संत गाडगेबाबांचा वैचारिक

वारसा सांगणारे गुलाबबाबा
संत गाडगेबाबांचा वैचारिक वारसा सांगणारे संत गुलाबबाबा यांचा यात्रोत्सव इंदापूर तालुक्यातील रेडा अर्थात गुलाबनगर येथे सुरू झाला आहे. कालपासून सुरू झालेल्या यात्रेचा उद्या म्हणजे महाशिवरात्रीला मुख्य दिवस आहे.

गाडगेबाबांचा आशीर्वाद
१ जुलै १९३२ मध्ये अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील टाकरखेड येथे संत गुलाबबाबांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना ईश्वर भक्तीची आवड होती. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाच्या ओढीने ते टाकरखेडवरून माहुली धाडेगावचे नारायण गुरू महाराजांच्या पालखीसोबत पंढरपूरला आले. पंढरपुरात संत गाडगेबाबांच्या कीर्तनात बाल गुलाबाने मृदंगातून ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’चा ध्वनी काढून सर्वांना मंत्रमुग्ध केले. तेव्हापासून बाल गुलाबावर गाडगेबाबांचे प्रेम बसले. पुढील अभ्यासासाठी गुलाब महाराजांना गाडगेमहाराजांनी स्वामी नामानंद महाराजांच्या स्वाधीन केले.

पंढरपुरात केले कष्ट
त्यावेळी पंढरपुरात स्वामी नामानंद आणि इतर महाराजांच्या मठाचे काम सुरू होते. शिष्यत्त्व पत्करलेल्या मुलांना तिथं काम करावं लागे. त्या कष्टाच्या कामाला कंटाळून इतर सर्व ४० मुले पळून गेली. गुलाब महाराज कठोर परिश्रम करत टिकून राहिले. पंढरपुरातील तनपुरे महाराज मठ, कैकाडी महाराज मठ, ३३ कोटी देवांच्या मंदिराचे बांधकाम आदी ठिकाणच्या बांधकामावरही त्यांनी काम केले. पंढरपुरातील साधना पूर्ण झाल्यावर ते बुलडाण्यातील संग्रामपूर तालुक्यातील काटेलधाम येथे आले. तीच त्यांची नंतर कर्मभूमी बनली. त्यांनी गाडगेबाबांच्या विचारांचा प्रसार सुरू केला. ‘मन निर्मळ ठेवा, सर्वांवर प्रेम करा’, ‘देवाचं नाव घ्या आणि अन्नदान करा’, अशी गुलाबबाबांची शिकवण होती.
राज्य आणि बाहेरही अनुयायी
विचार पटल्याने गुलाबबाबांचे राज्यभर अनुयायी तयार झाले. बाबांची जन्मभूमी टाकरखेड, कर्मभूमी काटेलधाम याठिकाणी बाबांची भव्य मंदिरे आहेत.
मध्यप्रदेशातील दमोह, सागर, गुजरातमध्ये नवसारी, नागपूर, जळगाव, औरंगाबाद, ठाणे , कल्याण या ठिकाणीही बाबांचे आश्रम आहेत. याठिकाणी बाबांचा जन्मोत्सव आणि पुण्यतिथी साजरी करण्यात येते. यानिमित्ताने भजन, प्रवचन, भंडारा यांसोबतच मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. काटेलगाव येथे महाशिवरात्री, गोकुळाष्टमी, आषाढी एकादशी आणि प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला उत्सव साजरा केला जातो.

इंदापूर तालुक्यात विचारांचे आचरण
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या गावापासून २२ किलोमीटरवर असलेल्या रेडा गावात गुलाबबाबा प्रत्यक्ष आले नाहीत. पण गावकऱ्यांनी त्यांचे विचार आचरणात आणले आहेत. पूर्वी गावातील बहुतेकजण रेड्यावरून पखालीने पाणी वाहण्याचे काम करायचे. साहजिकच गावात रेड्यांची संख्या जास्त होती त्यामुळे गावाला रेडा नाव पडले होते. गावकऱ्यांनी आता गावाचे ‘गुलाबनगर’ असे नामकरण केले आहे. पंढरपूर येथील चंद्रभागेच्या वाळवंटात दर्शनासाठी आलेल्या रेडा गावच्या गावकऱ्यांना ‘गावातील अनिष्ट प्रथा बंद करा. गाव व्यसनमुक्त करा. गोरगरिबांना अन्नदान करा’, असा गुलाबबाबांनी उपदेश दिला. त्यानुसार गावकऱ्यांनी गावात तीन एकर जागेवर आश्रम उभारला. तेथे गुलाब बाबा, साईबाबा, गजानन महाराज यांच्या मूर्ती बसविण्यात आल्या. अखंड वीणा पहारा सुरू केला. गावात २००१मध्ये आश्रम उभा राहिल्यापासून सर्व जातीधर्माचे लोक एक झाले. शुद्ध शाकाहार अवलंबून या गावात ‘घर तेथे वारकरी’ निर्माण झाला. गावातील गुलाबबाबांच्या या ठिकाणी सर्व गावकरी एकत्र येऊन विविध सण साजरे करतात. जातीपातीची बंधने तोडून एकमेकांना घास भरवतात. भाऊबीज आणि रक्षाबंधन सामुदायिक रित्या साजरे करतात. सर्वजण एकमेकांना भेटल्यावर ‘जय गुलाबबाबा’ म्हणून अभिवादन करतात. गुलाबबाबांच्या विचारांमुळे संपूर्ण गाव जणू एक कुटुंब बनले आहे. आश्रमात दोन वेळेस अन्नदान केले जाते. अनाथांचा सांभाळ केला जातो.

महाशिवरात्रीची यात्रा
महाशिवरात्री आणि त्याअगोदर दोन दिवस येथे संत गुलाबबाबांची मोठी यात्रा भरते. ही यात्रा म्हणजे गावात तीन दिवसांचा सणच असतो. विशेष म्हणजे ही यात्रा शाकाहारी असते. यात्रेच्या पहिल्या दिवशी संत गाडगेबाबांच्या संदेशानुसार परिसर स्वच्छता केली जाते. त्यानंतर गावातील शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात. दुसऱ्या दिवशी छबिना अर्थात मिरवणूक निघते. यावेळी मंदिरावर आकर्षक रोषणाई केली जाते. तिसऱ्या दिवशी काल्याचे कीर्तन होऊन भाविकांना महाप्रसाद दिला जातो. सुमारे चार हजार लोक या महाप्रसादाचा लाभ घेतात. ‘गेली दोन वर्षे कोरोनामुळे या यात्रेवर मर्यादा आली होती’, असे या मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ऍड. तानाजीराव देवकर यांनी सांगितले. आषाढ महिन्यात गावातून संत गुलाबबाबांचा पालखी सोहळा संत गाडगेबाबांचे ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ हे भजन म्हणत पंढरपूरच्या वारीसाठी रवाना होतात. ९ मार्च २००१ रोजी गुलाबबाबांचे टाकरखेडा येथे देहावसान झाले. त्यांच्या निर्वाणानंतर अनुयायांनी त्यांचे कार्य अधिकच जोमाने सुरू ठेवले आहे. या महान संताला ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार अभिवादन!

लवकरच आपल्या सेवेत येत आहे – www.dnyanbatukaram.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *