श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या

अश्वांची आळंदीकडे वाटचाल

अंकली : गेले दोन वर्षे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सहवासात पंढरपूरच्या आषाढी पायी वारी सोहळ्याला जाऊ न शकलेले माऊलींचे अश्व ‘हिरा’ आणि ‘मोती’ यंदाच्या सोहळ्यासाठी आळंदीच्या वाटेला लागले आहेत. कर्नाटकातील चिकोडी तालुक्यातील अंकलीहून १० जून रोजी निघालेले हे अश्व आज (दि. १३) सातारा जिल्ह्यातील वहागाव येथे मुक्कामी असतील. १८ जून रोजी हे अश्व पुण्यात पोहोचणार आहेत.

१८९ वर्षांची परंपरा

गेल्या १८९ वर्षाच्या परंपरेनुसार कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अंकलीतील शितोळेसरकारांकडे आळंदीच्या माऊलींच्या पालखीच्या अश्वांचा मान आहे. पालखीपूर्वी १२ दिवस आधी ज्येष्ठ शुद्ध एकादशीला म्हणजेच १० जूनला दोन्ही अश्वांचे सकाळी ९ वाजता प्रस्थान झाले. यावेळी अंकली संस्थानचे प्रमुख ऊर्जितसिंहराजे शितोळे सरकार आणि महादजीराजे शितोळे सरकार यांच्यासह हजारो भाविक उपस्थितीत होते. मिरज, पेठ नाका सातारामार्गे हे अश्व शनिवारी (दि. १८ जून) सायंकाळी पुण्यात मुक्कामासाठी येतील. एक दिवस त्यांचा मुक्काम पुण्यातील रास्ते वाड्यात राहील आणि पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अश्व सोमवारी (दि. २०) आळंदीकडे प्रस्थान ठेवणार आहेत.

जरीपटक्याचा मान
अश्वांच्या प्रस्थानाच्या वेळी अंकलीतील विठ्ठल मंदिरात परंपरेनुसार दिंडी निघाली. तिथे काकडा, पूजा, अभिषेक झाल्यावर दिंडी राजवाड्याकडे आली. राजवाडा प्रदक्षिणा झाल्यावर येथील कुलदैवत अंबाबाईच्या मंदिरात कळसाची, स्वाराच्या जरीपटक्याची आणि महानैवेद्याचे साहित्य असलेल्या ट्रॅक्टरची पूजा करून महानैवेद्य दाखवण्यात आला. माउलींच्या घोडेस्वाराकडे यानंतर परंपरेनुसार जरीपटका सपूर्द करण्यात आला आणि अश्वांची दिंडीसह ग्रामप्रदक्षिणा झाल्यावर गावाच्या वेशीवरून त्यांना उत्साहात आणि हरिनामाच्या गजरात निरोप देण्यात आला

११ दिवसांचा पायी प्रवास
अंकली ते आळंदी हा सुमारे ३१५ किलोमीटरचा प्रवास अश्वांसह स्वार आणि त्यांचे पथक यांचा पायी असतो. रोज साधारण ३० किलोमीटरचा प्रवासाचा टप्पा पूर्ण केला जातो. सायंकाळी नियोजित ठिकाणी मुकाम केला असतो.

महानैवेद्याचा मान शितोळे सरकारांकडे
वारी काळात दुपारच्या मुक्कामाच्या ठिकाणी माऊलींना आरतीनंतर पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवला जातो. हा मान परंपरेनुसार शितोळे सरकारांकडे असून, या महानैवेद्याच्या साहित्याचा ट्रॅक्टरही अंकलीहून निघाला आहे.

जरीपटका आणि गादी
स्वाराचा जरीपटका आणि माउलींच्या अश्वाची गादी या दोन्ही गोष्टी स्वारांबरोबर असतात. आळंदीला आल्यावर अश्वांसह यांची पूजा केली जाते आणि गादी अश्वावर चढवली जाते आणि मानाचा जरीपटका स्वाराकडे परिधानासाठी दिला जातो.

स्वाराचे कौशल्य
पालखी सोबत असलेल्या दोन अश्वांपैकी एक स्वाराचा आणि दुसरा माऊलींचा असतो. स्वारांच्या अश्वावरील तुकाराम कोळी वयाच्या १५ व्या वर्षांपासून वारीला जात आहेत. सलग २४ वर्षे त्यांना हा मान मिळत आहे. तीन उभ्या आणि चार गोल रिंगणात त्यांचे कौशल्य दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *