आपल्यातील दोष जाळण्याचा

संदेश देणारी संतांची होळी

मध्ययुगात योग, याग, विधी, नाना प्रकारची कर्मकांडे, असंख्य व्रतवैकल्ये यांचे स्तोम माजले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना देव पारखा झाला होता. अशा वेळी केवळ मनापासून देवाचं नाव घेतलं, तर देव तुम्हाला सहज प्राप्त होतो, असं संतांनी सांगितलं. सणासुदीच्या प्रथापरंपरांच्या निमित्ताने त्यांनी सांगितलं की, तुम्ही स्वतःतील दोष दूर करा, सर्वांसोबत प्रेमानं, माणुसकीनं राहा. तुमच्या चांगल्या आचरणातूनच तुम्हाला देव भेटेल. होळी या सर्वत्र साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणाच्या निमित्तानंही संतांनी हेच विचार ठसवले आहेत.

श्री ज्ञानेश्वर माऊलींचे आवाहन
माणुसकीचे विचार सांगणाऱ्या वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी घातला, ते संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या एका रचनेत म्हणतात,
वाजतसे बोंब कोणी नायकती कानीं।
हरि हरि न म्हणती तया थोर जाली हानी॥
होळीच्या दिवशीच्या तरी बोंबा ऐका आणि श्री विठ्ठलाचे नाव घ्या, असं माऊली आवाहन करतात.

संचिताची होळी कैसी होय
हेच वारकरी विचार देशभर पोचविणारे संत नामदेव म्हणतात,
अनुताप नित्य नाहीं कदाकाळीं।
मग संचिताची होळी कैसी होय॥
पवित्र ते वाचा कांरे गमाविसी।
रामनाम न ह्मणसी अरे मूढा॥३॥

टाळी वाजवितां दोषा होळी
स्वतःला नामयाची दासी म्हणवून घेणाऱ्या संत जनाबाई यांनी तर हेच नाममहिम्याचे सार अत्यंत थेट आणि सोप्या शब्दांत सांगितले आहे.
जपतप अनुष्ठान। न लगे देहासी दंडण॥
तुम्हां सांगते मी खूण। कथे उभा नारायण॥
कुंचे ढाळा तयावरी। हरुषे नाचतो श्रीहरी॥
या रे घालूं दंडवत। आला थोर लाभ येथें॥
बाहे उभारूनी टाळी। वाजवितां दोषा होळी॥
देव कथेसी सांपडे। दासी जनी पाया पडे॥
देवाचं नाव घेताना केवळ हात उभारून टाळी वाजवली तरी स्वभावातील दोषांची होळी होईल, असा नामाचा महिमा जनाबाई सांगतात.

नाथबाबांची ज्ञानाग्नीची होळी
संत ज्ञानदेव आणि संत नामदेव यांच्यानंतर वारकरी विचारांचा नंदादीप संत एकनाथांनी तेवत ठेवला. एवढंच नव्हे तर त्यांनी हे मानवतेचे विचार लोककलेच्या आणि कलाकारांच्या रुपकांतून तळागाळापर्यंत पोहचविले. त्यातून त्यांनी ‘जन खेळकर’ केला.
होळीच्या सणाच्या निमित्ताने नाथबाबा म्हणतात,
देह चतुष्ट्याची रचोनि होळी।
ज्ञानाग्नी घालुनी समुळ जाळी।।
अजुनि का न उगवलासी।
बोंब पडो दे नामाची।।
मांदियाळी मिळवा संतांची।
तुम्हा साची सोडविण्या।।
धावण्या धावती संत अंतरंग।
संसार शिमगा सांग निरसती।।
एका जनार्दनी मारिली बोंब।
जन वन स्वयंभ एक जाले।।
ज्ञानाचा अग्नी पेटवून त्यात आपले दोष, अज्ञान जाळावे, हरिनामाची बोंब मारावी असे नाथ महाराज सांगतात.
नाम सोपें भूमंडळीं। महापापां होय होळी॥
एका जनार्दनीं शरण। नाम पतीतपावन॥
असंही ते एका अभंगात सांगतात.

नामाचा महिमा किती आहे ते सांगताना एका अभंगात ते वाल्ह्या कोळ्याचा दाखला देतात.
श्रीरामानामें तारिलें पाषाण।
नामाचें महिमान कोण जाणें॥
उफराट नामें तारियेला कोळी।
दोष जाहले होळी रामनामें॥

दहन हे होळी होती दोष
संत एकनाथ महाराजांनंतर ज्यांच्या अभंगांना ‘पंचमवेद’ संबोधले गेले, ज्यांची गाथा निरक्षर माणसालाही तोंडपाठ झाली, ते वारकरी संप्रदायाचे विचार कळसाला पोचविणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज होळी सणाच्या निमित्ताने म्हणतात,
दैन्य दुःख आह्मां न येती जवळी।
दहन हे होळी होती दोष॥
सर्व सुखें येती मानें लोटांगणीं।
कोण यांसी आणी दृष्टीपुढें॥
आमुची आवडी संतसमागम।
आणीक त्या नाम विठोबाचें॥
आमचें मागणें मागों त्याची सेवा।
मोक्षाची निर्दैवा कोणा चाड॥
तुका ह्मणे पोटीं सांटविला देव।
नुन्य तो भाव कोण आह्मां॥
होळीमध्ये जर आपण आपल्यातील दोष जाळले, तर आयुष्यातील दैन्य दुःख दूर पळून जाते, असे तुकोबाराय या अभंगातून सांगतात.

दुसऱ्या एका अभंगात,
वंदू चरणरज सेवू उष्टावळी।
पूर्वकर्मा होळी करुनी सांडू।।
अमुप हे गाठी बांधू भांडवल।
अनाथा विठ्ठल आह्मा जोगा।।
पूर्व कर्मांची होळी करून श्री विठ्ठलाच्या चिंतनाने आणि संतांच्या संगतीत जीवनाचा मार्ग सोपा करून घेऊ, असं संत तुकाराम महाराज या अभंगात सांगतात. होळीच्या निमित्ताने आपल्यातील दोष जाळून टाकूया आणि चांगला माणूस, चांगला समाज घडवूया, असाच संदेश सर्व संतांनी आपल्या अभंगांमधून दिला आहे. होळीच्या निमित्ताने संतांचा हा संदेश आचरणात आणूयात, याच ।।ज्ञानबातुकाराम।। परिवारातर्फे सर्वांना शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *