सेलममध्ये माऊली-तुकोबांचा गजर

सेलम (तामिळनाडू) : संत नामदेवांनी समता, बंधुतेचे वारकरी विचार साडेसातशे वर्षांपूर्वी देशभर पोचवले. त्यांच्या या कार्याची पताका सर्वत्र अजूनही फडकते आहे. त्याचं एक उदाहरण म्हणजे, तमिळनाडूमधील सेलम हे जिल्ह्याचं ठिकाण. या ठिकाणी नुकतंच ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचं पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह टाळ मृदंगाच्या गजरात, माऊली-तुकोबारायांच्या जयघोषात पार पडला.

५ हजार भाविकांचा मेळा
तमिळनाडू राज्यात जिल्ह्याचं ठिकाण असलेल्या सेलम इथं गेल्या ८-९ वर्षांपासून ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह रंगतो आहे. हे सर्व धार्मिक कार्यक्रम आयोजित करणारे नागरिक आहेत महाराष्ट्रातले. म्हणजे सांगली जिह्यातले गलई व्यावसायिक. सोनंचांदी शुद्ध करण्याचं कसब प्राप्त केलेली ही मंडळी देशभर पसरलीत. त्यांच्यापैकी काही लोक आहे सेलम इथं राहतात. ते मुळातच माळकरी आणि आळंदी पंढरीचे वारकरी. आपलं वारकरीपण त्यांनी तमिळनाडूतही जपलं आणि ९ वर्षांपूर्वी इथं हरिनाम सप्ताह सुरू केला. इतरही नोकरी, व्यावसायिक आणि स्थानिकांनाही त्यांनी विठ्ठलभक्तीचा नाद लावला. आता इथल्या हरिनाम सप्ताहात सुमारे ५ हजार लोक सहभागी होतात.

अशी मिळाली प्रेरणा
सेलम इथं ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा सुरू होण्यापूर्वी गुडियात्तम, वेल्लूर, चित्तूर, आरकाट, आरनी, चेन्नई, कांचिपूरम, आंबूर, वनियमपाडी, तिरपत्तूर, कृष्णगिरी, धरमपुरी या गावांत गेल्या १३ वर्षांपासून असा सोहळा दरवर्षी भरतो. त्याला प्रतिसादही मोठा मिळतो. ते पाहून सेलम जिल्ह्यात स्थायिक झालेल्या हरिभक्‍तांनी हा उपक्रम सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. सुरुवातीला प्रश्‍न होता, तो मंदिर आणि जागेचा. त्यावर तिथल्या सौराष्ट्र समाजाच्या विठ्ठल-रखुमाई मंदिर संस्थानानं जागा देऊ केली. आता दरवर्षी तिथं हा भक्‍तीमेळा जमतो.

कोरोनामुळे आल्या मर्यादा
गेल्या दोन वर्षांत सप्ताह भरवण्यात कोरोनामुळे मर्यादा आल्या. पण, वर उल्लेख केलेल्या जिल्ह्यांत वास्तव्यास असलेल्या हरिभक्‍तांच्या ‘माऊली ग्रुप’ने आपापल्या घरी राहूनच श्री ज्ञानेश्‍वरी ग्रंथवाचन केले. त्यामुळे मर्यादित रुपात सोहळा साजरा झाला. पण, यंदा निर्बंध बऱ्याच प्रमाणात शिथिल झाले असल्याने सोहळ्याचा उत्साह द्विगुणित होता. यंदा ९ ते १५ मार्च या कालावधीत हा सोहळा रंगला.

मराठी परंपरांची जपणूक
ही मंडळी तामीळनाडूत गेली असली, तरी त्यांनी आपल्या सर्व मराठी प्रथा-परंपरा जोपासल्या आहेत. महाराष्ट्रभर प्रत्येक श्री विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात जसा हरिनाम सप्ताह होतो, तसाच इथं सप्ताह होतो. संपूर्ण सप्ताह कालावधीत नित्यपूजा, प्रवचन, कीर्तन, भजन, महाप्रसाद आदींचे आयोजन केले जाते. या सप्ताहासाठी कीर्तनकार महाराज सातारा आणि सांगली जिल्ह्यांतून येतात.

सोहळ्याला सर्वांचेच हात
हरिनामाचा हा सोहळा यथासांग होण्यासाठी सर्वचजण पुढाकार घेतात. प्रत्येक काम विभागून घेतात. यात प्रामुख्याने सप्ताह काळात पिण्याचे पाणी, वीज आणि ध्वनीक्षेपक यंत्रणा, काकड आरती, वाचक महिलांसाठी ६ दिवस पैठणी साडी, रंगमहाल मंडप, सतमर मंडप, प्रवचन आदींसाठी दानशूर व्यक्‍ती पुढाकार घेतात. यंदाच्या सप्ताहासाठी प्रामुख्यानं ‘सेलम मराठा सिल्वर रिफायनरी वेलफेअर असोसिएशन’नं विशेष सहकार्य केलं आहे.

सामाजिक कार्यातही पुढाकार
सप्ताह काळात रविवार आला, तर मंडळातर्फे रक्‍तदान शिबिराचं आयोजन केलं जातं. शिवाय, मंडळाकडे अशा ९० जणांची यादी तयार आहे, ज्या व्यक्‍ती कधीही रक्‍तदान करू शकतील. गरजू व्यक्‍तीला त्याच्या जागेवर जाऊन हे रक्‍त दिलं जातं. शिवाय, उत्सव काळात जो महाप्रसाद तयार केला जातो, तो उपस्थित भाविकांना दिला जातोच. शिवाय, निराधार-निराश्रीत अशा २० ते २५ व्यक्‍तींना दोन्ही वेळा हा महाप्रसाद आठवणीनं पोहचवला जातो.

एकूणच काय, तर आपल्या संतांनी दिलेली बंधुभाव,एकोपा आणि समतेची शिकवण हे तामिळनाडूत राहणारे आपले मराठी बांधव नेटानं पुढं नेत आहेत. आपली परंपरा जोपासत आहेत. संतांची शिकवण पुढच्या पिढीपर्यंत पोहचवत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *