नाथषष्ठीनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; ओळखपत्र आवश्यक
औरंगाबाद : श्री संत एकनाथ महाराजांच्या षष्ठी उत्सवासाठी येणाऱ्या सर्व वारकऱ्यांनी कोव्हीड प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.
पैठणमध्ये दाखल होण्यापूर्वी दिंडीप्रमुखांनी त्यांच्या सदस्यांसह कोव्हीड प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. त्यासाठी ओळखपत्र सोबत ठेवावे, अशी विनंतीही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी नाथ मंदिर विश्वस्तांमार्फत सर्व भाविकांना केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, तहसीलदार डी. बी. निलावाड, उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहूल, नाथ वंशज रघुनाथबुवा गोसावी, योगेश गोसावी, मधुसुदन रंगनाथबुवा, छैय्या महाराज गोसावी, हरिपंडित गोसावी, विनित गोसावी, श्रेयस गोसावी, नगर पालिका मुख्याधिकारी संतोष आगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सु.सो. शेळके, डॉ.पी.एम. कुलकर्णी आदींसह सर्व यंत्रणांचे प्रमुख आदींची उपस्थिती होती.
पैठणमध्ये आलेल्या भाविकांसाठी पाटबंधारे विभागाने २० ते २५ मार्च या कालावधीत गोदावरी नदीपात्रात पाणी सोडावे असे निर्देशही चव्हाण यांनी यावेळी दिले.
नाथ षष्ठीनिमित्त २० ते २५ मार्च या कालावधीत पैठणमधील चार विविध ठिकाणी लसीकरण पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे. यामध्ये २० व्हॅक्सीनेटर एकाच वेळी लस देऊ शकतील, अशी यंत्रणा आरोग्य विभागाने तयार करावी. याशिवाय १० व्हॅक्सीनेटर अधिक असतील, याचीही व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागाला दिल्या.
याशिवाय पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवावा. वीज विभागाने लोडशेडिंग होणार नाही, याची दक्षता घेत आवश्यक त्याठिकाणी जनित्रांची व्यवस्था करावी, नगर पालिका प्रशासनाने आवश्यक त्या कामांसह स्वच्छतेवर भर द्यावा, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने औरंगाबाद-पैठण रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने आवश्यक त्या साधनसामुग्रीसह पथके तयार ठेवावीत, आरोग्य यंत्रणांनी मुबलक औषध साठ्यांसह आरोग्य पथके नेमावीत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
गटणे, नाथ वंशजांसह, मंदिर विश्वस्त, अधिकारी यांनीही बैठकीत सूचना मांडल्या, त्यावरही चव्हाण यांनी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.