श्री महादेव आणि श्री विष्णू

यांचा समन्वय म्हणजे विठ्ठल

भगवान शिवशंकर आणि श्री विष्णू यांचा समन्वय म्हणजे पंढरपूरचा श्री विठ्ठल. काही शतकांपूर्वी समाजात उभी फूट पाडणारा शैव-वैष्णव वाद उभा राहिला होता. वारकरी संतांनी श्री विठ्ठलाच्या माध्यमातून ही दुराव्याची दरी सांधली आणि शिव-विष्णू ऐक्याचा जयघोष केला.

संत नरहरी सोनारांचे कार्य
संत नरहरी सोनार हे कट्टर शिवभक्त होते. ते श्री विठुरायाच्या दर्शनालाही जात नव्हते. पण एका ग्राहकाने त्यांना विठ्ठलासाठी सोन्याचा करदोडा बनविण्यास सांगितला. त्यासाठी विठ्ठलाच्या कमरेचे माप घेण्यास ते विठ्ठल मंदिरात गेले पण डोळे बांधून. कारण शिवभक्त असणाऱ्या नरहरी सोनार यांना विठ्ठलरूपी श्री विष्णूचे दर्शनही वर्ज्य. ते हाताने चाचपून श्री विठ्ठल मूर्तीच्या कमरेचे माप घेऊ लागले तर त्यांना शंकराच्या पिंडीला स्पर्श केल्याचा भास होऊ लागला. अखेर त्यांनी डोळे उघडले तर, समोर श्री विठ्ठलाची मूर्ती! त्यांचा भ्रम दूर झाला आणि शिवशंकर आणि विठ्ठल हे एकच आहेत, याचा साक्षात्कार त्यांना झाला. पुढे आयुष्यभर संत नरहरी सोनारांनी या हरिहर ऐक्याचा पुरस्कार केला.

पांडुरंगाच्या मस्तकी शिवलिंग
पंढरपूरच्या श्री पाडुरंगाच्या मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग आहे, असे सांगितले जाते. त्या प्रमाणे त्या शिवलिंगाला गंध वगैरे लावून रोज पूजाही केली जाते. त्या संबंधीची अशी कथा सांगितली जाते की एकदा भगवान शंकर श्री विठ्ठलाच्या भेटीला आले आणि ते विठ्ठलाच्या मूर्तीत विलीन झाले. श्री विठ्ठलाने त्यांना आपल्या मस्तकावर स्थान दिले. पांडुरंग हे नाव शंकराचेच आहे. कारण पांडुर म्हणजे पांढराशुभ्र आणि अंग म्हणजे शरीर. ज्याचे अंग पांढरेशुभ्र आहे असा देव म्हणजे भगवान शंकर. श्री विठ्ठल कृष्णाचाच अवतार असल्यामुळे तो रंगाने काळा आहे. श्री शंकर करपूरगौरवम म्हणजे कापराप्रमाणे गोरा आहे. पण सावळ्या विठ्ठलाने त्याला मस्तकी धारण करून त्यांचे पांडुरंग हे नावही धारण केले, अशी पुराणकथा आहे.
संत निवृत्ती-ज्ञानदेवांनी केले ऐक्य
वारकरी संत परंपरेत संत निवृत्तीनाथ आणि संत ज्ञानदेव यांनी हरिहर ऐक्याची उदार परंपरा आणली. निवृत्तीनाथ म्हणतात,
विष्णुसहित शिव आणिला पंढरी।
केले भीमातिरी पेखण जेणे।।
तसेच
आमुचा आचार आमुचा विचार।
सर्व हरी-हर एक पुरे।।
श्री विठ्ठलाच्या रूपाचे वर्णन करताना श्री ज्ञानदेव म्हणतात,
रूप पाहतां तरी डोळसु। सुंदर पाहता गोपवेषु।।
महिमा पाहतां महेशु। जेणे मस्तकी वंदिला।।
नाथ संप्रदायाची गुरुपरंपरा असणाऱ्या आणि श्री विठ्ठलाचा सतत ‘वेधु’ लागलेल्या श्री ज्ञानदेवांनी आळंदीत सिद्धेश्वराच्या अर्थात श्री शंकराच्या सान्निध्यात समाधी घेतली हेही लक्षणीय आहे.

शिव तोचि विष्णू : संत नामदेव
श्री विठ्ठलाचा महिमा देशभर लोचविणारे वारकरी संप्रदायाचे विस्तारक संत नामदेव महाराज यांनी हरिहर ऐक्याचा जोरदार पुरस्कार केला.
विष्णुशी भजिला शिव दुरावला।
अधःपात झाला तया नरा।।
नामा म्हणे शिव-विष्णू मूर्ती एक।
देवाचा विवेक आत्मारामू।।
तसेच
नामा म्हणे तेथे दुजा नको भाव।
विष्णू तोचि शिव, शिव विष्णू।।
संत नामदेवांनी या ऐक्याचा नारा दिल्यामुळे त्यांच्या प्रभावळीतील सर्व संतांनी या ऐक्यभावाचा समाजात प्रसार केला.

एक एकाच्या हृदयी
संत नामदेवांचीच परंपरा पुढे नेणाऱ्या संत तुकाराम महाराजांनीही हाच संदेश दिला.
हरिहरां भेद। नाहीं करूं नये वाद॥
एक एकाचे हृदयीं। गोडी साखरेच्या ठायीं॥
भेदकासी नाड। एक वेलांटी च आड॥
उजवें वामांग। तुका म्हणे एक चि अंग॥
‘एक एकाच्या हृदयी’ वसत असल्याचे आणि दोघांमध्ये केवळ एका वेलांटीचा फरक असल्याचे तुकोबारायांनी ठसविले.
विठोबा तूं आमचे कुळदैवत।
आम्ही अनन्य शरणागत।।
तुझे पायी असे चित्त।
जीव आर्त भेटीचे।।
असे म्हणणाऱ्या समर्थ रामदास स्वामींनीही, ‘विठोने वाहिला शिरदेव राणा’ म्हणजे विठ्ठलाने शंकराला मस्तकावर वाहिले आहे, असे म्हटले आहे.

प्रख्यात कवी अनंतराव आठवले ‘विठ्ठले धरिले शिरी शिवलिंग ते मुक्कुटा करती’, असे म्हटले आहे. म्हणजेच विठ्ठलाने मुकुटाच्या आकाराचे शिवलिंग धारण केले आहे.
वैष्णवांच्या दृष्टीने पंढरपूर हे भूवैकुंठ तर, शैवांसाठी भूकैलास! अर्थात आता हे दोन्हीही भक्त वारकरी म्हणून एक झाले आहेत. त्यामुळेच पंढरपूरच्या वाटेवर जेव्हा जेजुरी लागते तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकरी
अहं वाघ्या सोहं वाघ्या प्रेमनगरा वारी।
मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी॥
हा संत एकनाथांचा अभंग म्हणत नाचत एकमेकांवर भंडाऱ्याची उधळण करतात.

शिवरात्रीची वारी
श्री विठ्ठलातच श्री महादेवाचे दर्शन होत असल्याने महाराष्ट्रभरातून तसेच कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यातून शिवभक्त पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी शिवरात्रीला आवर्जून येतात. शिवरात्रीला वारकरी उपवास करतात. पांडुरंगाला उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवतात, बेलपत्रे वाहतात. तसेच देवाचा गाभारा बेलपत्रांनी सजवितात. महाशिवरात्रीचा उपवास केल्यास १२ एकादशींचे पुण्य लाभते अशीही वारकऱ्यांची श्रध्दा आहे. त्यामुळे पंढरपुरात तसेच गावोगावच्या शिवमंदिरांमध्ये शिवरात्रीला वारकरी, भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. अशा या प्रेम आणि बंधुभावाचा संदेश देणाऱ्या हरिहरास महाशिवरात्रीनिमित्त ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन!🙏

लवकरच आपल्या सेवेत येत आहे – www.dnyantukaram.com

Leave a Reply

Your email address will not be published.