संत तुकाराम महाराजांनी

सांगितली अभंगांतून भूतदया

आज संत तुकाराम महाराज यांची बीज. आजच जागतिक चिमणी दिवसही आहे. त्यानिमित्ताने तुकाराम महाराजांच्या जीवनातील चिमण्यांशी संबंधित हे काही प्रसंग –

तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांतून भूतदया सांगितली. त्यांनी निसर्ग, प्राणी, पक्षी यांची जपणूक करण्याचा संदेश आपल्या आचरणातूनच दिला. संत ज्ञानेश्वर माऊलींवर तुकोबारायांची निस्सिम श्रद्धा होती. माउलींनी सांगितलेली
जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत।।
हा भक्तियोग निश्चित जाण माझा।।
ही भूतदया त्यांनी अंगी बाणवली होती. त्यातूनच तुकोबारायांना अनेक अभंग स्फुरले.
भूतदया गाई पशूंचे पालन।
तान्हेल्या जीवन वनामाजी॥
शांतिरुपें नव्हे कोणाचा वाईट।
वाढवी महत्त्व वडिलांचे॥
किंवा
वृक्षवल्ली आह्मां सोयरीं वनचरें।
पक्षी ही सुस्वरें आळविती।।
किंवा
कोणाही जीवाचा न घडो मत्सर।
असे अनेक भूतदया सांगणारे त्यांचे अभंग प्रसिद्ध आहेत.

आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींनी भेटण्यासाठी ते नेहमी जात. देहू ते आळंदी हे १५ किलोमीटरचे अंतर ते नामस्मरण, चिंतन करत पायी चालून जात. एकदा ते असेच जात असताना रस्त्याकडेच्या शेतातील पिकांवर बसलेला चिमण्यांचा थवा त्यांच्या चाहुलीने भुर्रर्रकन् उडाला. ते पाहून तुकोबाराय अस्वस्थ झाले. आपल्या शरीरात या निष्पाप पक्ष्यांना घाबरवून सोडणारे काही तरी तत्त्व अजून शिल्लक आहे. ते नष्ट व्हायला पाहिजे म्हणून ते तिथेच नामस्मरण करत निश्चल उभे राहिले.
त्यावेळी त्यांना स्फुरलेला आर्त अभंग असा-
अवघीं भूतें साम्या आलीं। देखिलीं म्यां कैं होतीं॥
विश्वास तो खरा मग। पांडुरंग कृपेचा॥
माझी कोणी न धरो शंका। हो कां लोकां निद्वपद॥
तुका ह्मणे जें जें भेटे। तें तें वाटे मी ऐसें॥
त्यावेळी तुकाराम महाराजांना सर्व भूतात्मक ऐक्याच्या भावनेचा लाभ झाला आणि उडून गेलेल्या चिमण्या पुन्हा झाडावर बसतात तशा हळूहळू तुकोबारायांच्या अंगावर येऊन बसल्या!

चिमण्यांशी संबंधित त्यांची आणखी एक कथा आहे.
तुकाराम महाराज ध्यान करायचे त्या जागेजवळ एक शेत होते. त्यात ज्वारीचे पीक उभे होते. शेताच्या मालकाने तुकोबारायांना एक गोफण देऊन पाखरांपासून पिकाचे राखण करावयास सांगितले. या मेहनतीसाठी तुकोबांना अर्धा मण ज्वारी देण्याचेही ठरले. परंतु पक्षीही ईश्वरानेच निर्मिलेले आहेत, तीही विठ्ठलाचीच लेकरे आहेत, असे वाटल्याने त्यांनी चिमण्यांना सगळे पीक खुशाल खाऊ दिले. चिमण्या धान्य खात असताना ते ईश्वराचे नामस्मरण करत बसले. त्यावेळी तिथं अचानक आलेल्या शेतकऱ्याने हे दृश्य पाहिले आणि त्याबद्दल तुकाराम महाराजांना जाब विचारला.

त्यावर ते म्हणाले, ‘या पिकांत पक्ष्यांचासुद्धा वाटा नाही का? मग मी त्यांना का हुसकावून द्यावे?’ अर्थातच शेताच्या मालकास अख्ख्या शेतात काहीही धान्य उरले नाही. तेव्हा त्याने नुकसानभरपाई म्हणून तुकाराम महाराजांकडून शेतातून एरवी निघाली असती तितकी ४० मण ज्वारी मागितली. गावातील पंचायतीने हा दावा निकालात काढण्याचे ठरवले आणि शेतातील धान्य काढावयास सुरुवात केली. तेव्हा प्रत्यक्ष शेतातून शेकडो मण धान्य निघाले. सर्वांना अचंबा वाटला. पंचांनी चाळीस मण ज्वारी मालकाला मोजून दिल्यावर उरलेले धान्य तुकाराम महाराजांना देऊ केले, पण त्यांनी ते घेतले नाही. माणसाने आपल्या कर्माच्या फळावर आपला अधिकार ठेवणे चुकीचे आहे, असे तुकोबारायांनी पंचमंडळींना उत्तर दिले.

तुकोबारायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून फक्त चिमण्यांना खाण्यासाठी म्हणून शेत राखून ठेवणारे आपल्याकडे काही शेतकरी आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठीच्या जैव साखळीतील चिमण्या हा खूप महत्त्वाचा घटक आहे, हे आता संशोधनाने सिद्ध झाले आहे. त्यामुळे ‘चिमण्या वाचवा’ अशी मोहीम सुरू झाली आहे. त्यासाठी २० मार्च हा जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला आहे. हा दिवस आज संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाच्या दिवशी यावा, हा योगायोग आपल्याला निसर्ग संवर्धनाचा, सृष्टीवर, प्राणीमात्रांवर प्रेम करण्याचा संदेश देणारा आहे. ।।ज्ञानबातुकाराम।। 🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *