हेचि घडो मज जन्मजन्मांतरी।

मागणे श्रीहरी नाही दुजे।।

आषाढी वारीला संतांच्या पालख्या पंढरपुरात पोहोचल्या, की वारी संपली असा आपला सर्वसाधारण समज असतो. परंतु वारीचा मुख्य दिवस असलेल्या आषाढी एकादशीला कोणते धार्मिक कार्यक्रम होतात? संतांच्या पालख्या किती दिवस पंढरपुरात थांबतात? त्यांचा दिनक्रम काय असतो? या सर्व प्रश्नांची ही सविस्तर दिलेली उत्तरे…

ह. भ. प. अभय जगताप

संपदा सोहळा नावडे मनाला। लागला टकळा पंढरीचा।। ज्येष्ठ महिना आला, की वारकऱ्यांच्या मनाची अवस्था अशी होते. वेगवेगळ्या संत क्षेत्राहून संतांच्या पालख्या शेकडो दिंड्यांसहित आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघतात. वारीमध्ये सहभागी नसलेले अनेक जण वारीचा हा सोहळा वर्तमानपत्र, टीव्ही आणि इतर माध्यमांतून अनुभवत असतात. या काळात सर्व महाराष्ट्रच वारीमय झालेला असतो.

पलंग निघणे

खुद्द पंढरपूरमध्येसुद्धा आषाढ महिना सुरू होताच वारीच्या कार्यक्रमांना सुरुवात होते. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात रोज सकाळी काकड आरती, त्यानंतर देवाचा अभिषेक आणि आरती, दुपारी महानैवेद्य, संध्याकाळी साडेचार वाजता पोशाख, सायंकाळी धुपारती, रात्री शेजारती आणि त्यानंतर देवाची निद्रा असे उपचार रोज होत असतात. उपचारादरम्यान आणि रात्री शेजारतीनंतर पहाटपूजेनंतरची आरती होईपर्यंत असे एकूण आठ-नऊ तास दर्शन बंद असते. आषाढी वारीमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी होते. एकादशीच्या दिवशी दर्शनासाठी भाविकांना २४ ते ४८ तास रांगेत थांबावे लागते. भक्तांना जशी देवाच्या दर्शनाची ओढ असते, त्याप्रमाणेच देवसुद्धा भक्तांना भेटण्यासाठी आसुसलेला असतो.

वारीमध्ये अधिकाधिक भक्तांना देवाचे दर्शन घेता यावे, यासाठी देवाचे काही उपचार बंद केले जातात. यालाच पलंग निघणे असे म्हणतात. पूर्वी आषाढ शुद्ध पंचमीच्या सुमारास देवाचा पलंग निघत असे. आता आषाढ शुद्ध प्रतिपदेला म्हणजे आषाढ महिना लागताच पहिल्याच दिवशी देवाचा पलंग निघतो. यादिवशी शेजघरामधील देवाचा पलंग बाहेर काढला जातो. या दिवसापासून देवाची झोप बंद. त्यामुळे श्रमपरिहारार्थ देवाच्या मागे लोड, रुक्मिणी मातेच्या मागे तक्का लावण्यात येतो. दुपारचा पोषाख बदल, सायंकाळची धुपारती, रात्रीची शेजारती आणि झोप इत्यादी उपचार बंद करण्यात येतात. फक्त सकाळची पूजा आणि दुपारचा नैवेद्य होतो. सायंकाळी लिंबूपाणी आणि रात्री दूध साखरेचा नैवेद्य दाखवतात.

पालख्यांचा पंढरपूर प्रवेश

आषाढ शुद्ध षष्ठीच्या सुमारासच काही पालख्या पंढरपूरमध्ये प्रवेश करतात. यामध्ये खान्देशातून येणाऱ्या संत मुक्ताबाई यांचा पालखी सोहळा हा महत्त्वाचा सोहळा आहे. शुद्ध नवमीला बहुतेक सर्व महत्त्वाच्या पालख्या पंढरपूर जवळील वाखरी येथे मुक्कामाला येतात. वाखरी हे ठिकाण पंढरपूर पासून आठ किलोमीटरवर आहे. नवमीला याठिकाणी माऊलींच्या पालखीचे उभे आणि गोल रिंगण होते. हा सोहळा पाहण्यासाठी अनेक पंढरपूरकर गर्दी करतात. हा मुक्काम पंढरपूरपासून जवळ असल्याने अनेक वारकरी नवमीला अथवा दशमीला पंढरपुरात येऊन चंद्रभागा स्नान आणि नगरप्रदक्षिणा हा महत्त्वाचा विधी उरकून घेतात. पुन्हा वाखरीला आपापल्या सोहळ्यामध्ये सहभागी होतात. दशमीला पहाटेपासूनच वाखरीवरून वेगवेगळ्या पालख्या पंढरपूरमध्ये यायला सुरुवात होते.

नामदेवराय जातात सामोरे

दशमीला सकाळी पंढरपुरात आधीच प्रवेश केलेल्या मुक्ताबाईंची पालखी आणि पंढरपूर येथील केशवराज संस्थानमधून निघणारी संत नामदेवांची पालखी सर्व संतांच्या स्वागतासाठी वाखरीच्या दिशेने निघते. नामदेवराय म्हणजे पांडुरंगाचे प्रतिनिधी. नामदेव राय आले म्हणजे पांडुरंग आला अशी वारकऱ्यांची श्रद्धा असते. नामदेवरायांचा पालखी सोहळा पंढरपूर आणि वाखरी यामधील पादुका मंदिरापाशी येतो, तेव्हा माऊलींच्या पालखी सोहळ्याचे चोपदार तेथे येऊन नामदेवरायांना पुढे चालण्याची विनंती करतात. त्यानंतर शेवटचे सात पालखी सोहळे पंढरपूरकडे मार्गस्थ होतात.

पंढरपूर प्रवेशामध्ये शेवटच्या सात पालख्यांचा क्रम ठरलेला आहे. यामध्ये सर्वात शेवटी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, त्यांच्या पुढे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, त्यापुढे संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपान काका, संत मुक्ताबाई आणि पंढरपूरवरून संतांच्या स्वागताला आलेले संत नामदेवराय असा क्रम असतो. विठ्ठल रुक्मिणी पादुका मंदिरापाशी आल्यावर बहुतेक पालखी सोहळ्यामध्ये उभे रिंगण होते. हे सोहळ्यातले शेवटचे रिंगण. पंढरपूरच्या वेशीवर सर्व पालखी सोहळ्यांचे उत्साहात स्वागत केले जाते. सर्वात शेवटी असलेला माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये पोहोचायला रात्रीचे दहा वाजतात.

पंढरपुरातील मुक्काम

दशमी ते चतुर्दशी पाच दिवस पालख्यांचा मुक्काम पंढरपूरमध्ये असतो. यापैकी एखादी तिथी कमी अथवा अधिक झाल्यास मुक्कामाचा एखादा दिवस कमी जास्त होतो. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मुक्काम नाथ चौक येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये असतो. संत एकनाथ महाराजांची पालखी नाथ चौकातील नाथ मंदिरात उतरते.

संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी बेलापूरकर मठामध्ये उतरते. ही तीनही ठिकाणे नाथ चौकाजवळ आहेत. संत तुकाराम महाराजांची पालखी प्रदक्षिणा मार्गावरील संत तुकाराम महाराज मंदिरात उतरते. संत सोपान काकांची पालखी तांबड्या मारुतीजवळील संत सोपान काका पालखी मंडपामध्ये, तर मुक्ताबाईंची पालखी तेथून जवळ असलेल्या मुक्ताबाई मंदिरामध्ये उतरते. शेगाव येथील गजानन महाराज संस्थानने पंढरपूरमध्ये मोठे प्रशस्त मंदिर आणि भक्तनिवास बांधले आहे. संत गजानन महाराजांची पालखी तेथे मुक्कामाला असते.

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीचा दिवस हा वारीचा मुख्य दिवस. या दिवशी भल्या पहाटेपासून चंद्रभागा स्नानास गर्दी होते. किंबहुना दशमीच्या रात्री आणि एकादशीस दिवसभर चंद्रभागा स्नान चालूच असते, असे म्हणायला हरकत नाही. आषाढी एकादशीला पहाटे विठ्ठल मंदिरामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची महापूजा करण्यात येते. ही महापूजा शासनाच्या वतीने, शासनाच्या खर्चाने केली जाते. त्यामुळे याला शासकीय महापूजा असे म्हणतात. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी त्या त्या संतांच्या पादुकांची पूजा करण्यात येते. त्यानंतर संतांच्या पालख्या नगरप्रदक्षिणेसाठी निघतात. नगरप्रदक्षिणा म्हणजे पंढरपूर नगराला प्रदक्षिणा. अर्थात आताच्या विस्तारित पूर्ण पंढरपूरला प्रदक्षिणा करणे अपेक्षित नसून जुन्या पंढरपूरला प्रदक्षिणा करणे म्हणजेच नगरप्रदक्षिणा करणे अपेक्षित आहे.

या प्रदक्षिणा मार्गावर काही ठिकाणी पूर्वी जुन्या गावाच्या खुणा असलेल्या वेशी होत्या, जसे की महाद्वार वेस. पण पुढे गर्दीच्या नियोजनाच्या दृष्टीने केलेल्या पंढरपूरच्या नगरविकास आराखड्यामध्ये या वेशी काढून टाकण्यात आल्या. नगर प्रदक्षिणा मार्ग महाद्वार घाटावरून कालिका मंदिर चौक, तेथून वळून काळा मारुती चौक, तेथून पुन्हा वळून गोपाळकृष्ण मंदिरापासून नाथ चौक, तेथून पुन्हा वळून तांबड्या मारुतीपासून पुन्हा महाद्वार घाट असा आहे. या मार्गावर कोठूनही प्रदक्षिणेस सुरुवात करून पुन्हा त्या ठिकाणी आले म्हणजे प्रदक्षिणा पूर्ण होते.

पहिली प्रदक्षिणा गजानन महाराजांची 

गजानन महाराजांची पालखी पहाटे अडीच वाजता नगरप्रदक्षिणा निघते. तर, ज्ञानेश्वर माउलींची पालखी सर्वात शेवटी म्हणजे सकाळी आठच्या सुमारास नगरप्रदक्षिणेस निघते. नगर प्रदक्षिणेच्या मार्गावर पालखी चंद्रभागेजवळ आल्यावर रथातून पालखी काढून चंद्रभागेच्या वाळवंटात नेली जाते. पालखीतून पादुका बाहेर काढून त्यांना चंद्रभागा स्नान घालण्यात येते. तर काही पालख्यांमध्ये पादुका हातात घेऊन वाळवंटात नेतात आणि त्यांना चंद्रभागा स्नान घालतात. यावेळेस उपस्थित भाविकसुद्धा देवावर पाणी उडवतात. त्यानंतर पुन्हा उर्वरित नगर प्रदक्षिणा पूर्ण केली जाते. नगरप्रदक्षिणा मार्गावर महाद्वार चौकामध्ये महाद्वारासमोर अभंग आणि आरती होते. चौफाळा चौकामधून देवाच्या मंदिराचा कळस दिसतो. तिथे संत नामदेवरायांचा पुढील अभंग म्हणतात.

झळझळीत सोनसळा। दिसतो कळस सोज्वळा।।

बरवे बरवे पंढरपूर। विठोबा रायाचे नगर।।

हे माहेर संतांचे। नामयास्वामी केशवाचे।।

याशिवाय मार्गामध्ये वाळवंटात आल्यावर चंद्रभागेचा, पुंडलिक मंदिरासमोर पुंडलिकाच्या वर्णनाचा आणि त्या त्या संतांच्या मठापुढे त्या त्या संतांच्या वर्णनाचा अथवा इतर कोणताही संतपर अभंग म्हणतात. नगरप्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर पालखी आपापल्या मठामध्ये परत येते. त्यावेळेस ‘देह जावो अथवा राहो’ हा अथवा अशाच अर्थाचा इतर अभंग होऊन आरती होते. एकादशी हा उपवासाचा दिवस. या दिवशी देवाला आणि संतांनासुद्धा उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व वारकऱ्यांना देव दर्शन होणे शक्य नसते. गर्दीमुळे विठ्ठल मंदिरातूनसुद्धा रथ अथवा पालखी निघत नाही.

पेशवे काळामध्ये पेशव्यांचे एक सरदार खाजगीवाले यांनी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची रथयात्रा सुरू केली. ही रथयात्रा खाजगीवाले वाडा येथून म्हणजे आताच्या माहेश्वरी धर्मशाळेतून निघते. या रथयात्रेसाठी लाकडी दुमजली रथ आहे. हा रथ भाविक हाताने ओढतात. या रथामध्ये विठ्ठल, राही आणि रुक्मिणी यांच्या मूर्ती ठेवून रथ ओढायला सुरुवात करतात. नगरप्रदक्षिणा मार्गावरून फिरून रथ पुन्हा माहेश्वरी धर्मशाळेत येतो.

एकादशीचे कीर्तन महत्त्वाचे

आषाढी एकादशीच्या रात्री होणारे कीर्तन हे वारीतले महत्त्वाचे कीर्तन. हे कीर्तन त्या त्या पालखीपुढे त्या त्या पालखी सोहळ्याचे मालक अथवा महत्त्वाचे मानकरी करतात. प्रत्येक फडावर या दिवशी स्वतः मालक कीर्तन करतात. श्री विठ्ठल वर्णन, पंढरी वर्णन अथवा अखंड पंढरीची वारी घडावी, अशा मागणीपर अभंगावर कीर्तन होते. कीर्तनानंतर जागर होतो. जागर म्हणजे रात्रभर चालणारे भजन.

सोहळ्यामध्ये रोज जागर होत असला, तरी एकादशीच्या जागराला विशेष महत्त्व आहे. कारण एरवीसुद्धा एकादशी हा जागरणाचा दिवस मानला जातो. त्यामुळे विठ्ठल मंदिरात आणि इतर संत क्षेत्री एकादशीच्या रात्री शेजारती होत नाही. रात्रभर जागर झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला पहाटे काही ठिकाणी पुन्हा कीर्तन होते. त्यानंतर देवाला नैवेद्य होऊन लोक उपवास सोडतात. याला बारस सोडणे असे म्हणतात. महत्त्वाच्या पालखी सोहळ्यातर्फे श्री विठ्ठल मंदिरामध्ये पांडुरंगास नैवेद्य पाठवला जातो.

खिरापतीचे कीर्तन 

द्वादशीच्या रात्री जे कीर्तन होते त्याला खिरापतीचे कीर्तन असे म्हटले जाते. या कीर्तनानंतर खिरापतीचा अभंग म्हणतात आणि त्यानंतर खिरापत म्हणजे कुरमुरे अथवा चिवड्याचा प्रसाद वाटतात. त्रयोदशी आणि चतुर्दशीच्या दिवशी त्या-त्या मठामध्ये सकाळची पूजा, दुपारी नैवेद्य, रात्री एकदा अथवा सकाळ आणि रात्री अशी दोन कीर्तने आणि रात्रभर जागर असे कार्यक्रम होतात. काही वारकरी दशमीला पंढरपूरमध्ये प्रवेश केल्यावर एकादशी सुरू होताच रात्री बारा वाजताच परत फिरतात.

बहुतांश वारकरी एकादशीला चंद्रभागा स्नान आणि नगरप्रदक्षिणा करून माघारी निघतात. निष्ठावान वारकरी एकादशीचे रात्रीचे कीर्तन आणि दुसऱ्या दिवशी बारस सोडून परतात. तर काही वारकरी पौर्णिमेपर्यंत थांबतात. पायी वारी करणाऱ्या सर्वच वारकऱ्यांना प्रत्यक्ष विठ्ठल मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेणे शक्य होत नाही. पंढरपूरमध्ये पोचले, की त्यांची वारी पूर्ण होते. वारीच्या काळात कळस दर्शनालाही महत्त्व आहे. शिवाय वारीमध्ये देव वाळवंटात असतो, अशीही एक श्रद्धा आहे. संत साहित्यात असे अनेक उल्लेख आढळतात. निष्ठावान वारकर्‍यांचा भर चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा, कीर्तन, भजन या गोष्टींवर असतो.

काला

पौर्णिमा हा काल्याचा दिवस. वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही उत्सवाची अथवा उपक्रमाची सांगता काल्याने होते. वारीची सांगता सुद्धा आषाढी पौर्णिमेला काल्याने होते. हा काला पंढरपूरजवळील गोपाळपूर या ठिकाणी होतो. या ठिकाणी काला करण्यासाठी सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरमधून निघून गोपाळपूरला जातात. अपवाद म्हणजे संत एकनाथ महाराजांची पालखी. संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा काला श्री विठ्ठल मंदिरामध्ये देवासमोर लाकडी सभामंडपामध्ये होतो. पौर्णिमेच्या दिवशी पहाटे देहूकरांच्या फडावर पहाटे चार ते सहा या वेळेत पत्रिकेच्या अभंगाचे कीर्तन होते.

एके वर्षी आजारी असल्यामुळे संत तुकाराम महाराजांना पंढरीची वारी करता आली नाही. तेव्हा त्यांनी काही वारकऱ्यांजवळ देवाला निरोप म्हणून काही अभंग लिहून पाठवले. आजारी पडल्यामुळे तुकोबांच्या मनाची झालेली अवस्था, वारकऱ्यांच्या जवळ पाठवलेले निरोपाचे अभंग, वारकरी परत येईपर्यंत झालेली मनाची अवस्था, वारकऱ्यांकडून आलेला निरोप आणि त्यानंतर महाराजांची अवस्था हे सर्व वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्याला पत्रिकेचे अभंग असे म्हटले जाते. या कीर्तनामध्ये हा सर्व प्रसंग सांगून या अभंगातील प्रमाणे घेतली जातात.

गोपाळपूर

गोपाळपूर हे ठिकाण पंढरपूरपासून दक्षिणेस दोन किलोमीटरवर आहे. या ठिकाणी एका टेकडीवर गोपाळकृष्णाचे मंदिर आहे. हे मंदिर अत्यंत प्रेक्षणीय, दगडी बांधकामाचे असून मंदिराच्या कडेने किल्ल्याप्रमाणे तटबंदी आहे. मंदिराच्या आवारातच देवाचे सासरे भीमकराज आणि जनाबाई इत्यादींची मंदिरे आहेत. गोपाळकृष्णाची मूर्ती देहुडाचरणी वेणू वाजवणाऱ्या रूपात आहे. या मूर्तीचा चेहरा आणि पंढरपुरातील मुख्य मंदिरातील पांडुरंग मूर्तीचा चेहरा बराचसा सारखा आहे. या मंदिराच्या परिसरामधे बरीच मोकळी जागा आहे. संतांच्या पालख्या पहाटेपासून गोपाळपूरला यायला सुरुवात होते. मंदिर परिसरामध्ये ठरलेल्या ठिकाणी पालखी विसावते.

पालखीसमोर काल्याचे कीर्तन होते. काही पालख्यांमध्ये कीर्तनाऐवजी काल्याचे भजन होते. त्यानंतर काल्याचा प्रसाद म्हणजे कुरमुरे वाटतात. भाविकसुद्धा एकमेकांना काला भरवतात. यानंतर पालख्या गोपाळकृष्ण मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालून पुन्हा पंढरपूर मध्ये परत येतात. काही पालखी सोहळ्यांमध्ये पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपूरला जाताना पुन्हा एकदा चंद्रभागा स्नान होते. काला झाला म्हणजे वारीची सांगता होते आणि संतांच्या पालख्या भोजनानंतर आपापल्या गावी परत निघतात.

देवभेट

गेल्या वीसेक वर्षांपासून संतांच्या पादुका मुख्य विठ्ठल मंदिरात देवाच्या भेटीसाठी नेण्याचा प्रघात सुरू झाला आहे. यानुसार संतांच्या पादुका हातात घेऊन अथवा पालखीसह श्रीविठ्ठल मंदिरात नेतात. तेथे पादुका पांडुरंगाजवळ आणि रुक्मिणी मातेकडे नेतात. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीतर्फे पादुकांचे स्वागत आणि पूजा होते. देवाच्या अंगावरील उपरणे, गळ्यातील हार इत्यादी पादुकांना घातले जातात. तर त्या त्या संत संस्थानतर्फे देवाला उपरणे, हार इत्यादी अर्पण केले जातात. देव भेटीनंतर पालख्या आपल्या मठामध्ये परततात.

निरोप

देवदर्शनानंतर पालखी आपापल्या ठिकाणी परत आल्यावर नैवेद्य, भोजन होऊन दुपारनंतर पालखीच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. यावेळेस संत निळोबारायांचा पुढील अभंग अथवा अशाच अर्थाचे इतर अभंग म्हटले जातात.

पंढरीहुनि गावी जातां। वाटे खंती पंढरीनाथा।।

आता बोळवीत यावे। आमुच्या गावा आम्हासवे।।

तुम्हां लागी प्राण फुटे। वियोग दु:खे पूर लोटे।।

निळा म्हणे पंढरीनाथा। चला गावा आमुच्या आता।।

पालख्यांना निरोप देण्यासाठी पंढरपूरकर वेशीपर्यंत येतात.

पालखी नगरप्रदक्षिणा

पौर्णिमेच्या रात्री देवाची पालखी नगरप्रदक्षिणा निघते. आषाढी आणि कार्तिकी वारीमध्ये स्थानिक भाविकांना दर्शन मिळणे अवघड होते. ते आलेल्या भाविकांच्या व्यवस्थेमध्ये आणि आपापल्या व्यवसायामध्ये व्यस्त असतात. त्यामुळे स्थानिकांना दर्शन देण्यासाठी पौर्णिमेच्या रात्री देवाची पालखी नगरप्रदक्षिणेस निघते. यावेळी पालखी सोबत वासुदेव, दिवटे आणि आंबेकर आजरेकर फडाच्या चवरे महाराजांची दिंडी असते. पौर्णिमेपासून पुढे पंचमीपर्यंत रोज रात्री देवासमोर गरुड खांबापाशी चवरे महाराजांचे भजन होते.

महाद्वार काला

संतांचा काला जरी पौर्णिमेला झाला, तरी देवाचा काला मात्र संतांना निरोप दिल्यावर पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे वद्य प्रतिपदेला होतो. याला महाद्वार काला असे म्हणतात. या महाद्वार काल्यामध्ये मिरवल्या जाणाऱ्या पादुका देवाचे एक सेवेकरी असलेले हरिदास यांच्याकडे आहेत. या पादुका हरिदास वेशीपाशी हरिदासांच्या ज्या वाड्यामध्ये असतात, त्याला काल्याचा वाडा असे म्हणतात. महाद्वार काल्याच्या दिवशी काल्याच्या वाड्यामधे या पादुका मानकरी हरिदास यांच्या डोक्यावर फेट्यामध्ये बांधतात. पादुका डोक्यावर बांधताच त्यांची शुद्ध हरपते. पूर्वी नामदेव महाराजांनी देवाला खांद्यावर घेऊन महाद्वार काला केला असे मानले जाते. त्यामुळे आता सुद्धा नामदेवांचे वंशज नामदास महाराज डोक्यावर पादुका बांधलेल्या हरिदासांना आपल्या खांद्यावर घेतात आणि हा काल्याचा सोहळा करतात. ही काल्याची मिरवणूक नामदास महाराजांच्या दिंडीसह काल्याच्या वाड्यातून विठ्ठल मंदिरात येते. तेथे देवासमोरील सभामंडपामध्ये या पादुकांवर हंडी फोडली जाते.

नामदास महाराज हरिदासांना खांद्यावर घेऊन लाकडी मंडपामध्ये तीन प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर दिंडीसह मिरवणूक महाद्वारातून बाहेर येते. तेथून महाद्वार घाटाने खाली चंद्रभागेवर आणि तेथून खाजगीवाले वाडा (आताची माहेश्वरी धर्मशाळा) या मार्गाने पुन्हा काल्याच्या वाड्यात परत येते. मार्गामध्ये ठिकठिकाणी भाविक पादुकांवर दही, लाह्या उधळतात. पूर्ण मार्गामध्ये नमदास मंडळी आळीपाळीने हरिदासांना आपल्या खांद्यावर उचलून घेतात. दिंडी काल्याच्या वाड्यात परत आल्यावर आरती होते आणि या उत्सवाची सांगता होते. महाद्वार काला झाला म्हणजे आषाढी वारीची सांगता झाली.

प्रक्षाळ पूजा

यानंतर वारीनिमित्त बंद झालेले देवाचे उपचार पुढे वद्य पंचमीच्या आसपास सुरू केले जातात. या पूजेला प्रक्षाळ पूजा असे म्हणतात. प्रक्षाळ म्हणजे धुणे अथवा स्वच्छ करणे. वारीच्या काळात गर्दीमुळे अस्वच्छ झालेले मंदिर धुणे, मंदिराची स्वच्छता करणे आणि वारीनिमित्त देवाला आलेला शिणवटा घालवणे असे या पूजेचे दोन भाग आहेत. पंचमीच्या आदल्या रात्री देवाच्या मागे लावलेला लोड काढून घेतात आणि देवाच्या पूर्ण अंगाला तेल लावून मर्दन करतात. पंचमीला पहाटे देवाला औषधी वनस्पतीपासून बनवलेले उटणे लावून स्नान घालतात. या पूजेनंतर भाविक देवाच्या पायांना लिंबू साखर लावतात. मूर्तीची झीज होऊ नये म्हणून आता देवाच्या पायावर चांदीचे कवच ठेवून त्यावर लिंबू साखर लावले जाते. हा उपक्रम पहाटपूजेपासून साधारण सकाळी अकरा वाजेपर्यंत चालू असतो.

अकरा वाजता देवाला पहिले स्नान घातले जाते. याला पहिले पाणी असे म्हणतात. यावेळेस देवावर पांढरे तलम उपरणे पांघरून त्यावरून गरम पाण्याने स्नान घातले जाते. पहिले पाणी झाले म्हणजे देवाला साधे धोतर नेसवून अंगावर उपरणे पांघरतात. यानंतर पुन्हा दर्शन सुरू होते. देवाचा मुख्य नैवेद्य दुसऱ्या स्नानानंतर होतो. काही भाविक पहिले पाणी झाल्यावर देवाला नैवेद्य आणत. पूर्वी स्थानिक ब्राह्मणांचे सोवळ्यातले पुरणाचे नैवेद्य देवापर्यंत थेट नेता येत असत. ब्राह्मणेतर मंडळी संध्याकाळी दूध आणि पेढे असा नेवेद्य रांगेतून आणत. आता स्थानिकांचे नैवेद्य थेट देवापाशी सोडणे बंद झाल्यामुळे हे नैवेद्य येत नाहीत. संस्थानतर्फेच नैवेद्य होतो.

यानंतर दुपारी दोनच्या सुमारास दुसरे पाणी होते. यावेळेस पांडुरंगाला रुद्राभिषेक आणि रुक्मिणी मातेला पवमान अभिषेक होतो. एकवीस ब्राह्मण सभामंडपामध्ये रुद्र म्हणतात. त्यावेळेस देवाला गायीच्या शिंगातून दुधाचा अभिषेक केला जातो. या अभिषेकानंतर पांडुरंग आणि रुक्मिणी मातेस जरीचा पोशाख आणि दागिने घालतात. यानंतर देवाला महानैवेद्य आणि आरती होते. देवाचा पलंग पुन्हा शेजघरामध्ये ठेवतात.

या पूजेपासून देवाच्या उपचारास पुन्हा सुरुवात होते. सायंकाळी धुपारती आणि रात्री शेजारती होते. प्रक्षाळ पूजेनिमित्त मंदिरात फुलांची आरास करण्यात येते. रात्री शेजारतीच्या वेळेस देवाला औषधी काढ्याचा नैवेद्य दाखवला जातो. तुळस, बडीशेप, लवंग, दालचिनी इत्यादी औषधी पदार्थ पाण्यामध्ये उकळून हा काढा बनवला जातो. दुसर्‍या दिवशी या काढ्याचा प्रसाद भाविकांना वाटतात. अशा रितीने जवळ जवळ तीन आठवडे पंढरपुरात आषाढीची लगबग चालू असते.

4 thoughts on “असा असतो आषाढीचा सोहळा

  1. अभ्यासपूर्ण अन् सुंदर माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद ..जय हरी..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *