इतिहासातील सर्वांत मोठी दिंडी;
हजारो टाळकरी होणार सहभागी
पैठण : शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे यंदा ४२५ वे वर्ष आहे. त्यानिमित्त यंदा नाथषष्ठी उत्सवाच्या पहिल्या दिवशी (दि. ३१ मार्च, फाल्गुन वद्य षष्ठी) श्री क्षेत्र पैठण येथे विश्वविक्रमी ऐतिहासिक महादिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात हा सर्वांत मोठा दिंडी सोहळा असणार आहे. यात हजारो टाळकरी, झेंडेकरी यांचा सहभाग असणार आहे.
या संपूर्ण सोहळ्याची माहिती नाथवंशज तथा सोहळ्याचे आयोजक ह. भ. प. योगीराज महाराज गोसावी यांनी दिली. या भव्यदिव्य सोहळ्यात समस्त नाथवंजश आणि परंपरेचे सर्व मानकरी सहभागी होणार आहेत. नाथ षष्ठीच्या दिवशी नाथ वंशजांच्या वतीने मानाची पहिली दिंडी असते. ती यंदा मोठ्या थाटात प्रस्थान ठेवणार आहे. या संबंधीचे सर्व नियोजन श्री क्षेत्र पैठण येथे वेगाने सुरू आहे.
यंदाचा हा सोहळा भव्यदिव्य होणार असल्याने विश्वविक्रमाची नोंदणी करणाऱ्या संस्थेला पाचारण करण्यात आले आहे. यंदा नाथषष्ठीचे औचित्य पाहता टाळकरी आणि वारकऱ्यांची संख्या अधिक असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या सर्व घटनांची नोंद विक्रमी असण्याची अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली.
पैठण येथे वारकऱ्यांना सुविधेत कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी मंदिर संस्थानाच्या पदाधिकाऱ्यांसह स्थानिक कार्यकर्ते कामाला लागले आहेत. तर, आणखी काही जण स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार आहेत, असे योगीराज महाराज गोसावी यांनी सांगितले.
हा अनोखा सोहळा नाथवंशजांच्या अधिपत्याखाली परंपरागत मार्गाने रंगणार आहे. गावातील नाथ मंदिरातून या सोहळ्याचे सकाळी ९ वाजता प्रस्थान झाल्यानंतर कावळे गल्ली, उदासीबुवा मठ, वाळवंट मार्गे गोदावरी महाद्वारातून श्री एकनाथ महाराज समाधी मंदिरात हा सोहळा प्रवेश करणार आहे. तेथे नाथमहाराज समाधी सोहळ्याचे मानाचे कीर्तन होणार असून, त्यानंतर हा सोहळा पूर्णत्वाकडे जाईल.
वारकऱ्यांना आवाहन
३१ मार्च रोजी सकाळी ९ वाजता ही महादिंडी समाधी मंदिराकडे प्रस्थान करणार आहे. या दिंडीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या वारकरी आणि भाविकांनी आपला टाळ आणि झेंडा सोबत आणावा. वारकऱ्यांच्या व्यतिरिक्त इतरांची या सोहळ्यात गर्दी होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे.