संत तुकाराम महाराजांची
छत्रपती शिवरायांना मदत
(।।ज्ञानबातुकाराम।। वार्षिकाच्या ‘बा तुकोबा’ या विशेषांकातील प्रा. ज्ञानेश्वर भोसले यांच्या लेखाचा संपादित अंश..)
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यनिर्मितीसाठी संत तुकाराम महाराजांच्या विचारांनी अनमोल योगदान दिले, ही बाब सर्वच इतिहासकारांनी मान्य केली आहे. तुकोबांच्या आणि शिवरायांच्या संबंधांच्या अनुषंगाने अनेक अभ्यासकांनी तुकोबांच्या ‘पाईकी’च्या अभंगांचे मूल्यमापन केले आहे. तुकोबांच्या अभंगगाथेमध्ये एकूण १२ पाईकीचे अभंग आहेत. या अभंगांमधून तुकोबांनी मावळ्यांना जिवावर उदार होऊन, प्रसंगी प्राणाची आहुती देऊन आपल्या राजाचे रक्षण करण्याची प्रेरणा दिलेली आहे.
पाईकीचे अभंग
तुकोबांनी उपदेशाच्या रूपाने पाईकीचे अभंग शिवरायांना सांगितले असे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी ‘तुकाराम वचनामृत’ या ग्रंथात म्हटले आहे. गं. बा. सरदार यांनी त्यांच्या ‘संत साहित्याची सामाजिक फलश्रुती’ या ग्रंथामध्ये तुकोबा-शिवाजी यांच्या संबंधांच्या बाबतीत मत मांडताना पाईकीच्या अभंगांचा संदर्भ दिलेला आहे. ते लिहितात, “शिवाजीराजांपाशी संख्याबळ व शस्त्रबळ खूपच कमी होते; तरीही त्यांच्या सैनिकांनी अद्भुत पराक्रम गाजविला. कारण ते जातिवंत ‘पाईक’ होते; भाडोत्री नोकर नव्हते”. संत तुकारामांचे ‘पाईकीचे अभंग’ म्हणजे तुकोबांनी शिवरायांच्या मावळ्यांसाठी केलेला उपदेशच होय, असे मत डॉ. रामकृष्णदास लहवितकर यांनीही मांडले आहे. ते लिहितात, “शिवरायांच्या महाराष्ट्रधर्माच्या जडणघडणीत तुकोबारायांनी आपली सामाजिक प्रबोधनकर्त्याची बाजू नेमकेपणाने उचलली आणि अठरापगड जातींमध्ये सामाजिक समतेचा आणि आध्यात्मिक एकतेचा मंत्र पोहोचविला…”
डॉ. सदानंद मोरे यांनीही तुकोबांच्या पाईकीच्या अभंगांचा स्वराज्याशी असलेला संबंध आपल्या ‘तुकाराम दर्शन’ या ग्रंथामध्ये विस्तृतपणे मांडला आहे. शिवरायांच्या काळातील भू-राजकीय परिस्थितीबद्दल माहिती देऊन ते लिहितात, “मावळ भागातील जनसामान्यांवर तुकोबांचा मोठा प्रभाव होता. या सामान्य लोकांना तुकोबांनी क्षात्रधर्माचा उपदेश केला. पाईकांना निष्ठेची नीती सांगितली. गनिमी युद्धाची मार्गदर्शक तत्त्वे सूत्ररूपाने समजावून दिली.” गंगाधर बनबरे यांनी आपल्या ‘तुकोबांचे शिवकार्य’ या लेखामध्ये तुकोबा-शिवराय यांचा संबंध विस्तृत मांडला आहे. त्यामध्ये त्यांनी वारकर्यांनी नामदेवांपासूनच स्वराज्यासाठी अनुकूल वातावरणनिर्मितीचे कार्य सुरू केल्याचे म्हटले आहे. ही तुकोबांच्या पाईकीच्या अभंगांचा थेट संबंध शिवरायांच्या शुद्धनीतीशी जोडलेला आहे.
तुकोबा-शिवराय भेट
‘संत तुकोबारायांची राष्ट्रजागृती’ या आपल्या लेखात डॉ. रामकृष्णदास लहवितकर यांनी तुकोबा-शिवराय भेटीचा ऐतिहासिक पुरावा दिला आहे. ते लिहितात, “तुकोबारायांनी कीर्तनाद्वारे जागृत केलेला, बराच प्रदेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात मोडत होता. स्वतः शिवाजी महाराज तुकोबारायांच्या कीर्तनास येत असत, असे वर्णन सापडते.” तुकोबा आणि शिवराय यांची प्रत्यक्ष भेट झाल्याचे उल्लेख अनेक अभ्यासकांनी केलेले आहेत. डॉ. शं. गो. तुळपुळे हे त्यातील महत्त्वाचे अभ्यासक आहेत. तुकाराम-शिवाजीमहाराज यांची भेट शके १५७१ ला ज्येष्ठ मासानंतर झाली असावी”, असे ते म्हणतात.
वि. का. राजवाडे यांनीही तुकोबा-शिवराय भेटीची ही घटना मान्य केली आहे. ग्रँड डफ यांनीही आपल्या इतिहासावरील लेखनाच्या सहाव्या खंडात तुकोबा-शिवराय भेट शके १५८५ मध्ये झाल्याचे म्हटले आहे. डफ यांनी सांगितलेल्या तिथीतील विसंगती राजवाडेंनी दाखवून दिलेली आहे. पुढे मल्हार रामराव चिटणीस यांनी लिहिलेल्या शिवरायांच्या जीवनावर आधारित ‘सप्तप्रकरणात्मक चरित्र’ या बखरीमध्येही तुकोबा-शिवराय भेट झाल्याचा उल्लेख सापडतो. हा संदर्भ राजवाड्यांनी दिलेला आहे. राजवाडे लिहितात, “बोवाच्या कथेला पुण्यास शिवाजी एकदां गेला होता व त्यावेंळी चाकणच्या दोन हजार पठाणांनी शिवाजीला धरण्याचा प्रयत्न केला… तुकारामाला शिवाजीनें शके १५७१ च्या वैशाखाच्या आधीं कधीं तरी पत्र पाठविलें असेल हे संभवते.”
ल. रा. नसिराबादकर यांनी आपल्या ‘प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास’ या ग्रंथामध्ये बखर वाङ्मयावरील प्रकरणामध्ये ‘श्रीशिवछत्रपतींचे सप्तप्रकरणात्मक चरित्र’ या ग्रंथाबद्दल माहिती देताना शिवराय-तुकोबा भेटीचा उल्लेख केलेला आहे. शिवराय स्वत: अनेकदा तुकोबांचे कीर्तन ऐकायला येत. अशाच एका कीर्तनामध्ये शिवराय आले असताना अचानक परकीय आक्रमकांना शिवराय येथे असल्याचे समजले. तेव्हा त्यांनी त्या परिसरामध्ये शिवरायांचा शोध सुरू केला. तेव्हा तुकोबांनी असा चमत्कार केला की, त्या सैनिकांना सर्वांमध्येच शिवराय दिसू लागले. त्यामुळे कंटाळून ते निघून गेले. अशाप्रकारे शिवरायांवर आलेले मृत्यूचे संकट तुकोबांनी दूर केले, अशी कथा अनेक अभ्यासकांनी आपल्या लेखनामध्ये मांडली आहे. वारकरी कीर्तनकार आपल्या कीर्तनातून श्रद्धाभावाने ही कथा सांगतात. गो. नी. दांडेकरांनी आपल्या ‘तुका आकाशाएवढा’ या कादंबरीमध्ये हा प्रसंग लालित्यपूर्ण रीतीने रंगवला आहे.
१९३६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘संत तुकाराम’ या चित्रपटामध्येही हा प्रसंग चित्रित करण्यात आलेला होता. ही घटना महिपती ताहराबादकर आणि चिटणीस यांनीही आपल्या तुकोबांच्या चरित्रांमध्ये मांडली आहे. त्याचबरोबर कृष्णराव अर्जुन केळूसकर यांनीही आपल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या ग्रंथामध्ये ही घटना थोड्या-फार फरकाने सांगितली आहे. तुकोबा आणि शिवराय यांच्या भेटीविषयीचे मत व्यक्त करताना रा. ग. हर्षे म्हणतात, “तुकाराम महाराजांसारखा महाराष्ट्रभर गाजलेला सत्पुरुष आपल्या मुलखात शेजारी असताना त्याची भेट घेतल्याखेरीज शिवाजी महाराज राहिले असतील असे वाटत नाही.” किशोर सानप यांनीही आपल्या ‘समग्र तुकारामदर्शन’ या ग्रंथामध्ये तुकोबा आणि शिवराय यांची भेट झाल्याचे स्पष्ट केले आहे.
तुकोबारायांनी शिवरायांचे मन वळविले
तुकोबा आणि शिवराय यांचे संबंध सूचित करणारी आणखी घटना महत्त्वपूर्ण आहे. शिवरायांनी तुकोबांचे एक कीर्तन ऐकले. त्यामध्ये तुकोबांनी वैराग्य, निवृत्ती, अपरिग्रह या विषयावर आपले चिंतन मांडले. ते ऐकून शिवरायांना उपरती झाली आणि त्यांनी स्वराज्याची जबाबदारी इतरांवर सोपवून तुकोबांसोबत राहायचा निर्णय घेतला. तेव्हा तुकोबांनी दुसर्या दिवशीच्या कीर्तनामध्ये कर्मसिद्धांत सांगून त्यांना स्वराज्याच्या कामी जाण्याचे महत्त्व प्रतिपादन करून त्यांचे मन:परिवर्तन केले. कृष्णराव अर्जुन केळूसकर यांनीही ही घटना आपल्या शिवचरित्रामध्ये सांगितली आहे.
गुरू-शिष्य नाते
तुकोबांना गुरू करावे, हा विचार शिवरायांच्या मनात अनेकदा आला होता. परंतु “गुरू-शिष्यपण। हे तो अधम लक्षण।।” असे मानणार्या तुकोबांनी शिवरायांचे गुरूपद नाकारले; परंतु शेवटपर्यंत तुकोबा शिवरायांच्या गुरूस्थानीच होते. यासंदर्भात केळूसकर लिहितात, “तुकारामबावांस गुरू करून त्यांच्या समागमानें आयुष्य घालवावें असा महाराजांचा हेतू फार होता… म्हणून त्यांनी तुकारामबावांस आपल्या सन्निध राहावयास बोलाविलें होतें; परंतु ते बावा अत्यंत विरक्त असल्यामुळें त्यांच्या ऐश्वर्यास व बहुमानपुरस्सर केलेल्या आमंत्रणास ते भुलले नाहींत.”
तुकोबा आणि शिवराय यांच्या संबंधांबाबत आणखी एक घटना सांगितली जाते. तुकोबांनी आपले सगळे धान्य-दुकान १६२८ ते १६३० या काळामध्ये आलेल्या दुर्गादेवी नावाच्या दुष्काळामध्ये गोरगरिबांना वाटून टाकल्यानंतर त्यांच्यावर गरिबी आली. त्यांची पत्नी, मुले, गुरे-ढोरे अन्नाशिवाय मरण पावली. ही बाब कळताच शिवरायांनी तुकोबांकडे नजराणा पाठवला. तुकोबांनी तो नजराणा नाकारला आणि शिवरायांना पत्ररूपाने काही अभंग लिहून पाठवले. यामुळे शिवाजींच्या मनात संत तुकारामांबद्दलचा आदर खूपच वाढला.
यामुळेच तुकोबा हे शिवरायांना गुरुस्थानी होते, याबद्दल शंका वाटत नाही.
– प्रा. ज्ञानेश्वर भोसले