राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी
देहूत घेतले तुकोबारायांचे दर्शन
देहू : जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे माझ्यासारख्या अल्पमती माणसापासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांना प्रेरणादायी आहेत. महाराजांचे अभंग युगानुयुगे गाजत राहतील, जगाला प्रेरणा देत राहतील. तुकोबारायांचे दर्शन घेऊन मी धन्य झालो, अशी भावना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज (दि. २४ ऑगस्ट) येथे व्यक्त केली.
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी राजगुरूनगर (जि. पुणे) येथे जात असताना राज्यपाल कोश्यारी यांनी श्री क्षेत्र देहू येथे सकाळी सव्वा नऊ वाजता भेट दिली. यावेळी देहूच्या नगराध्यक्ष स्मिता चव्हाण, उपनगराध्यक्ष रसिका काळोखे यांनी राज्यपालांचे स्वागत केले. पुणेरी पगडी देऊन देहूकरांच्या वतीने राज्यपालांचा सन्मान करण्यात आला.
त्यानंतर राज्यपाल कोश्यारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दाखल झाले. त्यावेळी मंदिर प्रदक्षिणा करणाऱ्या एका दिंडीसोबत चालत त्यांनी टाळ गळ्यात घालून वाजवत ‘तुकाराम तुकाराम’चा गजर केला. मंदिरात जाऊन त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. तसेच मंदिर आवारातील श्रीराम मंदिर आणि नव्याने उभारण्यात आलेल्या शिळा मंदिरात जाऊन वंदन केले. यावेळी देहू संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. नितीन महाराज मोरे यांनी राज्यपालांना या मंदिरांविषयी माहिती दिली. यावेळी तहसीलदार गीता गायकवाड आणि मंदिराचे सर्व विश्वस्त उपस्थित होते.
मंदिर संस्थानातर्फे राज्यपालांचा सन्मान करण्यात आला. त्यांना संत तुकाराम महाराजांचा गाथा, डॉ. रामकृष्ण लहवितकर यांनी लिहिलेला ‘जगद्गुरू भक्तयोगी श्री तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन ऐश्वर्ययोग’ हा इंग्रजी ग्रंथ भेट देण्यात आला.
‘जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे जीवन सर्वांना प्रेरणादायी आहे. त्यांचे अभंग अनेक युगांपर्यंत मानवजातीला मार्गदर्शन करतील, असा अभिप्राय राज्यपालांनी मंदिरातील अभिप्राय वहीत नोंदवला. यावेळी संस्थानाच्या कामाचे त्यांनी कौतुक केले.