।
गोविंदाचे गुणीं वेधिलें॥
जागृती स्वप्न सुषुप्ति नाठवे।
पाहतां रुप आनंदी आनंद साठवे॥
बापरखुमादेवीवरु सगुण निर्गुण रूप।
विटेवरी दाविली खूण॥
अशा प्रकारे गुढी अर्थात बंधुभाव, प्रेमाचं प्रतीक असणारी वारकऱ्यांची काव अथवा गेरूने रंगविलेली पताका घेऊन पंढरपुराला जाणे, हीच माझी मनापासूनची आवड आहे.

श्री ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात,
अधर्माचि अवधी तोडीं। दोषांचीं लिहिलीं फाडीं। सज्जनांकरवी गुढी। सुखाची उभवीं॥
ऐकें संन्यासी आणि योगी।ऐसी एक्यवाक्यतेची जगीं।गुढी उभविली अनेगीं। शास्त्रांतरी॥
माझी अवसरी ते फेडी। विजयाची सांगें गुढी। येरु जीवीं म्हणे सांडीं। गोठी यिया॥
सज्जनांकरवी सुखाची गुढी उभारण्याची शाश्वती देतानाच ऐक्याचा आणि प्रेमाचा संदेशही माऊली या माध्यमातून देतात.
ज्यांनी संत ज्ञानदेवांच्या सहकार्याने समतेची गुढी देशभर पोचविली, त्या संत नामदेव महाराजांनी आपल्या अभंगात गुढीचा उल्लेख केला आहे.
फोडा फोडा रे भांडारें। आणवा गाईचीं खिल्लारें॥
उभवा उभवा रे गुढी। सोडा वस्रांचीं गाठोडीं॥
झाडोनियां टाका खडे। घाला केशराचे सडे॥
नामा म्हणे भूमंडळा। स्वामी माझा पहा सोहळा॥

संत नामदेवांचे शिष्यत्त्व पत्करलेल्या संत चोखामेळा यांना नामदेवरायांनी चंद्रभागेच्या वाळवंटातील समतेच्या खेळात सहज सामावून घेतले आणि ‘यातीहीन’पणाचे चटके सोसणाऱ्या चोखोबारायांच्या लेखणीतून अमृतवाणी झरू लागली. संत ज्ञानदेवांप्रमाणेच त्यांनीही आपल्या ‘जिवीची आवड’ एका सुप्रसिध्द अभंगातून सांगितली आहे.

टाळी वाजवावी गुढी उभारावी।
वाट हे चालावी पंढरीची॥१॥
पंढरीची हाट कऊलांची पेठ।
मिळाले चतुष्‍ट वारकरी॥२॥
पताकांचे भार मिळाले अपार।
होतो जयजयकार भीमातिरीं॥३॥
हरिनाम गर्जतां भय नाहीं चित्ता।
ऐसे बोले गीता भागवत॥४॥
खट नट यावें शुद्ध होउनी जावें। 
दवंडी पिटी भावें चोखामेळा॥५॥

समतेच्या वाटेवर संत नामदेवांची शेवटपर्यंत साथ देणाऱ्या संत जनाबाईंनीही

ऋषि अभिषेकिती रायाला। थोर मनीं आनंदाला॥
राया प्राप्‍ती जाला पट। गुढी उभवी वसिष्‍ठ॥
असा गुढीचा उल्लेख केला आहे.
पुढच्या काळात संत नामदेव, ज्ञानदेवांची मानवतेची गुढी
संत नाम गाय संत नाम गाय।
संत नाम गाय कामधेनु॥१॥
सदा सर्वकाळ दुभे भक्‍तालागी।
उणे पाहता अंगी धाव घाली॥२॥
नाम मुख स्तना लागला पान्हावे।
अभक्‍त न पाहे धाव पाठी॥३॥
जनी जनार्दन दुहिला आवडी।
उभविली गुढी एकनाथे॥४॥
संत एकनाथ महाराजांनी अशी १६ व्या शतकात संत एकनाथांनी उंच उभारली. नाथबाबांच्या साहित्यात गुढी हे रुपक असंख्य वेळा येते. हर्षाची, ज्ञातेपणाची, भक्तिसाम्राज्याची, यशाची, रामराज्याची, भक्तीची, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रुपके संत एकनाथ महाराज आपल्या काव्यात वापरताना दिसतात.

१३ व्या शतकातील या सर्व संतांच्या विचारांची गुढी १६व्या शतकातही उंचावणाऱ्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगात अनेक ठिकाणी गुढीचा उल्लेख येतो.

पाठवाल तेथें गर्जेन पवाडे।
काही देहाकडे नावलोकीं॥
म्हणऊनि मागें कंठींचा सौरस।
पावतील नाश विघ्नें पुढें॥
कृपेच्या कटाक्षें न भे कळिकाळा।
येतां येत बळा शक्ती पुढें॥
तुका म्हणे गुढी आणीन पायांपें।
होइल ते सोपें नाम तुझें॥
कर्मकांडांना फाटा देणारी देवाच्या नामाची गुढी सर्वत्र फिरविण्याची ग्वाही तुकाराम महाराज या अभंगातून देतात.

त्याचप्रमाणे
आस निरसली गोविंदाचे भेटी।
संवसारा तुटी पुढिलीया॥
पुढे पाठविले गोविंदे गोपाळ।
देऊनि चपळा हाती गुढी॥
हाका आरोळिया देऊनि नाचती।
एक सादाविती हरि आला॥
या अभंगातून श्रीकृष्णाप्रमाणे आपल्या सवंगड्यांच्याही हातात ही समतेची पताका दिल्याचे तुकोबाराय सांगतात. कुठल्याही कारणावरून समाजात भेदभाव असू नये, सर्वांनी एकोप्याने, बंधुभाव, प्रेमाने राहावे, असा संदेश गुढी आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्वच संतांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *