तीन दिवस अगोदरच
पोहोचणार पंढरपुरात
मुक्ताईनगर : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी सर्वाधिक दूरचा प्रवास करणाऱ्या, मानाच्या संत मुक्ताईंच्या पालखीने आज (दि. ३) येथून टाळ, मृदंगाच्या गजरात आणि ‘मुक्ताबाई मुक्ताबाई’च्या जयघोषात पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवले.
टाळ, मृदंगाच्या गजराने वातावरण दुमदुमले
पहाटेपासूनच सुरू झालेल्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी तयारी सुरू झाली होती. यावेळी दर्शनासाठी आणि सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने वारकऱ्यांनी संत मुक्ताईंच्या समाधीस्थळी हजेरी लावली. यावेळी टाळ मृदंगाच्या गजराने वातावरण दुमदुमून गेले. दोन वर्ष कोरोनामुळे पालखी सोहळ्यावर काही निर्बंध घालण्यात आले. मात्र तरीही मर्यादित वारकऱ्यांमध्ये ही पालखी पंढरपूरकडे रवाना झाली होती. या पालखी सोहळ्याच्या परंपरेला सुमारे ३१३ वर्षे पूर्ण होत आहेत. पालखी सोहळ्याच्या पूजनासाठी खासदार रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, मंदिर संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि वारकरी उपस्थित होते. टाळ मृदुंग आणि मुक्ताईच्या जयघोषात मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावाने पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
तीन दिवस अगोदरच पालखी पंढरपुरात
यंदा तिथीत वाढ असल्याने तीन दिवस अगोदर आषाढ शुद्ध षष्ठीस पालखी सोहळा पंढरपुरात पोहोचेल. त्यामुळे वारकऱ्यांना गर्दी आधीच पांडुरंगाचे दर्शन घेता येईल. आठ दिवस मुक्ताई पालखी सोहळ्याचा मुक्काम पंढरपुरात असेल. यादरम्यान विविध कार्यक्रम होतील. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरमध्ये दाखल होणाऱ्या संतांच्या मानाच्या पालख्यांमध्ये संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे विशेष महत्त्व आहे. कारण, पंढरपूरमध्ये सर्वाधिक लांब अंतरावरून येणारा ही एकमेव पालखी आहे. या पालखी सोहळ्यात सहभागी होणारे वारकरी तब्बल ३३ दिवस ७०० किलोमीटरचा पायी प्रवास करतात. त्यामुळे इतर पालखी सोहळ्यांपेक्षा ही पालखी लवकर पंढरपूरकडे मार्गस्थ होते. ५ जुलैला विसावा पादुकांजवळ संतश्रेष्ठ नामदेव महाराज पालखी मुक्ताईंना सामोरी येईल.
यंदा वारकऱ्यांची संख्या वाढणार
कोरोनाच्या सलग दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा आषाढी पायी वारी होत आहे. विशेष म्हणजे यंदा संत मुक्ताईंचे समाधी सप्त शतकोत्तर वर्ष आहे. त्यामुळे वारीत भाविकांची संख्या वाढेल, असा कयास आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.