वारीच्या वाटेवर स्वातंत्र्यासोबत

‘रांधा-वाढा-उष्टी काढा’ आहेच…

प्रपंचाचा गाडा सांभाळणाऱ्या, संसारात गाडलेल्या स्त्रियांसाठी वारीला जायला मिळणं हीच त्यांच्यासाठी थोर गोष्ट. आपलं संसारातलं दु:ख त्या वारीच्या वाटेवर विसरून जातात. असं असलं तरी, घराप्रमाणंच ‘रांधा, वाढा, उष्टी काढा’ हे वारीच्या वाटेवरही करावं लागतंच…

– दीप्ती राऊत

वारी कव्हर करणे ही सगळ्याच पत्रकारांसाठी वेगळ्या अनुभवाची पर्वणी असावी. माझ्यासाठी तर ते वेगळेच आह्वान होते. वारकरी पांडुरंगाच्या शोधासाठी वारीत जातात, मला वारीतल्या माणसांचा शोध घ्यायचा होता. जाण्यापूर्वीच्या तयारीत या शोधाची सुरुवात दुर्गाबाईंचं ‘पैस’, मोकाशींची ‘पालखी’, ‘इरावती कर्वेंचे चरित्र’ या शब्दांतून झाली. सुभाष अवचटांची चित्रं, संदेश भंडारेंचे फोटो यातनं वारीचं दृष्य दर्शन होत होते. त्यातले दोन चेहरे मनात घट्ट रुजले होते. साडीचा सोगा एका हातात धरून दुसऱ्या हाताने डोईवरचं वृंदावन सांभाळत जीवाच्या आकांताने रिंगणात धावणाऱ्या माऊलीचा एक चेहरा होता आणि देहभान हरपून फुगडी खेळण्यात हरपलेल्या माऊलीचा दुसरा चेहरा होता. बाईच्या आयुष्यातील स्वप्न आणि वास्तव दोन्हीतील अंतराचं प्रतिनिधित्व करणारे ते दोन चेहरे संपूर्ण वारीत अनेक माऊलींच्या रुपानं भेटत राहिले. नंतरही पाठलाग करत राहिले.

सोताच्या हिमतीवरी…

‘माऊली… माऊली…’ वारकऱ्यांचे एकमेकांना संबोधनेच मातृत्व भावातील व्यापकता सांगत होती. पांडुरंग ‘तो’ असतो, पण भक्तासाठी तो ‘माऊली’ होतो. माऊलीचा ध्यास घेता घेता स्वत:च माऊली बनतो आणि माऊली बनून एकमेकांमध्ये मिसळून जातो. बायकांची ताकद असलेला भगिनीभाव त्या माऊलीमयतेत भिनलेला होता. प्रपंचाचा गाडा सांभाळणाऱ्या, संसारात गाडलेल्या स्त्रियांसाठी वारीला जाण्याची संधी मिळणं हेच केवढं मोठं दिव्य असेल याची कल्पना बाईशिवाय अन्य कुणी नाहीच करू शकणार. त्यांची घालमेल आणि त्यांची अवस्था वारीतल्या ओव्यांमध्येच सापडली. कधी ‘आवा चालली पंढरपुरा, वेळीपासून आली घरा’ या शब्दात भेटत होती तर कधी जीजाच्या घालमेलीत.
तुका म्हणे जीजा, ईमाली बैस,
जीजा म्हणे, येड लागलं तुम्हाले, घरी आहे दुभती म्हैस
तुका निघाले वैकुंठी, वस्त्रे ठेवून भिंतीवरी,
जीजा निघाली माघारी, सोताच्या हिमतीवरी…
अशा लाखो जीजा वारीत भेटल्या. वारीला जाता यावं म्हणून झगडणाऱ्या, संधी मिळाली तरी घरच्या दुभत्या म्हैशीजवळ अर्ध काळीज सोडून आलेल्या, न मिळाली तरी स्वत:च्या हिंमतीवर उतरत्या वयात सामील झालेल्या भेटल्या.

तुकोबांना भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन चिंतन करणं सोपं होतं, पण जीजेला तिथे गुहेतही संसार मांडावा लागला का, या विवंचनेत सापडलेल्या. ‘सोताची हिंमत’ सापडण्यासाठी युगा युगाची हिंमत वेचणाऱ्या. वारी हाच आयुष्यातला एकमेव ध्यास आणि वारी हाच मोकळा श्वास घेण्याचा एकमेव संधी असलेल्या. कधी संसाराच्या ओझ्यामुळे पंढरी हुकलेल्या, तर कधी पंढरीत आल्यावरही संसाराचे ओझे डोईवर वागवणाऱ्या. एरवी सासू-सून, नणंद-भावजय या मानपानाच्या नात्यांना ओलांडून एकमेकींसोबत फुगड्या खेळत एक झालेल्या. एरवी परपुरुषासमोर शब्दही न काढू न शकणाऱ्या इथे सारा संकोच, कृत्रिमता झुगारून माऊलीच्या गजरात एक झालेल्या. एरवीची गुडघेदुखी, कमरदुखी विसरून उड्या मारणाऱ्या, धावणाऱ्या, पळणाऱ्या. सारी नाती, त्यांची दडपणं आणि त्यांचे गंड मागे सारून पुढे निघालेल्या. पंढरीसी नाही कोणा अभिमान। पाया पडे जन एकमेका।। केवढं हे लोकविलक्षण. याशिवाय समतेचा आणि मानवतेचा जागर शहरवासीयांना अचंबित करणारा. भारावून टाकणारा. वारकरी महिलांचे ते खुललेलं रुप कव्हर करत असतानाच पुण्याच्या पेपरमध्ये जैतुनबींच्या सत्काराची बातमी वाचली आणि त्यांना भेटायचं ठरवून आमची पालखी पुढे निघाली.


ह. भ. प. जैतुनबी महाराज
दुसऱ्याच दिवशी जैतुनबी भेटल्या. निवडुंगा विठोबाच्या मंदिरात त्यांची दिंडी थांबली होती. राजेंद्र कोकरे हा त्यांचा शिष्य जैतुनबींपर्यंत घेऊन गेले. जैतुनबी म्हणजे वारीतला आणि पर्यायानं आपल्या मातीतला अनोखा चमत्कार. जैतुनबी मकबूल सैय्यद. एकाच वेळी पैगंबर आणि पांडुरंग दोघांची सेवा करणाऱ्या जैतुनबींबद्दल मी मोकाशींच्या ‘पालखी’मध्ये वाचलं होतं. आपल्याला आवडणाऱ्या सिनेमातली हिरॉईन शूटिंगच्या लोकेशनवर प्रत्यक्ष भेटावी असाच आनंद मला झाला त्यांना बघताच. मोकाशींनी पुस्तक लिहिलं तेव्हा त्या २८ वर्षांच्या होत्या. मी भेटले तेव्हा ८० वर्षांच्या. कमरेतून वाकलेल्या. केसाची बारीक वेणी. पांढराशुभ्र कुरता पायजमा. डोक्यावर पांढरीच ओढणी आणि मुखी पांडुरंगाचे अभंग.


माळेगावातल्या मुस्लिम घरातली ही गवंड्याची मुलगी वयाच्या पाचव्या वर्षापासून विठ्ठलाची वेडी झाली. अभंग आणि कीर्तनं करू लागली आणि तिचं आयुष्यच पार बदलून गेलं. त्यांच्या कीर्तनानं कुणाला व्यसनांपासून मुक्त केलं, तर कुणाला प्रपंचाला लावलं. जैतुनबींशी माझी गाठ घालून देणारे संजय पाटील यांच्यापैकीच एक. खुनाच्या गुन्ह्याची शिक्षा भोगून आलेला हा कैदी जैतुनबींमुळे प्रपंचाला लागला. मागचं आयुष्य विसरून नव्यानं जगू लागला. स्त्री सबलीकरण हा जैतुनबींचा आवडीचा विषय. जैतुनबींचं प्रवचन म्हणजे ज्ञानेश्वरांच्या अभंगांपासून कबीराच्या दोह्यांची सुरेख गुंफण. वारकरी झाल्यामुळे मुस्लिम समाजाकडून झालेला विरोध, घरच्यांचं केलेलं मतपरिवर्तन… ह. भ. प.पर्यंतचा जैतुनबींचा प्रवास ऐकावा तो त्यांच्याच शब्दांत. वारकरी सांप्रदायाबाहेरच्यांना अशी कुणी जैतुनबी आहे, पांडुरंगाची भक्त, कबिराची शिष्य याची कल्पनाही नसावी. धार्मिक विखार तीव्र झालेल्या आजच्या काळात जैतुनबींना दोन्ही बाजूने जगणं हराम केलं असतं. मंदिर-मशिदींच्या भूतकाळातील वादात जैतुनबींसारखा वर्तमान भारतीयत्वाची खरी ज्योत ठरली होती.


वारकरी महिलांना सूतकताईचं ट्रेनिंग
सासवड मुक्कामी माजी सनदी अधिकारी लीना मेहेंदळे भेटल्या. वारीच्या निमित्तानं एकत्र येणाऱ्या सामुदायिक ताकदीला विधायक कामाची जोड द्यावी या उद्देशाने सहभागी झालेल्या. मराठवाड्यातून आलेल्या वारकरी महिलांना सूतकताई शिकवत होत्या. तुकोबांच्या वैष्णवांची गांधींच्या वैष्णवांशी भेट झालेली. कर्म आणि धर्म एकाच वेळी इतकंच म्हणाल्या. राज्याच्या प्रधान सचिव पदावरून निवृत्त झालेली ही बाई आणि त्यांनी वारीला दिलेला हा वेगळाच आयाम. अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि परभणी सर्वोदय परिवार यांच्या संयुक्त विद्यमानं वारीतल्या वारकऱ्यांना सूतकताई शिकवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. कापसाच्या सुतातून शेतकऱ्याला व्हॅल्यू एडेड उत्पन्न मिळावं हाच फक्त उद्देश. बोरेले महाराजांच्या शब्दात, पोटोबा आणि विठोबा यांचा एकत्र विचार.

सूतकताई शिकणाऱ्या शशिकला पाटलांना ते नेमकं उमजलंय. त्या म्हणाल्या, बारा आणे कापूस विकायचा आणि चार आणे सूत हे वारीत शिकलो. अडचणीत सापडलेल्या कृषी अर्थकारणाला वधारण्यासाठी पुढे आलेला एक मार्ग. कच्च्या मालाच्या भावाचा भरवसा नाही त्यामुळे थोड्या मालावर प्रक्रियेचे नियोजन. पुढे आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकरी महिलांवर संशोधन करताना, त्यांच्याशी संवाद साधताना अनेकजणी भेटल्या. पतीपश्चात एकाकी संसाराचा आणि शेतीचा गाडा ओढणाऱ्या. कर्जबाजारी शेतीला हिमतीनं आणि जिद्दीनं बाहेर काढणाऱ्या. त्यांना कधी वारीला जाण्याची संधी मिळाली नव्हती. पण वारीत दिसणारी व्यवहारी ताकद त्यांच्यात खोलवर रुजलेली. दहा वर्षांत घरातील तीन पुरुषांच्या आत्महत्यांनंतरही खंबीरपणे उभ्या राहिलेल्या आणि पुढच्या १० वर्षांत पंचक्रोशीतील आदर्श शेतकरी बनलेल्या अकोल्याच्या ज्योती देशमुखांचे शब्द आठवले, जेव्हा खूप अस्वस्थ वाटतं, एकाकी वाटतं तेव्हा पोथी काढून ज्ञानेश्वरी वाचते!


मोहन माळ तुटली रे…
नीरा मुक्कामी नदीच्या तीरावर एक अहिरे बाई भेटल्या. देहभान हरपून गवळण गात होत्या. डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं, तरी चेहऱ्यावरची आनंदाची तार तुटत नव्हती. दु:ख आणि आनंद याचं अगम्य कोडं त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. ‘‘देवा तुझी रीत आम्हा नाही पटली… मोहन माळ तुटली रे, मोहन माळ तुटली…’’ ऐकणाऱ्यांनीही पायाचा ठेका धरलेला. आम्ही नाशिकहून आलो आहोत हे कळताच, एकानं सांगितलं, या बाईंना ओळखलंत का, चार वर्षांपूर्वी ओझरच्या अपघातात यांचा २१ वर्षांचा मुलगा गेला. त्याचा एवढा मोठा धक्का त्यांना बसला, की बाई सहा महिने अंधरुणाला खिळलेल्या. वर्षभर कोणाशी बोलत नव्हत्या. औषधं साथ देत नव्हती, की उपचार दाद देत नव्हते. मग कुणीतरी नामस्मरणाचा मार्ग सांगितला. बाई पुन्हा उभ्या राहिल्या. तेव्हापासून वारीला येतात.


स्वयंपाक, धुणीभांडी, उष्टी, खरकटी…
तरडगावापर्यंत वारीचे १० दिवस झाले होते. तिथे चांदोबाच्या लिंबापाशी उभं रिंगण झालं. रिवाजाप्रमाणे पालख्या पुढे चालत होत्या. सकाळच्या सहाच्या ठोक्याला प्रस्थान. तीन तासांनी न्याहारीचा विसावा. पुन्हा चालणं. दुपारची विश्रांती. ऊन उतरल्यावर पुन्हा चालणं. मावळत्या सूर्याच्या साक्षीनं मुक्कामाच्या गावात प्रवेश. गावकऱ्यांकडून तळावर पादुकांचं आणि दिंड्यांचं स्वागत. पालखीतळावर समाज आरती. अत्यंत विलोभनीय दृश्य. चोपदारांच्या घोषणा. मानदंडाच्या इशाऱ्यावर स्तब्ध शांतता. हरवलेल्या आणि सापडलेल्या वस्तूंच्या याद्या. दुसऱ्या दिवशीच्या सूचना. दिवसाची सांगता. रात्रीच्या जेवणासाठी आणि विश्रांतीसाठी वारकरी आपापल्या दिंड्यांमध्ये स्थिरावत होते. अर्थात, या साऱ्यात राबणाऱ्या हातांमध्ये बांगड्यांच्या हातांची संख्या सर्वाधिकच होती. पाणी भरणे, स्वयंपाक करणे, धुणीभांडी आणि उष्टीखरकटी ही कष्टाची कामं ना त्यांना वारीबाहेर चुकलेली ना वारीतही.


पुरूषसत्ता आणि जातींची उतरंड
वेळापूर मुक्कामी धावा झाल्यावर भारुडं रंगली होती. कुणी कमरेला ओढणी गुंडाळून, तर कुणी डोक्यावर टॉवेल घेऊन. एका कोपऱ्यातल्या भारुडाभोवती जरा जास्तच गर्दी जमलेली. कुणी प्रसिद्ध भारुडकार असेल म्हणून आम्ही गर्दी भेदून आत शिरलो. गवळण रंगात आली होती, पण सादर करणारी तमाशा कलावंतीण होती. वारीवर तर अनेकजण पोटं भरत होती. मग त्यांचा तरी दोष का? कुठे मुरळीच्या रुपात तर कुठे देवदासीच्या रिवाजात देवाच्या नावाने बाईची ‘सेवा’ उपभोगणाऱ्या पुरुषसत्ताक परंपरेचे पाझर डोकं वर काढत होते.


सगळे वारकरी, सगळे माळकरी. पण तिथेही जातीची अस्मिता तीव्र. साधी ओळख सांगण्यापासून दिंड्यांच्या बॅनर्सपर्यंत… कोण सांगत होतं, आम्ही परीट. गाडगेबाबा आपलेच. कुणी म्हणत होतं, नामदेव शिंपी समाजातला माझा जन्म. दिंड्यांवर बॅनर झळकत होते, अहिरे समाज दिंडी, संताजी महाराज तेली समाज दिंडी, नरहरी सोनार समाज दिंडी. ज्या संतांनी जातीभेदाविरोधात वैष्णव समाजाची पताका फडकवली त्यांनाच जातीत वाटलंय. संत मागे पडलेले आणि जाती ठळक झालेल्या. दलितांच्या दिंड्या पालखीपुढे चालणाऱ्या. का तर त्यांना म्हणे जरीपटाक्याच्या मान. कोळ्यांना स्वारीच्या अश्वांचा, वडारांना पंढरपुरातल्या रथाचा. वारीलाही या जातीव्यवस्थेपासून सुटका नाही. वाटेत एक बोर्ड पाहिला- ‘ब्राह्मणाची खानावळ’. जातीपातीच्या या सामाजिक उतरंडीत बाईत शेवटच्या थरात गाडलेली. वारी तरी तिला अपवाद कशी. बाईपणाची जात वारीतही डोकवत होती. दिंड्या, पालख्या सारा कारभार, निर्णय, अधिकार आणि अवकाश पुरुषांच्या हातात. बायका फक्त राबणाऱ्या. डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन चालणाऱ्या, पाण्याची घागर घेऊन पळणाऱ्या, सोगे खोचून रिंगणात धावणाऱ्या. तल्लीन होऊन कीर्तनं एकणाऱ्या. तिथेही ग्लास सिलींग आहेच.


युगानुयुगांचं एकटेपण
नाशिकच्या सुशिला कामत, पिंपरीच्या मंगला कांबळे अशा एकदोन दिंडी प्रमुख हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या. सुशिलाताई गेल्या १५ वर्षांपासून दिंडी प्रमुख म्हणून दिंडी घेऊन येताहेत. पिंपरीच्या मंगला कांबळे तर थेट मॅरिशला जातात दिंडी घेऊन. त्यांची दिंडी संत बहिणाबाईची. मंगला ताई सांगत होत्या, संत बहिणाबाई म्हणजे बहिणाबाई चौधरी नाही, तर बहिणाबाई पाठक. तुकारामांच्या शिष्या. पण तुकारामांच्या चौदा शिष्यांमध्ये त्यांचं नाव नाही सांगितलं जात, याची मंगलाताईंना खंत वाटते. गणिकेची संत झालेली कान्होपात्रा, संत जनाबाई, चांगदेवाचे गर्वहरण करणारी संत मुक्ताबाई, संत सोयराबाई केवढी समृद्ध परंपरा आणि तेवढीच क्रांतीकारीही.
डोईचा पदर आला खांद्यावरी।
भरल्या बाजारी जाईन मी।।
हाती घेऊन टाळ खांद्यावरी वीणा।
आता मज मना कोण करी।।
पंढरीच्या पेठे मांडियले पाल।
मनगटावर तेल घाला तुम्ही।।
जनी म्हणे देवा मी झाले वेसवा।
रिघाले केशवा घर तुझे।।
हे संत जनाबाईंचे शब्द पडदाशीन समाजातून बाईला मुक्तीचा मार्ग दाखणारे. आज एकवीसाव्या शतकातही मासिक पाळीला अपवित्र, अधर्म समजलं जात असताना संत सोयराबाईंनी १४ व्या शतकात लिहिलेले विटाळाचे अभंग कित्येक शतके काळाच्या पुढे गेलेले.


देहासी विटाळ म्हणती सकळ।
आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध।।
देहीच विटाळ देहीच जन्मला।
सोवळा तो जाहला कवण धर्म।।
विटाळा वाचोनी उत्पत्तेचे स्थान।
कोणा देह निर्माण नाही जगी।।
म्हणून पांडुरंगा वानितसे थोरी।
विटाळ देहांतरी वसतसे।।
देहाचा विटाळ देहीच निर्धारी।
म्हणतसे महारी चोखियाची।।
अशी परंपरा असलेली वारी आणि वारीतली स्त्री आज मात्र पुन्हा सनातन प्रवृत्तींची, अंधश्रद्धांची आणि बुजाबाजीची ‘सॉफ्ट टार्गेट’ आणि प्रभावी वाहक बनलेली दिसते. एकादशीच्या दिवशीपर्यंत २१ दिवसांत सगळ्यांचाच विठोबा झाला होता. इरावती कर्वेंच्या शब्दातला चाच विठोबा झालाय. मनाचा आणि शरीराचाही. बाईच्या विचारांचा विठोबा मात्र अठ्ठावीस युगे ताटकळत आहे आणि त्याच्या बाजूला एकाकी कोल्हटकरांची वामांगीही. नाकासमोर बघण्यात जन्म गेलेल्या. कधी बाप, कधी भाऊ, कधी नवरा, कधी मुलगा यांच्या तालावर आयुष्य घालवलेल्या. दगड झालेल्या मानेसारखं मनाचाही दगड केलेल्या. ज्या कुटुंबासाठी आयुष्यभर खस्ता काढायच्या त्या भरल्या कुटुंबातच एकाकी पडणाऱ्या. युगानुयुगाचं एकटेपण वाहणाऱ्या. घरात, नात्यात, गावात, समाजात. बायकांच्या कोलाहालात, बडबडीत आणि गोंधळात बाकी शून्य बनलेल्या. दुखरी कंबर आणि पोकळ कूस घेऊन रित्या झालेल्या.


दिंडीरवनातील एकटी रुक्मिणी
या साऱ्यात माझ्या मनात घर करून राहिलंय ते रुक्मिणीचं मंदिर. चंद्रभागेच्या पलीकडचं दिंडीरवनात एकट्या रुक्मिणीचं स्वतंत्र मंदिर. पंढरपुरात एकट्या रुक्मिणीचं स्वतंत्र मंदिर आहे हे मला माहीतच नव्हतं. पांडुरंगाचं दर्शन घेतल्यावर सगळेजण नाव ओलांडून रुक्मिणीच्या दर्शनाला येत होते. त्यात अर्थातच बायकांची संख्या जास्त. बायका या रुक्मिणीच्या मंदिराला माहेर म्हणत होत्या. रुक्मिणीच्या या मंदिराची कथाही मस्तच. नवरा वेळ देत नाही, लक्ष देत नाही या आजच्या काळातल्या बायकांसारखीच. भक्तांमध्ये रमलेल्या पांडुरंगाला कंटाळून रुक्मिणी रुसली आणि इथे दिंडीरवनात येऊन राहिली. स्वतंत्र बाण्याच्या रुक्मिणीचं हे स्वतंत्र मंदिर. मंदिराच्या ओट्यावर बायका निवांत बसल्या होत्या. हसत होत्या, बोलत होत्या, पहुडल्याही होत्या. कुणी फुगड्या खेळत होत्या, कुणी ओट्या भरत होती, कुणी बांगड्या भरून घेत होती. माहेरी आल्यागत. एकमेकींच्या सांगाती बनल्या होत्या.

रुक्मिणीच्या मंदिरात उभी असताना मला वारीतल्या सगळ्या बायका आठवल्या. रुक्मिणीच्या मंदिरातून निघताना मलाही एकटं एकटं वाटू लागलं. पण त्या एकटेपणात एक ताकद होती, शांतता होती. स्थिरता होती आणि समाधानही. प्राजक्त देशमुखच्या देवबाभळीत पांडुरंगाच्या लखुबाईला सल्ला देणाऱ्या तुकोबांच्या आवलीची ताकद बनून आलेली. आपण आपलं शेत नांगरत राहायचं… तो पडो न पडो याच्या चिंतेपलिकडे पोहोचणारी.

(दीप्ती राऊत ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

मोबाईल – ९७६४४४३९९८

फोटो : माऊली वैद्य, विशाल सवणे, फेसबुक दिंडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *