पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी
आळंदी देवस्थानची तयारी सुरू
पुणे : आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे २९ जून रोजी आळंदी येथील मंदिरातून प्रस्थान होणार आहे. या वर्षी पुणे (३० जून आणि १ जुलै), सासवडला (२ आणि ३ जुलै) येथे पालखी सोहळा दोन दिवस, तसेच लोणंदला अडीच दिवस मुक्कामी राहणार आहे. १६ जुलै रोजी पालखी सोहळा पंढरपूर येथे पोहोचणार आहे. १७ जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे, अशी माहिती माऊलींचे पालखी सोहळा प्रमुख आणि देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी दिली.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज संघटनेची बैठक पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ, विठ्ठल महाराज वासकर, नामदेव महाराज वासकर, राणू महाराज वासकर, माऊली महाराज जळगावकर, भाऊसाहेब गोसावी, भाऊसाहेब फुरसुंगीकर, राजाभाऊ थोरात, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, श्रींचे सेवक चोपदार राजाभाऊ रंधवे, बाळासाहेब रणदिवे यांच्यासह विविध दिंडीप्रमुख बैठकीस उपस्थित होते.
आळंदी ते पंढरपूर या पायी वारी प्रवासात विसाव्यास जागा नसल्याने शासनाने रस्त्याच्या दुतर्फा झाडी लावावी, अशीही मागणी या वेळी करण्यात आली. या वर्षी वाखरी ते पंढरपूर या रस्त्याचे काम सुरू आहे. पालखी तळ खाली आणि रस्ता वर झाला आहे. त्यामुळे वाहनांना अडचण येणार असल्याने नियोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने सोहळ्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रभावीपणे करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली.
विसावा वाढविण्याबाबत चर्चा
पालखी सोहळ्यामध्ये पुण्यात संगमवाडी ते भवानी पेठ तसेच निंबोरे ओढा ते फलटण विमानतळ हे अंतर पायी वाटचालीस जास्त आहे. यामध्ये सुवर्णमध्य काढून पालखी सोहळ्यामध्ये अर्ध्या तासाचा विसावा मिळावा, अशी मागणी राजाभाऊ थोरात आणि नामदेव महाराज वासकर यांनी आहे. पण, विसावा वाढविला तर रात्रीच्या समाज आरतीस उशीर होतो, याकडे लक्ष वेधून यासंदर्भात विचार करून नियोजन करण्याची सूचना बैठकीत करण्यात आली.