वारीचा टकळा कायम लागलेला
राहावा; एका पत्रकाराची प्रार्थना
डॉ. सदानंद मोरे यांची मुलगी अर्थात संत तुकाराम महाराजांची थेट वंशज, ही अमृता मोरे हिची मूळ ओळख. पण अमृतानं कामातून तिची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. २००९ मध्ये तिने ‘स्टार माझा’ या न्यूज चॅनलसाठी वारीचं वार्तांकन केलं. ते प्रेक्षकांसाठी आणि स्वत: अमृतासाठीही अविस्मरणीय आहे. कारण ते तिनं खूप मनापासून केलं आहे. तो अनुभव तिच्याच शब्दांत…
मी मूळची ‘देहू’ची मोरे असल्यानं वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षापासूनच देहूचा प्रस्थान सोहळा कमी-अधिक अनुभवत आलेय. लहानपणी बरीच वर्षं वारी म्हणजे गंमत, मजा असं समीकरण माझ्या मनात होतं. कळायला लागलं तशी वारीला जायची इच्छा होऊ लागली. अखेर अकराव्या वर्षी ती संधी आली. आणि मी पहिल्यांदा पंढरपूरपर्यंत पूर्ण वारी केली. तेव्हा मनात श्रद्धाभाव किती होता, आठवत नाही. पण हे आपल्या घरी केलं जातं, म्हणून आपणही करायला हवं यापलिकडची काहीतरी ओढ नक्की होती. म्हणूनच मी त्यावेळी वारी केल्याचं अजूनही स्पष्ट आठवतंय. किंबहुना शाळा बुडेल, जमणार नाही अशा अनेक कारणांनी आई नको म्हणत असताना मी हट्टानं वारी केली होती.
वारीची ती आठवण…
मनावर खूप खोलवर परिणाम करून गेली. त्याआधीही बऱ्याचदा प्रस्थान सोहळा, पुणे ते सासवड, जेजुरी असे कमी-अधिक प्रवास वारीत केले होते. आणि त्यानंतरही करत राहिले. वर्षामागून वर्षं गेली. मनातून कितीही वाटत असलं, तरी शाळेत वरच्या इयत्ता चढत गेले तसा पुन्हा संपूर्ण वारीचा योग काही आला नाही. शाळा संपली, कॉलेजची वर्षं सरली. वर्षागणिक वारीची ओढ नकळतपणे वाढत होती. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण होता-होता मी एबीपी माझा (तेव्हाचं स्टार माझा) जॉईन केलं. आणि मला पुन्हा एकदा वारी करायचे वेध लागले. आता पत्रकार झाल्यावर वारीचं रिपोर्टिंग करायला मिळणार अशी मला अपेक्षा होती. पण माझ्यावर नेमकी अँकरिंगची जबाबदारी आली आणि माझी वारी एअर कन्डिशन्ड स्टुडिओच्या बाहेर काही पडली नाही. २२ जून २००७ ला स्टार माझा लाँच झालं आणि माझ्या वारकरी पार्श्वभूमीमुळे मला वारीच्या बुलेटिन्सचं अँकरिंग करायला मिळालं. प्रत्यक्ष वारीला जायला न मिळाल्यानं मी थोडीशी खट्टू झाले, पण अँकरिंग हा त्यातल्या त्यात दिलासा होता. २००८ मध्ये मात्र मला नक्की वारी कव्हर करायला जाता येईल, अशी खात्री होती. पण अँकर्सची नेहमीच मारमार असल्यानं त्याही वर्षी ती फोल ठरली. तरी देखील देहू आणि आळंदी दोन्ही प्रस्थानच्या दिवशी मी जाऊ शकले.
हट्ट करून गेले वारीला…
आणि अखेरीस २००९ साली मात्र मी अक्षरश: हट्ट धरून बसले, की मला वारीच्या रिपोर्टिंगला जायचंच आहे. आणि सुदैवानं मला त्या वर्षी वारी कव्हर करायची संधी मिळाली. ही संधी मिळाली खरी, पण २४ तासांच्या वृत्तवाहिन्या सुरू होऊन तीन वर्षं होऊन गेल्यानं वारीतले कॅलेंडर इव्हेन्ट्स एव्हाना प्रेक्षकांनासुद्धा परिचयाचे झाले होते. त्यामुळे आता नवीन काय सांगायचं, हा मोठाच प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. मात्र आपल्या ह्या समृद्ध परंपरेची विविध रूपं आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला हवीत, असं पक्कं वाटत होतं. वारकरी संप्रदायाला प्रामुख्याने भक्ती संप्रदाय म्हटलं जात असल्यानं सर्वसामान्यांचा संप्रदायाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आजही केवळ श्रद्धेशी निगडीत आहेत. मात्र मुळातच या संप्रदायात असलेली क्रांतीची आणि आधुनिकतेची बीजं आपण लोकांना सांगायला हवीत, ह्याची मला जाणीव होती आणि या निमित्तानं मला एक चांगली संधी मिळाली होती. व्हिज्युअल माध्यम असल्यानं प्रत्येक स्टोरीत आपणही त्याचाच एक भाग दिसायला हवं, अशा प्रकारचा विचार मनात होताच. नाहीतर आजूबाजूला सगळं भक्तीमय वातावरण, गावा-खेड्यातली श्रद्धाळू माणसं आणि पीटूसीमध्ये रिपोर्टर वेगळ्याच जगातला असं वाटायला नको, हे डोक्यात पक्कं होतं.
बाबांचे झब्बे आणि जॅकेटस्…
एरवी मी जीन्स, टॉप्स आणि स्कर्ट्स घालणारी शहरी मुलगी. पंजाबी ड्रेसही क्वचितच. पण वारकऱ्यांमध्ये वावरायचं तर त्यांच्यासारखा पेहराव असावा, असं वाटलं. अर्थातच साडी-बिडी नेसून वारीच्या रिपोर्टिंगची धावपळ कठीण होती. त्यामुळे मग झब्बा, वर नेहरू जॅकेट आणि सोयीसाठी जीन्स असा पेहराव ठरवला. रोज सकाळी कव्हरेजसाठी बाहेर पडताना न चुकता बुक्का मात्र लावायचे. डोक्यावर कधी गांधी टोपी, तर कधी फेटासुद्धा. वारी कव्हर करणं हा जसा माझ्यासाठी भावनिक मुद्दा होता, तसंच मी वापरलेले झब्बे हा भागसुद्धा भावनिकच होता. मी माझ्या बाबांच्या झब्ब्यांवर आणि जॅकेट्सवर मोठाच डल्ला मारला. भावनिक कारण असं, की एकतर बाबांचा संत साहित्याचा गाढ अभ्यास आहे. आणि दुसरं म्हणजे ते तुकाराम महारांजांचे वंशज आहेत. त्यामुळे त्यांच्या झब्ब्यांच्या रूपानं का होईना, त्यांचा आशीर्वाद माझ्याबरोबर असण्याचा फील मला हवा होता. जो मी पुरेपूर घेतला. अर्थात माझ्या त्या पेहरावाची वेगळी छाप पडल्याचं वारीदरम्यान बऱ्याच जणांनी तसं सांगितल्यावर लक्षात आलं. पण मूळ हेतू छाप-बिप पाडण्याचा किंवा काहीतरी हटके पेहराव करण्याचा अजिबातच नव्हता.
अँकर म्हणून असलेलं ग्लॅमर…
‘माझा’ लाँच होऊन दोन वर्षं होऊन गेल्यानं अँकर म्हणून माझा चेहरा पुरेसा प्रस्थापित झाला होता. त्याला त्याचं-त्याचं असं एक छोटंसं ग्लॅमरही प्राप्त झालं होतं. त्यामुळे पायी चालणारे पुष्कळ भाविक मला बऱ्यापैकी ओळखत होते. त्यांनी मला बातम्या देताना, मुलाखती घेताना पाहिलं होतं आणि वारीत मी वार्तांकन करत त्यांच्याबरोबरीने, मागे-पुढे चालत होते, याचं त्यांना अप्रूप वाटत होतं. टिव्ही माध्यमाची ताकद मला तेव्हा पहिल्यांदा जाणवली. मी आदल्या दिवशी केलेल्या एखाद्या स्टोरीचा उल्लेख दुसऱ्या दिवशी विसाव्याच्या, मुक्कामाच्या ठिकाणी अनेक जण करत. वारीचं नेमकं फंक्शनिंग कसं होतं, त्याची मॅनेजमेंट कशी असते, हे मला इतर पत्रकारांच्या तुलनेनं थोडं जास्त ठावूक असल्यानं सांप्रदायिक विचारांबरोबरच तिथली माणसं, त्यांचं निर्व्याज प्रेम आणि निरपेक्ष प्रवास मला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा होता. एके दिवशी दिंडीचा स्वयंपाक जिथे बनतो, त्या तंबूत शिरून मी तिथल्या मावश्यांशी गप्पाच मारायला बसले. गप्पांच्या ओघातच भाकरी करण्याचा विषय निघाला आणि मी चक्क त्यांच्याकडून भाकरी करायला शिकले. तिथेच ठेचासुद्धा केला. आणि ठेचा-भाकरी खाल्ली सुद्धा. मुख्य म्हणजे हे सगळं शूट करून एक स्टोरीच बनवली. टिव्हीसारख्या चकाकणाऱ्या माध्यमातली एक मुलगी आपल्या आई-बहिणीसारखी भाकऱ्या थापताना बघून बहुदा प्रेक्षकांना छान वाटलं असावं. पुढे पंढरपूरपर्यंत मला अनेकांनी ‘काय मग ताई, भाकरी जमायला लागली का’, असं आवर्जून विचारलं.
शहरी प्रेक्षकांसाठी…
मला माहीत असलेला हा अद्भुत सोहळा मला विशेषत: शहरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा होता. वारकऱ्यांकडे आणि साध्या, ग्रामीण, सश्रद्ध माणसांकडे बघण्याचा शहरी लोकांचा दृष्टीकोन एकंदर तुच्छतावादी असतो, असा माझा अनुभव होता. त्यामुळे या माणसांकडे, त्यांच्या ‘वारी’ नावाच्या उपासनेकडे प्रेक्षकांना नव्या आणि स्वच्छ दृष्टीने बघता येण्यासाठी मी माझ्या परीने जे करू शकते, ते मला करायचं होतं. वारकरी संप्रदायानं तोवर अप्राप्य असणारा, केवळ तप किंवा यज्ञ-याग करून प्राप्त करून घेता येणारा देव अगदी सोपा करून कसा दिला, तुमच्या आमच्या घरात, मळ्यात, वेणीफणीत कसा आणून सोडला, हे मला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. या सगळ्या संदर्भांना माझ्या वार्तांकनात आजच्या काळाशी जोडण्याचा मी सातत्यानं प्रयत्न करत होते.
या सगळ्याचा भाग म्हणून मी सांगत असलेले अभंग, देत असलेले दाखले यांच्या बरोबरीनंच माऊलींच्या पालखीच्या कोठीच्या खोलीपासून (आळंदी ते पंढरपूर व परत आळंदी या सबंध मार्गावर पालखीला लागणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या वस्तूचा संग्रह व त्याची नोंद असणारी ही खोली) ते प्रस्थान सोहळ्याच्या सुरक्षेसाठी असलेल्या स्निफर डॉगपर्यंत वेगवेगळ्या आणि तोवर प्रेक्षकांना माहीत नसलेल्या अनेक गोष्टी दाखवायचाही मी प्रयत्न केला.
मैत्र जीवांचे…
‘भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे’ या पसायदानातल्या मागण्याचा मी या वारीत अनुभव सुद्धा घेतला. कुत्र्या-मांजऱ्यांपासून, शेळ्या-मेंढ्या, बैल-घोडे अशा वेगवेगळ्या प्राण्यांशी इंटरऍक्शन केली. आणि नुसतीच केली नाही, तर ती प्रेक्षकांनाही दाखवली. सोहळ्यात येणारे स्निफर डॉग्ज, त्यांचं ट्रेनिंग, त्यांचं रूटीन या सगळ्याबद्दल त्यांच्या ट्रेनर्सशी बोलण्याआधी दोन प्रश्न चक्क त्या कुत्र्यालाही विचारले. त्यानंही भुंकून प्रतिसाद दिल्याचं आठवतंय. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमच्या बुलेटिन प्रोड्युसर्सनी सुद्धा हे सगळे वेडे चाळे ऑन एअर दाखवले. सामान्य वारकऱ्यांशी केलेल्या गप्पा-गोष्टी, त्यांच्याबरोबर गायलेली भजनं, घातलेल्या फुगड्या, त्यांच्यात मिसळून त्यांचं वारीदरम्यानचं जगणं कॅमेरात कैद करून प्रेक्षकांपर्यंत माझ्या परीनं पोहोचवलं. आणि बहुदा प्रेक्षकांनाही ते भावलं असावं. पुढे अनेक वर्षं माझ्या परिचयाचे अनेक लोक मी कव्हर केलेल्या वारीची आठवण काढत होते. मी ‘सोनी पिक्चर्स’ जॉईन केल्यानंतर २०१८ साली महिला पोलीसांवर बेतलेल्या एका मालिकेसाठी लोणावळ्याच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये गेले होते. तिथल्या एका अधिकाऱ्यानं मला नावासकट ओळखलं आणि तुम्ही कव्हर केलेली वारी फार सुंदर होती, अशी पावतीही दिली.. तेही त्या कव्हरेजच्या तब्बल ९ वर्षांनंतर. वारीदरम्यान सेल्फलेस होण्याच्या एका अनोख्या प्रक्रियेतून माणूस जातो, हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ हे तुकोबांचं वाक्य जातीय विषमता, धार्मिक तेढ बाजूला सारण्याच्या दृष्टीनं आपण अनेकदा वापरतो. पण अगदी स्त्री-पुरूष भेदसुद्धा वारीत विसरून जायला होतं, याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला तो या वारीतच. या वारीत मी किती अनोळखी स्त्री-पुरूषांबरोबर फुगड्या घातल्या, याची तर गणनाच नाही. पण एक आठवण अगदी न विसरता येण्याजोगी.
आम्ही एकमेकांचे माऊली…
वारीदरम्यान आजूबाजूच्या गावा-शहरातली हॉटेल्स, गेस्ट हाऊसेस फुल होतात, हे सगळ्या पत्रकारांसाठी नेहमीचं आहे. ऑफिसनं चांगलं नियोजन केल्यामुळे आम्हाला बहुतेक ठिकाणी राहण्याची व्यवस्थित सोय करता आली होती. वीस-पंचवीस दिवस वेगवेगळ्या ठिकाणी मुक्कामासाठी दोन खोल्या बुक केलेल्या असायच्या. एक रिपोर्टरसाठी म्हणजेच माझ्यासाठी आणि दुसरी कॅमेरामन आणि ड्रायव्हरसाठी. फक्त इंदारपूरच्या शासकीय गेस्ट हाऊसमध्ये फक्त एकच खोली उपलब्ध होती. अगदी तिथे पोहोचेपर्यंत आम्ही दुसऱ्या खोलीसाठी खटपट करत होतो. पण अखेर अपयशच आलं. एरवी मी पूर्णवेळ अँकरिंग करत असल्यानं फील्डवरच्या कॅमेरामन मंडळींशी माझा रोजचा संपर्क नसायचा. माझ्याबरोबर गजानन नावाचा आमचा कॅमेरामन होता. त्याची आणि माझी ही पहिलीच एकत्र असाईन्मेंट. आणि तीही वीस-पंचवीस दिवसांची. एरवी अशा प्रसंगात रिपोर्टरसुद्धा पुरूषच असेल, तर तिघं एका खोलीत राहायला काहीच हरकत नसती, पण आमची सिच्युएशन थोडी वेगळी होती. माझ्या खोलीचा प्रश्न मिटला असला, तरी गजानन आणि ड्रायव्हर कुठे झोपणार हा प्रश्न अनुत्तरीत राहिल्यानं मला काही खोलीत जाऊन झोपावंसं वाटेना. तोवर गजानन बाहेर आणखी कुठे काही सोय होते का तेही चेक करून आला, पण सगळीकडेच सिच्युएशन पॅक होती. शेवटी आपण तिघांनी या एकाच खोलीत थांबू या, असा प्रस्ताव मी गजाननपुढे ठेवला. त्याची पहिली प्रतिक्रिया साहजिकच नकारार्थी होती. एक तर आमची काही मैत्री नव्हती, त्यात मी अँकर असल्याचं हे हलकं वलय आपसूकच माझ्याभोवती होतं. त्यात बाई-बुवा हा मोठाच भेद. त्याला खूपच संकोच वाटत होता. ‘एका रात्रीचाच तर प्रश्न आहे. काही नाही होत’, असं मी अगदी सहज म्हटलं आणि अखेर तो तयार झाला. आम्ही त्यावेळी एकमेकांसाठी फक्त माऊली होतो कदाचित, जसे सगळे वारकरी एकमेकांसाठी असतात. एरवी दुसऱ्या एखाद्या प्रसंगात, दुसऱ्या एखाद्या असाईन्मेंटसाठी गेलो असताना आमच्यासाठी हे एवढं सहज झालं असतं का, माहीत नाही. पण वारीत होतो त्यामुळे सहज झालं हे नक्की. त्यानंतर ‘माझा’मध्ये असेपर्यंत गजानन आणि मी एकमेकांना ‘माऊली’ म्हणूनच हाक मारत राहिलो.
सावळ्या रुपाशी तादात्म्य…
एरवी अँकर असल्यानं त्वचेची, केसांची काळजी घेणं, वेळोवेळच्या पार्लरच्या फेऱ्या हे सगळं अगदी ठरलेलं असायचं. बाहेर पडताना सनस्क्रीन वगैरे नियमित लावायचे. पण वारीदरम्यान रोजचा दिवस पहाटे पाच-साडेपाचला सुरू व्हायचा. इतर दिंड्यांचा प्रवास सुरू होऊन रस्ता ब्लॉक होण्यापूर्वी आमची गाडी आणि ओबी व्हॅन पुढे जाणं गरजेचं होतं. त्यामुळेच पटकन आवरून हॉटेलमधून बाहेर पडणं क्रमप्राप्त असायचं. पण एवढ्या पहाटे सनस्क्रीन लावण्यात काही अर्थ नव्हता. आणि नंतर कामात इतकं गुंतून आणि गुंगून जायला व्हायचं, की ऊन, वारा, पाऊस कशाचंच भान राहायचं नाही, सनस्क्रीन तर दूरची बात. यामुळे झालं असं, की इतर वेळी दिवस-दिवस एअर कन्डिशन्ड स्टुडिओ आणि ऑफिसमध्ये काम करणारी मी वारीचे सबंध २२-२५ दिवस उन्हा-तान्हात भटकून रिपोर्टिंग केलं. त्यामुळे साहजिक खूप काळवंडून गेले होते. वारी संपवून मी ऑफिसला परत गेले, तेव्हा प्रेक्षक मला ओळखूच शकणार नाहीत या भीतीनं दोनेक आठवडे अँकरिंगसाठी मला ऑन एअर जाऊ दिलं नव्हतं, इतकी मी टॅन झाले होते. पण माझ्यासाठी ते केवळ टॅनिंग नव्हतं, तर एका अर्थी विठूरायाच्या सावळ्या रूपाशी तादात्म्य पावण्याचीच ती माझी धडपड होती.
आपोआप लागले डोळे पाझरू…
ज्या विठूरायाला भेटण्यासाठी सगळी संत मंडळी, लाखो वारकरी तहान-भूक विसरून वर्षानुवर्षं पंढरीला जातात, तो विठूराया एक प्रकारचं वेड लावतो. हे वेड प्रेमाचं असतं, भक्तीचं असतं, स्वत:ला झोकून देण्याचं, विसरून जाण्याचं असतं. या वेडानं आपल्याला पुन्हा पुन्हा झपाटावं असं वाटत राहतं. ते वेड आपल्याला गायला-नाचायला लावतं. ते वेड कधी धावायला लावतं, तर कधी शब्दांतून व्यक्त व्हायचा प्रयत्न करतं. कधी पंगतीला वाढायला भाग पाडतं, तर कधी विनाकारण डोळ्यातून पाझरत राहतं. इंदापूरचा रिंगण सोहळा सुरू असताना ऑन एअर बुलेटिन सुरू होतं आणि नेमकं त्याच वेळी स्टुडिओ माझ्याकडे लाईव्हसाठी आला. ज्ञानदा कदम (तेव्हाची चव्हाण) अँकरिंग करत होती. प्रचंड गर्दीत मी ओबी व्हॅनच्या वर उभी होते. माझ्या मागे डोळ्यांचं पारणं फेडणारा रिंगण सोहळा सुरू होता. वेगवेगळ्या अभंगांच्या ओळी उद्धृत करत मी रिंगणाचं वर्णन करत होते. संतांच्या भक्तीचं, साध्या-भोळ्या वारकऱ्यांच्या निष्ठेचं, अखंड सुरू असणाऱ्या हरीनामाच्या गजराचं वर्णन करत असताना माझे डोळे आपोआप कधी पाझरू लागले, माझं मलाच कळलं नाही. मी नेमकं काय बोलत होते, ते आता आठवत नाही. पण सबंध लाईव्ह मी रडत-रडत केल्याचं मात्र नक्की आठवतं. डोळ्यातून ओघळणारे ते अश्रू माझं आणि विठ्ठलाचं काहीतरी नातं आहे, हेच दर्शवत होते. रिंगण झाल्यावर तिथली माती कपाळाला लावल्यावर माझ्या चेहऱ्यावर उमटणारं समाधान मला त्या अनुपम्य सोहळ्याचं वाटणारं अप्रूपच सांगत होते.
अखंड प्रेमाचा कल्लोळ…
मी कव्हर केलेल्या त्या वारीनं अनेक आठवणी तयार केल्या. काही व्हिडिओज आणि फोटोजच्या रूपानं आजही जपून ठेवलेल्या आहेत. काही फेसबुकनं जपल्यायंत, तर अनेक आठवणी मनाच्या आतल्या कप्प्यात खोलवर कुठेतरी रूजलेल्या आहेत. आणि तिथेच कदाचित डोळ्यातून वाहणाऱ्या त्या अश्रूंचं उगमस्थानही आहे. २००९ च्या वारीच्या रिपोर्टिंग नंतर मी कधी पडद्यामागून वारीची बुलेटिन्स काढली, तर कधी वारीच्या निमित्तानं वेगवेगळ्या माध्यमांसाठी कुठेकुठे लिखाण करत राहिले. बहुतेक वेळा किमान प्रस्थानाचा सोहळा तरी पाहता यावा, असा माझा आग्रह असायचा. यंदाच्या वर्षी माझ्या लेकाला घेऊन वारी करायचा माझा मानस आहे. तो पूर्ण होईल, अशी अपेक्षा. वारीचं हे वेड असंच राहो, पंढरीचा लागलेला टकळा असाच राहो, प्रेमाचा अखंड कल्लोळ सतत अनुभवायला मिळत राहो, पुन्हा पुन्हा स्वत:शी नव्यानं भिडायला मिळत राहो, वर्षभर गोळा केलेले सगळे इगोज, अहम् चंद्रभागेत धुतले जावोत, अशीच माझी पांडुरंगाकडे कायम प्रार्थना आहे. तुकोबांनी जे मागणं विठ्ठलाकडे मागितलं, तेच माझंही मागणं आहे. पंढरीचा वारकरी, वारी चुको नेदी हरी…