पालखी सोहळा सुरू करणाऱ्या

नारायण महाराजांचे सहकारी

महाराष्ट्राच्या थोर संतपरंपरेत जी आद्य नावे घेतली जातात, त्यापैकी एक संत श्री निळोबाराय महाराज. वारकरी संप्रदायाची परंपरा संत ज्ञानेश्‍वर माऊलींपासून सुरू होते आणि पुढे संत तुकोबाराय ते संत निळोबांपर्यंत येते.

तुकोबापुत्र संत नारायण महाराजांची प्रेरणा
श्रीसंत निळोबाराय हे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील घोडनदीच्या काठी प्रभू रामचंद्राने स्थापन केलेल्या रामलिंगाचे निस्सीम उपासक होते. रामलिंगाची ते मनोभावे पूजा अर्चा करीत असे. कुलकर्ण वतनही त्यांच्याकडे होते, पण त्यांच्या देवपूजेत कुलकर्ण वतनामुळे व्यत्यय आल्याने त्यांनी वतन सोडून दिले आणि पूजाअर्चा, पंढरीची वारी आणि नामस्मरणात ते तल्लीन होऊ लागले. पिंपळनेरचे पाटील भुलोजी गाजरे यांच्या आग्रहामुळे निळोबाराय पारनेरहून पिंपळनेर येथे स्थायिक झाले. तेथूनच त्यांनी पंढरपूर, आळंदी, देहू अशी नियमित वारी सुरु केली. त्यांच्या पत्नी सौ. मैनाबाई यांनीसुद्धा पतीसोबत पायी वारी सुरू केली. शिरुरहून पायी पिंपळनेर, पारनेर मार्गे पंढरपूर आळंदी, देहू अशी वारी करीत असताना संत तुकाराम महाराजांचे चिंरजीव नारायण महाराज यांच्यासोबत निळोबारायांचा परिचय झाला. त्यांना नारायण बुवांकडून तुकाराम महाराजांचे चरित्र ऐकावयास मिळाले. त्यामुळे निळोबाराय खूप प्रभावित झाले. त्यानंतर,
तुका ध्यानी तुका मनी। तुका दिसे जनी वनी।।
तुका तुका म्हणोनी। निशिदिनी बोलावे।।
अशी त्यांची अवस्था झाली.

तुकोबारायांचा अनुग्रह
निळोबांनी संत तुकोबांनाच आपल्या गुरुस्थानी मानलं होतं. त्यांना अनुग्रह देण्याचं तुकोबांनी मान्य केलं होतं, पण त्यापूर्वीच तुकोबा वैकुंठवासी झाले, असं सांगितलं जातं. त्यांनी आपल्याला स्वप्नामध्ये अनुग्रह दिला, असं निळोबांनी आपल्या एका अभंगात म्हटलं आहे.
येवोनिया कृपावंते। तुकयास्वामी सद्‌गुरुनाथे।।
हात ठेविला मस्तकी। देऊनि प्रसाद केले सुखी।।
माझी वाढविली मती। गुण वणविया स्फूर्ती।।
निळा म्हणे मी बोलता। दिसे परि त्याची सत्ता।।
योगायोग असा की, तुकोबांनीही त्यांच्या गुरुंनी-बाबाजी चैतन्यांनी- स्वप्नातच उपदेश दिला आणि राम-कृष्ण-हरी या मंत्राचा जप करा असं सांगितलं. ‘पांडुरंगच आपल्याला बोलवतो’ असं तुकोबा म्हणतात. त्याचप्रमाणे संत निळोबादेखील आपल्या कवितेचं श्रेय तुकोबांना देतात, हे वरील अवतरणाच्या शेवटच्या चरणावरुन लक्षात येईलच.

नामस्मरणाचे महत्त्व
संत निळोबाराय हे अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळनेरचे. त्यांची चरित्रविषयक माहिती फार अल्प प्रमाणात उपलब्ध होते. निश्‍चित माहिती उपलब्ध होत नाही. संत चरित्र्यकार महिपती यांनी निळोबांविषयी भक्‍तिविजयच्या ५९व्या अध्यायात विवेचन केलं असून त्यांच्या विषयीच्या काही अख्यायिकाही सांगितल्या आहेत. त्यांचा काळ सतराव्या शतकाचा पूर्वार्ध असावा. ते शके १८५० (इसवीसन १६५८) च्या सुमारास होते. संत निळोबाराय यांची अभंगरचना सुमारे १९०० आहे. त्यांच्या अभंगांमध्ये वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाची आचारधर्माची आणि परंपरेची अनेकविध वैशिष्ट्ये दिसतात. वारकरी संप्रदायानं सुलभ भक्तिमार्गावर भर दिला आहे. यज्ञयाग, कर्मकांड, पोथी-पांडित्य, उपासनेची जटिलता ही जर जनसामान्यांच्या भक्तीच्या आड येत, असेल तर केवळ देवाचं नाव घेऊनही भक्ती करता येते, असं वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानात सांगितलं असून सर्व वारकरी संतांनी नामस्मरणावर आणि ईशचिंतनावर भर दिला आहे. अध्यात्माबरोबरच सामाजिक सुधारणांचा संदेश देणारे क्रांतिकारक संत म्हणून निळोबाराय हे आपल्याला निरंतर वाट दाखवित असतात. निळोबाही नामस्मरणाचं ईशचिंतनाचं महत्त्वं सांगताना म्हणतात, की
गोड नाम तुमचें देवा। गोड सेवा तुमची ते।।
गोड तुमची कीर्ती वाणी। गोड श्रवणी ऐकतां।।
गोड तुमचे रुप दृष्टी। गोड पोटी प्रेम ते।
गोड निळा तुमचे पायी। गोड डोई ठेवितां।।
नामस्मरण ही वैयक्‍तिक, तर कीर्तन ही सामूहिक भक्ती आहे. त्यामुळं वारकरी संप्रदायान कीर्तनरुपी सामूहिक भक्ती स्वीकारली आहे.
भवरोगी जे पीडिले। तिही आवश्‍यक सेवा।
महामाचा हरिकीर्तन। उतरलें रसायन निजनिगुती।।
मागें बहुतां गुणासि आलें। अरोगी ठेविले करुनि।
निळा म्हणे सांगता फार। होईल विस्तार नामे त्याच्या।।

प्रपंचात राहून परमार्थ
भक्ती करण्यासाठी संसार-प्रपंचाचा त्यागच करायला हवा, असं नाही, हा विचारही वारकरी संप्रदायाच्या विचारसरणीत महत्त्वाचा आहे. संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकोबाराय, संत निळोबाराय हे सारे संत प्रापंचिकच होते. त्यांनी प्रपंचाची परमात्माशी सांगड घातली. भक्ती करताना सत्संग, संतसंग हाही महत्त्वाचा आहे, असं वारकरी संप्रदाय मानतो. निळोबांनी यासाठीच संतमहिमा वर्णन करणारे अनेक अभंग लिहिले आहेत. निळोबांनी तुकोबांप्रमाणंच ज्ञानदेव, नामदेव, एकनाथादी संतांचा महिमाही आपल्या अभंगातून अत्यंत तन्मयतेनं गायिला आहे. श्रीक्षेत्र पंढरपूरच्या पालखी सोहळ्यात निळोबाराय यांच्या पालखीला मानाचे नववे स्थान आहे.
‘पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ…’
महाराष्ट्राच्या संतपरंपरेची महती जगाला समजावी, यासाठी २०२१ च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात महाराष्ट्राने संतपरंपरेबाबत माहिती देणारा चित्ररथ समाविष्ट केला होता. यात संत श्री निळोबाराय यांनी केलेल्या अलौकिक कार्याप्रति कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी त्यांच्या प्रतिमेची प्रतिकृती समाविष्ट करण्यात आली होती. त्यात
पूर्ण केला पूर्ण केला। पूर्ण केला मनोरथ।।
घरा आले घरा आले। घरा आले कृपाळू।।
सांभाळिले सांभाळिले। सांभाळिले अनाथा।।
केला निळा केला निळा। केला निळा पावन।।
संत निळोबारायांच्या अभंगांतील पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ। घरा आले, घरा आले कृपाळू।। या ओळींचाही समावेश करण्यात आला होता.
संत श्री संत निळोबाराय यांच्या क्रांतिकारक विचार, विठ्ठलावरील गाढ भक्‍तीला ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन!🙏

लवकरच आपल्या सेवेत येत आहे – www.dnyanbatukaram.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *