सुमारे सात लाख भाविकांनी
षष्ठी उत्सवाला लावली हजेरी
पैठण : शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराजांचा ४२५ व्या नाथषष्ठी सोहळ्याला निमित्ताने रविवारी (दि. ३१ एप्रिल) पैठणमध्ये सुमारे सात लाख भाविकांनी हजेरी लावली. तर सुमारे ५००हून अधिक दिंड्या या सोहळ्यासाठी पैठणमध्ये दाखल झाल्या आहेत.
संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे सकाळी समाधी मंदिराकडे प्रस्थान झाले. समाधी मंदिरात आल्यानंतर नाथवंशज ह. भ. प. योगेश महाराज महाराज गोसावी यांचे वारकरी कीर्तन, तर ह. भ. प. रावसाहेब महाराज गोसावी यांचे हरिदासी कीर्तन झाले. दरम्यान, देऊळवाड्यामध्ये राज्यातून आलेल्या विविध दिंड्यांनी प्रदक्षिणा केली. टाळ मृदंगाचा गजर आणि भानुदास-एकनाथाच्या जयजयकाराने पैठणनगरी दुमदुमून गेली. यंदाचा समाधी सोहळा उत्सव ४२५वा असल्याने समाधी मंदिर आणि वारकऱ्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच दुपारी अडीच वाजता संत ज्ञानेश्वर माऊलींचे सामूहिक पसायदान गाऊन विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली.
रात्री उशिरापर्यंत गोदावरीच्या वाळवंटात फडकरी, दिंडीकऱ्यांची भजन, कीर्तने सुरू होती. षष्ठीनिमित्त समाधी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. फाल्गुन वद्य द्वितीयेला सुरू झालेल्या या सोहळ्याचे षष्ठी, सप्तमी आणि काला अर्थात अष्टमी असे तीन दिवस मुख्य आहेत. सप्तमीच्या दिवशी रात्री १२ वाजता नाथांच्या पादुकांची गावातून मिरवणूक काढण्यात येते. त्यास छबिना असे म्हणतात. पहाटेच्या सुमारास पालखी वाळवंटात आल्यानंतर पादुकांना गोदास्नान घालण्यात येते, भारुड सादर केली जातात. सकाळी ७ वाजेच्या सुमारास पालखी गावातील मंदिरात येते. वारकऱ्यांच्या फडांमध्ये भजन कीर्तनादींचे आयोजन करण्यात येते. वाळवंटात कीर्तन ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी जमते.
अष्टमीच्या दिवशी सायंकाळी ४च्या सुमारास गावातील नाथमंदिरातून काला दिंडी निघते. उदासी मठाजवळील पायऱ्यांवर पावल्या खेळण्यात येतात. हे दृश्य आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी हजारोंचा समुदाय येथे उपस्थित असतो. समाधी मंदिरात पोचल्यानंतर मंदिराच्या समोरील पटांगणावर टाळ मृदंगाच्या गजरात शेकडो भाविक पावल्या खेळण्यात तल्लिन होऊन जातात.
मंदिराच्या बाजूस उंच ठिकाणी गूळ आणि लाह्या यांचे मोठेमोठे लाडू आकर्षकरित्या बांधण्यात येतात. त्याच्या मध्यभागी काला भरलेली हंडी लटकविलेली असते. सूर्यास्तासमयी ’दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ’ च्या जयघोषात नाथवंशजांकडून काठीच्या सहाय्याने ती हंडी फोडण्यात येते. प्रसाद मिळविण्यासाठी भाविकांची झुंबड उडते. परंपरेचे अभंग, गौळणी, आरती झाल्यानंतर गोदावरीच्या वाळवंटात काला वाटण्यात येतो आणि या सोहळ्याची सांगता होईल.
दरम्यान, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, कॅबीनेटमंत्री आणि देवस्थानचे अध्यक्ष संदीपान भुमरे, खासदार सुजयविखे पाटील, मराठा मोर्चाचे मनोज जरांगे पाटील यांनी समाधी मंदिरात दर्शन घेतले. या सोहळ्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. एसटी महामंडळाने भाविकांसाठी सव्वा तीनशे बसेसची सुविधा दिली आहे.
सोमवारी (दि. १) शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशनतर्फे संत एकनाथ महाराजांच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे सकाळी ११ वाजता पैठणमधील नाथगल्ली येथे वितरण होणार आहे. संत भानुदास महाराज आणि संत एकनाथ महाराजांच्या नावाने दिला जाणारा मुख्य ‘भानुदास एकनाथ पुरस्कार’ यंदा श्रीराम जन्मभूमी अयोध्या तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष प. पु. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच ह. भ. प. श्री. भरत महाराज पाटील, ह. भ. प. श्री. विश्वनाथ महाराज वारिंगे, कल्याणजी गायकवाड ह. भ. प. अशोक महाराज पांचाळ, श्रीहरी कृपा सेवा समिती आदींनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.