जगभरातून जोडले गेलेत

लाखो व्हर्च्युअल वारकरी

सोशल मीडियानं पारंपारिक मीडियाच्या मर्यादा केंव्हाच ओलांडल्या आहेत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे, फेसबुक दिंडी! आयटीमध्ये काम करणाऱ्या देहूच्या स्वप्नील मोरेच्या मनात फेसबुकवर वारीचे अपडेट देण्याची कल्पना आली. अनेक समविचारी मित्रांनी त्याची कल्पना उचलून धरली आणि जन्माला आली फेसबुक दिंडी. आज फेसबुकवरील या व्हर्च्युअल दिंडीचे लाखो वारकरी अर्थात फॉलोअर्स आहेत. यंदा दिंडीचे बारावे वर्ष आहे. आपल्या या एक तपाच्या प्रवासाबद्दल सांगत आहेत, स्वप्नील मोरे…

‘फेसबुक दिंडी’ हा शब्द असा आला की, त्यावेळी दिंडीची नावं ती दिंडी चालवणाऱ्यांच्या आडनावावरून असायची. ही गोष्ट साधारणपणे २०११ ची असावी. त्यावेळी फेसबुकवर इतर अवांतर अनेक गोष्टींची माहिती असायची. पण, आपली भव्य परंपरा असलेल्या वारी सोहळ्याची माहिती काही दिसायची नाही. त्याआधी www.tukaram.com नावाची वेबसाईट होती. त्यात कन्टेन्टच्या बाबतीत बरंच चांगलं काम झालेलं आहे. पण, त्यात वारीचे चांगले फोटो नव्हते. हीच गोष्ट माझ्या लक्षात आली, की वारीसारख्या परंपरेचा व्हिज्युअल कन्टेन्ट खूप कमी आहे. त्यावेळी न्यूज चॅनल वारीबद्दल थोडं बहुत दाखवायचे. तर, वृत्तपत्रांत देखील मोजकेच फोटो प्रकाशित व्हायचे. त्यामुळं मी विचार केला, की आपण यात काहीतरी वेगळं केलं पाहिजे.

फेसबुकवर ‘पेज’नं दिला स्वप्नाला आकार

त्यावेळी फेसबुकवर ‘पेज’ नावाची संकल्पना आली होती. त्यावेळी मी ‘संत तुकाराम महाराज, देहू’ नावाने एक पेज तयार केलं. त्यावर माझ्याकडे असलेले काही फोटो पोस्ट करणं सुरू केलं. नेमक्या त्याच काळात मला एका आयटी कंपनीत मला नोकरी मिळाली. तिथं जॉईन होण्यासाठी थोडा वेळ होता. त्याच दरम्यान वारी आली. मी त्यात जाणार होतो. मग मनात कल्पना आली, की आपण तर वारीत जातोय, तर इतरांना डिजिटल रुपात वारीत का घेऊन जाऊ नये? मग मी फेसबुकवर एक ‘इव्हेंट’ तयार केला. त्यात मित्रांना निमंत्रित करायचे आणि ते व्हर्च्युअली त्यात सहभागी होतील, अशी कल्पना होती. त्यावेळी ती एक नवीन संकल्पना होती. मी त्यावर ‘फेसबुककरांची दिंडी’ असा इव्हेंट तयार केला. त्यावर ५०० जणांना निमंत्रित केलं. ही कन्सेप्ट लोकांना इतकी आवडली, की त्यांनी त्यात त्यांच्या मित्रांनाही जोडलं. ‘मी वारीत सहभागी होणारच आहे. पण, इतरांनाही फोटोंच्या माध्यमातून वारी अनुभवता येणार आहे’ असं मी त्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं होतं. लोकांना ही संकल्पना इतकी आवडली, की ते एकमेकांना निमंत्रित करू लागले. त्यावर मी काही फोटोदेखील शेअर केले. हे पेज इतकं व्हायरल झालं, की त्या आठवणीनं आजही अंगावर काटा येतो…

प्रतिसादाने वाढविला उत्साह

त्यावेळी दुसऱ्या दिवशीच वृत्तपत्रात या संकल्पनेची बातमीदेखील आली होती. त्यावर सुमारे २० हजार लोकांपर्यंत ही माहिती पोहचली. माझ्या व्हर्च्युअल दिंडीत मी पोस्ट केलेला प्रत्येक फोटो, घटना २० हजार लोकांपर्यंत एकाच वेळी पोहचायची. त्यावेळी माझ्याकडे एकदम साधा कॅमेरा असलेला मोबाईल फोन होता. पण, लोकांनी दिलेला प्रतिसाद पाहून आणखी काम करण्याचा हुरूप आला. त्यावेळी टीव्ही चॅनल्सनी माझे इंटरव्ह्यूदेखील घेतले. तसं पाहिलं तर माझ्या या उपक्रमाचं पहिलंच वर्ष होतं. पण, माझ्यासमोर अडचणीदेखील होत्या. पालखी जाणाऱ्या गावांमध्ये नेटवर्क नसणं, ही सर्वांत मोठी अडचण होती. शिवाय, कमेंट्सच्या रुपाने लोक सूचनादेखील करत होते. उदा. ‘तुम्ही या प्रसंगाचा फोटो टाका’, ‘या पालखीचा फोटो तुम्ही दाखवला नाही’ अशा त्या कमेंट्स होत्या. त्यावेळी फक्त फोटो आम्ही पोस्ट करत होतो. कारण, व्हिडिओ पोस्ट करता येत नव्हते. नंतर व्हिडिओ आणि पुढेपुढे आम्ही लाईव्ह व्हिडिओ दाखवू लागलो. अशा प्रकारे नवीन पद्धतीने वारी दाखवण्याचा उपक्रम सुरू झाला. सुरुवातीला मी एकटाच होतो.

एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ

वारी या सोहळ्याची माहिती तर सर्वांना असते. पण, सोबतच असे अनेक प्रसंग असतात, की ज्याची माहिती खूप कमी लोकांना असते. मोरे कुटुंबातील असल्याने मला आमचे वडील, काका आणि अन्य जाणकार व्यक्तींकडून सहजपणे माहिती उपलब्ध व्हायची. मग मी फोटोसोबत ती माहिती टाईप करून पोस्ट करणं सुरू केलं. पण, हे सर्व मी एकटाच करत होतो. त्यावेळी माझा भाऊ मंगेश आणि अन्य नातेवाईक माझ्याकडे लक्ष ठेवून होतेच, की मी नेमकं काय करतोय. सुरुवातीला काही जण हसायचे. मग, मंगेश मोरे माझ्यासोबत यात सहभागी झाला. नंतर वाटलं, की आपण या फेसबुक दिंडी उपक्रमासाठी टीम तयार केली तर..? शिवाय याला थोडं प्रोफेशनल स्वरूप देखील द्यायला पाहिजे. कारण, त्यावेळी इंटरनेट मार्केटिंग ही संकल्पना नवीनच होती. मी त्यात थोडं शिकलो होतो.

दरम्यान, ग्राफिक्समध्ये काम करणारा अक्षय जोशी या मित्राने मला ‘फेसबुक दिंडी’चा लोगो तयार करून दिला. तोदेखील लोकांना खूप आवडला. नंतर प्रत्येक वेळी नवीन थीम घेऊन ग्राफिक्स लोगो आम्ही तयार केले. त्यात बऱ्याच सुधारणा केल्या. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी काही मुलं मी हेरली, ज्यांना पैसे किंवा प्रसिद्धीची अजिबात हाव नाही. काही मित्र असेही आहेत, की जे माझ्यासोबत या उपक्रमात पूर्ण वेळ काम करायला लागले. तर, काही जण प्रोत्साहन देत होते. आजही आमच्याकडे कलाकारांची इतकी मोठी टीम आहे, की अनेकांना त्याचं आश्चर्य वाटतं. यात राज्यभरातून ग्राफिक्स डिझायनर आम्हाला प्रत्येक वेळी काही न काही तयार करून पाठवतात. आमच्याकडून ते एकही रुपया घेत नाहीत. यात आम्ही क्रिएटिव्ह कामांसाठी एक प्रोफेशनल टीम तयार केली आहे. त्यामुळे दरवर्षी आम्हाला नवीन संकल्पना सुचतात.

सामाजिक थीम घेऊन काम

पालखी सोहळ्याच्या एक महिना आधी आम्ही मीटिंग घेतो. त्यात आम्ही ‘यावर्षी कोणत्या संकल्पनेवर काम करायचं’ यावर चर्चा करून निर्णय घेतो. कॅम्पेनची जबाबदारी वाटून घेतो. चार-पाच वर्षे काम केल्यावर असं लक्षात आलं, की हा खूप मोठा प्लॅटफॉर्म तयार झाला आहे. आजकाल फोटो-व्हिडीओ तर सगळेच पोस्ट करतात. पण, वारीच्या माध्यमातून काहीतरी सामाजिक संदेश आपण पोहचवला पाहिजे, या हेतूने आम्ही ‘थीम’ ठरवून काम करायला सुरुवात केली. यात उदा. पाणी वाचवा, महिला सशक्तीकरण, पर्यावरण संरक्षण असे संदेश आम्ही समाजात पोहचवणे सुरू केले.

यंदा या थीमचे पाचवे वर्ष आहे. तर फेसबुक दिंडी उपक्रमाला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. यंदा १२ वी वारी सुरू आहे. या काळात अनेक लोक आहेत, जे कोणत्या ना कोणत्या रुपात आम्हाला मदत करतात. त्यामुळे फेसबुक दिंडी ही आता खऱ्या अर्थाने एक मोहीम झाली आहे, असं आपण म्हणू शकतो. या उपक्रमाला आता एक मूर्त रूप मिळालं आहे, असं आपण म्हणू शकतो. या उपक्रमातून अनेकांना प्रेरणा मिळाली, काही जणांनी अशा प्रकारची पेजही सुरू केली आहेत, ही चांगली गोष्ट आहे. पण, याची सुरुवात आपण केली, याचा अभिमान मात्र वाटतो.

तांत्रिक अडचणींवर केली मात

सुरुवातीला या उपक्रमात अडचणी बऱ्याच आल्या. यात प्रामुख्याने पाहिलं तर फोटो काढण्यासाठी जी साधनं लागतात, ती खूपच साधी होती. शिवाय, प्रत्येक फोटो लगेच अपलोड करणं शक्य होत नव्हतं. बऱ्याचदा आम्ही लाईव्ह अपडेट्स द्यायचो. पण, त्यात नेटवर्कच्या अडचणी यायच्या. या सर्व टेक्निकल अडचणी आहेत. ज्या ठिकाणी नेटवर्क नसायचं, अशा वेळी आम्ही दिंडी सोडून कुठंतरी झाडावरून किंवा उंच ठिकाणी जाऊन नेटवर्क शोधायचो. मग तो फोटो, माहिती अपडेट करायचो. मग, लोकांना ती माहिती मिळताच ते ‘Thank You’ म्हणायचे. हे सर्व वेगळंच आहे. आता अनेक जण लाईव्ह दाखवतात. पण, त्या काळात ती आमच्यासाठी एक मोठी प्रोजेक्ट अचिव्हमेंट होती. सुरुवातीला माझ्याकडे चांगले कॅमेरे नव्हते. सर्व काही मोबाईलच्या मदतीने करायचो. नंतर काही मित्रांनी चांगले कॅमेरे घेऊन दिले. मग, टीम जमली. त्यांच्याकडे काही ना काही साहित्य होतं. मग टेक्निकल अडचणी सुटत गेल्या.

वारी काळात बऱ्याचदा वेळेची अडचणही येते. आपण सर्व कार्यक्रम सतत कव्हर करू शकत नाही. काही कार्यक्रम पहाटे पाच-सहा वाजता सुरू होतात. ते बऱ्याचदा कव्हर करताना अन्य उपक्रमांची माहिती मिळवणं आणि ती पोस्ट करणं राहून जातं. या अनुभवातून आम्ही शिकत गेलो. नंतर नंतर कोणता कार्यक्रम कुठे आणि किती वाजता असतो हे समजत गेलं. वारी काळात हे सर्व साहित्य घेऊन प्रवास करणं कठीण असतं. कधी कधी चालत जाऊन तो प्रसंग, इव्हेंट कव्हर करणं आव्हानात्मक असतं. पण, पुढे सर्व शिकायला मिळालं. सुरुवातीला व्हिडीओ अपलोड करण्यासाठी खूप वेळ जायचा. एखादा व्हिडिओ दुपारी अपलोड करणं सुरू केलं, तर तो संध्याकाळी पूर्ण व्हायचा. नंतर फेसबुकवर ‘लाईव्ह’चा ऑप्शन आला, तो आमच्या दृष्टीने सोयीचा ठरला. एकूणच जसजशी नवीन टेक्नॉलॉजी येत गेली, तशी आमच्या ‘फेसबुक दिंडी’ उपक्रमाच्या अडचणी दूर होत गेल्या.

छोट्या रोपट्याचा झाला मोठा वृक्ष

या सर्व प्रवासात आव्हानात्मक बाबी पहिल्या तर सुरुवातीपासून आम्हाला बऱ्याच आर्थिक अडचणी आल्या. घरातूनच विचारणा व्हायची, की ‘तू काम-व्यवसाय सोडून हे सर्व का करतो आहेस?’ कारण, प्रत्येकाला वाटतं की काम-नोकरी करून स्थिर व्हायला पाहिजे. पण, माझं आधीपासूनच ध्येय होतं की, आपण आपलं स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे. आपल्या कामाचं मार्केटिंग आपणच केलं पाहिजे. त्यामुळे लोकांना समजेल, आवडेल अशा प्रकारचं मार्केटिंग आपण केलं, तर त्यात आपण यशस्वी होतो, हे मनाशी ठरवलं होतं. त्याप्रमाणे चालत राहिलो. आमच्या टीममध्ये बरेचसे लोक तरुण आहेत. वारी करण्याची त्यांना मनापासून आवड आहे.

कारण, यापूर्वी ऑडिओ-व्हिडिओद्वारे त्यांच्यापर्यंत वारीची माहिती यापूर्वी पोहचलेली नव्हती. पण, फेसबुकच्या माध्यमातून सर्व तरुण त्यात जोडले गेले. उदा. २०११ मध्ये मी जेव्हा वारी करायचो, तेव्हा फर्ग्युसन कॉलेज रोडवर क्वचितच कोणीतरी एक-दोन जण DSLR कॅमेरे घेऊन फोटोसाठी यायचे. पण, आमच्या फेसबुक दिंडीच्या माध्यमातून ही माहिती सर्वांपर्यंत पोहचली. या वारीत कितीतरी गोष्टी आहेत, ज्या आपण टिपू शकतो हे सर्वांना समजलं. अनेक पोर्ट्रेटदेखील यातून रेखाटले गेले. आता आपण पाहिलं तर या मार्गावर फोटो घेणाऱ्यांची संख्या इतकी असते, की आपणही आश्चर्यचकित होतो. यात महत्त्वाचे म्हणजे तंत्रज्ञान सुधारत गेले आणि आणि वारीमध्ये फोटोत साठवण्यासारखं खूप काही आहे, हे देखील समजलं. त्यामुळे एक छोटं रोप आपण लावलं आणि आता त्याचा मोठा वृक्ष झालाय असं मला वाटतं.

‘थीम सॉंग’ने घेतला जन्म

या सर्व बदलांचं श्रेय मी घेणार नाही, पण त्यावेळी आतासारखं काहीच नव्हतं. ज्या पद्धतीने वारी सोहळ्याचं मार्केटिंग व्हायला पाहिजे होतं, तसं झालं नाही. पेपरमध्ये आलेला फोटो किंवा न्यूज चॅनेलमध्ये दाखवलेली बातमी इतकंच काय ते असायचं. पण, आता सर्वच जण वारीबद्दल माहिती देत आहेत आणि दाखवत आहेत. आम्ही सुरुवातीला व्हिडिओ शूट करायचो, ते एडिट करायचो. कधीकधी आम्ही ओरिजनल आवाज वापरायचो. त्याला जुन्या चित्रपटांची गाणी वापरायचो. त्यावेळी वारीबद्दल खूप कमी गाणी होती. त्यातही भक्तिसंगीत होती. आपण शूट केलेल्या व्हिडिओसाठी भक्ती संगीत वापरण्यात अडचणी होत्या. तरीही आम्ही ते वापरायचो. पण युट्यूबवर कॉपीराईटच्या सूचना यायच्या. यानंतर असा विचार केला की, आपण आपलं गाणं का नाही तयार करू शकत? मग आमच्या टीमने त्यावर काम सुरू केलं.

आम्ही ‘थीम सॉंग’ करायचं ठरवलं. हर्ष-विजय नावाचे दोन तरुण संगीतकार आहेत. त्यावेळी त्यांचं ते पहिलं गाणं होतं. ते आमच्याकडे आले आणि म्हणाले, की ‘आम्हाला तुमचं गाणं खूप आवडलं आहे. तसंच एक लिरिक्स लिहिलं आहे. तुम्हांला ते आवडेल.’ त्यांनी आमच्या उपक्रमावर अभ्यास करूनच ते गाणं लिहिलं होतं. ते आमचं ‘थीम सॉंग’ म्हणून फायनल झालं. ते गाणार का म्हणून आम्ही आदर्श शिंदे यांच्याकडे गेलो. त्यांनी ते अफलातून गायलं. त्या गाण्याच्या शेवटी एक संवाद होता, त्यासाठी अभिनेते जितेंद्र जोशी यांनी आवाज दिला. त्यामुळे सांगायला खूप आनंद होतो, की आपण एखादं काम हाती घेतलं आणि ते राहिलं किंवा अडकलं असं कधी झालं नाही. समाजाने त्याला खूप उचलून धरलं.

गाण्यांमधून सामाजिक संदेश

त्यानंतर आम्ही वारीबाबत सामाजिक संदेश घेऊन दोन-तीन गाणी केली. मग, त्यादृष्टीने ग्राफिक्स डिझायनिंग किंवा एखाद्या समाजसेवी संस्थेसोबत मिळून आम्ही हा उपक्रम सुरू ठेवला. अशा संस्थांना आपल्याद्वारे काय मदत करता येईल, याचाही विचार केला. यात नेत्रदान करण्यासाठी अर्ज भरून देणारे सुमारे दोन हजार लोक आम्ही मिळवून दिले. सामाजिक संदेश घेऊन अवयवदान मोहिमेत सहभाग घेतला. वारीत महिलांचा सहभाग लक्षात घेऊन वारी ‘ती’ची नावाचा उपक्रमही आम्ही केला. त्यासंदर्भात काम करणाऱ्या काही सामाजिक संस्था आहेत, त्यांच्या आम्ही मुलाखती घेतल्या.

यात मासिक पाळी जनजागृतीबाबत किंवा विधवांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या काही संस्था, कार्यकर्ते आहेत. त्यांच्या कार्याची माहिती मुलाखतीद्वारे समाजापर्यंत आपण पोहचवली. हे सर्व युट्यूबवर उपलब्ध आहे. अशा प्रकारे दरवर्षी आपण वारीसोबत सामाजिक संदेश देत आहोत. खरंतर आपल्या संतांनी अनेक सामाजिक संदेश दिले आहेत. पण, आपल्याला कीर्तनाला जाऊन बसण्यासाठी वेळ नसतो. पण, त्याच कीर्तनाचा जो गाभा आहे, तो आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

तुकाराम महाराजच सोडवतात अडचणी

या सर्व उपक्रमाचा व्यावसायिक दृष्टीने विचार केला असता, आम्ही टीमने आतापर्यंत कधीही ‘डोनेशन’ म्हणून पैसे घेतलेले नाहीत. आम्ही फक्त कामातून वेळ काढतो. अगदीच काही खर्च लागत असेल, तर आमच्या पातळीवर करतो. एकाच गाण्यासाठी रेकॉर्डिंग आणि स्टुडिओसाठी लाखभर रुपये खर्च आला होता. पण, आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातील मुलांना हा खर्च खूप असतो. त्यामुळे असे प्रोजेक्ट करणं वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही. आम्ही कोणतीही स्वयंसेवी संस्था म्हणून किंवा संस्था म्हणून नोंदणी केलेली नाहीये. त्यामुळे डोनेशन मागण्याचा विषय येत नाही. आमचा लोगोदेखील कुठंही नोंदवलेला नाहीये. फक्त आमचा प्रयत्न लोकांना आवडला. लोकांनी उचलून धरलेला उपक्रम म्हणून ‘फेसबुक दिंडी’चं नाव घेता येईल. आतापर्यंत आमच्या उपक्रमाबद्दल कोणीही हरकत घेतलेली नाहीये. अगदीच व्यावसायिक दृष्टीने ठरवलं असतं, तर हा उपक्रम आणखी चांगल्या प्रकारे राबवता आला असता. पण, तसा विचार केला नाही. उलट आम्हाला काही अडचण आलीच तर लोक स्वतः मदत करतात. आम्ही काही ठरवलं आणि त्यात कितीही अडचणी आल्या, तरीही संत तुकाराम महाराज त्या सोडवतात, असा आमचा या वर्षीपर्यंतचा अनुभव आहे, हे सांगताना खूप आनंद वाटतो.

नोकरीचा राजीनामा देऊन केली वारी

२०११ मध्ये एका नोकरीत असताना मला १५ दिवस वारी सोहळ्यासाठी सुट्टी पाहिजे होती. पण, ती मिळाली नाही. मग मी नोकरीचा राजीनामा देऊन वारीमध्ये सामील झालो. त्यानंतर मी आयटी क्षेत्रात जॉईन झालो. म्हणजे वारीसाठी नोकरी सोडली, असं मला अभिमानानं सांगायला आवडेल. त्यामुळे एखादी गोष्ट तुम्हाला करायची असेल, तर कितीही अडचणी आल्या तरी ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी झटून काम केलं पाहिजे. त्यातून जे समाधान मिळतं, ते इतर कशातही मिळत नाही. ज्यावेळी माझी नोकरी सुटली, त्यावेळी मी मुंबईत गेलो. इंटरनेट मार्केटिंगचे काही कोर्स केले. नवीन माहिती शिकलो. परत पुण्यात आलो. तिथंही काम केलं. नंतर व्यवसाय म्हणून घराजवळ केक शॉप सुरू केलं.

व्यवसायात असताना आपण आपल्या मनाची गोष्ट करण्यासाठी कधीही वेळ काढू शकतो. म्हणून वारी सोहळा आणि ‘फेसबुक दिंडी’ या उपक्रमासाठी मी पूर्णवेळ व्यवसायात उतरण्याचं ठरवलं. फक्त वारीच नाही, तर आपल्याला काहीही करायचं असेल, तर पूर्ण स्वातंत्र्य असतं. म्हणून मी पूर्णपणे नोकरी सोडली आणि व्यवसायात उतरलो. आताही मी नियोजन करून वारीला जातो. आता मी व्यवसायात बऱ्यापैकी स्थिर झालो आहे. आपण सर्वांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं आवश्यक आहे. कारण, मनासारखं काही करण्यासाठी पैसे लागतात. तसं नसेल, तर तडजोडी कराव्या लागतात. इतरांकडून पैसे घ्यावे लागतात. हे व्हायला नको. म्हणून मी आता ठरवलं आहे, की आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं. म्हणजे मनासारखं आणि पाहिजे ते करता येईल. सोशल मीडियावर काही उपक्रम राबवणारे तरुण असोत, किंवा समाजसेवा करू इच्छिणाऱ्या मित्रांना माझं सांगणं राहील, की आधी आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं आवश्यक आहे.

वारीवर दर्जेदार लघुपट करण्याची इच्छा

माझ्या या उपक्रमाला घरातून कधीच विरोध नव्हता. माझे वडील देहूतील मंदिराचे विश्वस्त होते. त्यांची अजूनही इच्छा आहे, की मी आयटी क्षेत्रात नोकरी केली पाहिजे. ते सरळमार्गी असल्याने त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. म्हणून आपल्या मुलाने या क्षेत्रात येऊ नये, अशी त्यांची सूचना आहे. पण, माझ्या उपक्रमासाठी त्यांचा आतून नेहमीच पाठिंबा असतो. घरातील अन्य सदस्यांनी मला नेहमीच साथ दिली. मी वारीला जातो, त्या काळात व्यवसाय माझी पत्नी सांभाळते. आता इथून पुढे मी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यातून काही नवीन गोष्टी करायच्या आहेत. मागच्या १२ वर्षांत त्याच त्याच गोष्टी रिपीट होत आहेत. म्हणजे वारीचे फोटो, व्हिडिओ, ऑडिओ हे करतच आहोत. पण, आता संपूर्ण मोरे घराण्यावर एक लघुपट (डॉक्युमेंटरी) तयार करायची आहे. वारी सोहळ्याचे नियोजन नेमकं कसं केलं जातं, याबाबत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या वेळी बैठक आयोजित केली जाते.


पालखी सोहळ्यादरम्यान काय नियोजन असेल, कुठे मुक्काम असेल, कुठे विसावा असेल हे सर्व बीजेवेळी होणाऱ्या मीटिंगमध्ये ठरतं. या मीटिंगपासून ते परतीची वारी आल्यानंतरचे कार्यक्रम हे सर्व एका लघुपटाद्वारे एकदम दर्जेदार पद्धतीने जगासमोर आणण्याची माझी इच्छा आहे. नॅशनल जिओग्राफी वाहिनीने कुंभमेळा आणि इतर सोहळ्याचं चित्रण यापूर्वी केलं आहे. पण, त्यांनी वारी सोहळ्याची अशी डॉक्युमेंटरी केलेली नाही. त्यामुळे तसा लघुपट निर्मितीचा माझा मानस आहे. शिवाय वारी सोहळ्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये व्हायला पाहिजे, असा माझा प्रयत्न आहे. कारण, आपल्या लाडक्या देवाच्या दर्शनाला अखंड पायी प्रवास करत जाण्याची संकल्पना जगात कोठेही नाही. त्यामुळे वारीची गिनीज बुकात नोंद व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे.

2 thoughts on “फेसबुक दिंडीचं एक तप!

  1. अतिशय अभिमान वाटेल असे काम.. कौतुक करावे तितके थोडेच.. असेच नव नवीन कल्पना सह या आणि दाखवून द्या.. वारी म्हणजे फक्त वारी नाही तर ते संपूर्ण जीवनाचे व्यवस्थापन आहे.. सर्व टीम ला शुभेछा.. काही मदत हवी असल्यास हक्काने सांगा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *