सुख, शांती आणि समाधान

हे विज्ञान आणि संतांचे ध्येय

सर्व जगातील संत, सुफी, ऋषी, मुनी आणि २० व्या शतकातील सर्व शास्त्रज्ञ यांचे ध्येय एकच आहे आणि ते म्हणजे सर्व मानवजातीचे सुख, शांती आणि समाधान. आपण नेहमीच संत, ऋषी, मुनी म्हटले की, त्या सर्वच गोष्टी धार्मिक मानतो, अंधश्रध्देच्या मानतो. परंतु एक ध्यानात असू द्या की, खरं म्हणजे संत किंवा शास्त्रज्ञ दोघेही आपआपल्या मार्गाने एकाच गोष्टीचा शोध घेत असतात. 

संतांनी निसर्गनियम सांगितले काव्यातून
शेवटी निसर्गाचं कोडं, जीवनाचं कोडं, जीवनाचं गणित आपआपल्या परीने, सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी निसर्गाचं, जीवनाचं एखादं मूलतत्त्व ते शोधून काढतात आणि जगापुढे मांडतात. २० व्या शतकातील शास्त्रज्ञ हे कोडं, गणिताच्या, पदार्थ विज्ञानाचे समीकरण वा स्वरूप देऊन जगाला सांगतो आणि आमचे संत निसर्गाचा तोच नियम वा तत्त्व व तेच सूत्र अत्यंत काव्यात्म पध्दतीने, शब्दरूप करून सांगतात. एवढाच फरक,
ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या।
जय जय स्वयंवेद्या आत्मरूपा।।
या ओवीमध्ये आद्या हा शब्द ‘अल्टीमेट स्टेट ऑफ मॅटर’ म्हणजे जगातील सर्व व्याप्त अशा पदार्थांचे अंतिम स्वरूप काय, असा हा विषय आहे.

श्रीकृष्ण अर्जुनाला विज्ञान समजून घेण्यास सांगतात
ॲटॉमिक स्ट्रक्चर असो वा न्यूटॉन, प्रोटॉनसारख्या अतिसूक्ष्म अशा कणाचा शोध असो, हे सर्व निसर्गाचे भाग आहेत व त्याचा अंतिम रूपाचं दर्शन आहे. जेवढा कण सूक्ष्म तेवढी त्याची शक्ती जास्त असाही एक सिध्दांत आहे. गीतेच्या आणि ज्ञानेश्वरीच्या सातव्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा संवादच एवढा बोलका आहे की, कृष्ण परमात्माच अर्जुनाला सांगतो आहे, “हे अर्जुना, तुला जर खंर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, तर तू प्रथम विज्ञान समजून घे. इथे अत्यंत स्पष्टपणे कृष्णाने विज्ञान असा शब्द वापरला आहे. आपल्याला वाटत असेल की विज्ञान वा सायन्स हा शब्द इंग्लंडमध्ये दोन अडीचशे वर्षापूर्वी जेम्सवॅटने वाफेच्या इंजिनाचा शोध लावला तेव्हा पुढे आला. खरं म्हणजे या भारत देशामध्ये किमान ५००० वर्षापूर्वी विज्ञान या शब्दाचा व विज्ञानाचा खरा अर्थ कृष्णाने अर्जुनाला समजावून सांगितला आहे. आपल्याला मात्र त्याचा विसर पडला, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे.

जन्मले ते नाश पावणार
कृष्णाने अर्जुनाला विज्ञानाची पूर्ण व्याख्या सांगितली, फक्त तीनच शब्दांत! ‘प्रपंच ज्ञान ते विज्ञान’, ‘स्वरूप ज्ञान ते ज्ञान’ ‘स्व’रूप, स्वत:चे खरे अंतरंग आत्म्याचे खरे स्वरूप समजणे, जीवनाचे खरे अंतिम ध्येय आणि उद्देश समजणे याला त्यांनी ‘स्वरूप ज्ञान’ वा खरे ज्ञान म्हटले आहे. मित्रहो, इतकी सुंदर, परिपूर्ण आणि वैज्ञानिक व्याख्या विज्ञानाची, ज्ञानाची जगाच्या पाठीवर कोणीही दिली नाही. ‘जे जन्मले ते नाश पावणार आणि जे नाश पावले ते पुन्हा उगवणार’ हे निसर्गाचे ज्ञानेश्वरीतील तत्त्व म्हणजे दुसरे तिसरे काही नसून पदार्थ विज्ञानाचा पहिला नियम आहे. निसर्गातील प्रत्येक क्रिया, प्रक्रिया नेहमी एकाच दिशेने घडते व ती नेहमी डिसऑर्डर वा विस्कळीतपणा निर्माण करते हा सिध्दांत म्हणजे दुसरे तिसरे काही नसून पदार्थ विज्ञानाचा जो तिसरा नियम (लॉ ऑफ इनक्रिज ऑफ एन्ट्रॉपी) आहे.

ज्ञानेश्वरी आणि गाथेत विज्ञान
ज्ञानेश्वरांनी स्पष्टपणे असे म्हटले आहे की, ‘अग्नी पाण्यात वास करतो’ वा ‘अग्नी पाण्यात राहतो’ किती गंमत आहे पाहा. अग्नीच पाण्याने विझून जातो, संपून जातो, असं असताना अग्नीच पाण्यात राहतो असे म्हणणे, म्हणजे तत्त्वाला बाधा आल्यासारखं वाटतं. परंतु ज्यांनी या विश्वाच्या उत्पत्तीचा सखोल अभ्यास केला होता, त्याचं चिंतन केलं होतं, ज्यांना निसर्गातील पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्त्वाची जाण होती त्यांनी या गोष्टीचा खूप खोल विचार करून वरील तत्त्व सांगितले आहे. हे आपण थोडासा सध्याच्या विज्ञानावर आधारित विचार केला तर कळू शकेल. आपल्या वेदांना धार्मिक ग्रंथ न मानता, त्यातील कर्मकांडाचा भाग वगळून इतर सर्व तात्त्विक विषयांचे मनन-चिंतन व्हावे. त्याकडे वेदशास्त्र म्हणून पाहावे. गाथा आणि ज्ञानेश्वरी हे वैज्ञानिक आणि जीवनाचे ग्रंथ म्हणून त्याकडे डोळसपणे पाहावे. वैज्ञानिक जीवनाला खऱ्या अर्थाने अध्यात्माचा स्पर्श व्हावा, हीच प्रार्थना.

(प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, युनेस्को अध्यासन प्रमुख व अध्यक्ष, एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे यांच्या लिखाणातून साभार.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *