वाखरी ते पंढरपूर रस्त्याला

गडकरींनी दिले १५० कोटी

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या अगोदरच्या दिवशी सर्व संतांच्या पालख्या एकत्र होऊन जिथून पंढरपुराकडे वाटचाल करतात, त्या वाखरीपासून पंढरपुरापर्यंतचा रस्ता आता प्रशस्त होणार आहे. या सुमारे साडेआठ किलोमीटरच्या रस्त्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी १५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. आमदार प्रशांत परिचारक यांनी याबाबत माहिती दिली आहे.

नियम सांगत प्रस्ताव झाला होता रद्द
आषाढी वारीच्या काळात महाराष्ट्रातून आलेल्या सर्व संतांच्या पालख्या आषाढी एकादशीच्या अगोदरच्या दिवशी वाखरी येथील तळावर विसावतात. तेथे पालखी सोहळ्यातील सर्वात मोठ्या रिंगणाचा सोहळा पार पडतो. त्यानंतर सर्व पालख्या पंढरपूरकडे निघतात. त्यावेळी या रस्त्यावर प्रचंड गर्दी होते. त्यामुळे हा रस्ता रुंद करणे गरजेचे होते. यासाठी राष्ट्रीय महामार्गाकडे प्रस्ताव देण्यात आला होता, पण त्यांच्याकडून शहरांतर्गत रस्ते करता येणार नाही, असे कारण देत हा प्रस्ताव रद्द झाला. मात्र गेल्या सहा महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पंढरपूर येथे आले होते. त्यावेळी त्यांना पुन्हा याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यांनी त्याबाबत आढावा घेतल्यावर त्यांनी ८.४ किलोमीटर लांबीच्या महामार्गाला मंजुरी दिली. तसेच त्यासाठीच्या १५० कोटी रुपयांच्य निधीलाही मंजुरी दिली.

चौपदरी, दुपदरी, उड्डाण पूल, भुयारी मार्ग
लोकवस्तीतून जाणारा हा रस्ता चौपदरी, दुपदरी, उड्डाण पूल, भुयारी मार्ग अशा विविध सोयींनी बनवला जाणार आहे. याबाबत मंगळवारी (दि. २३ ऑगस्ट) पत्रकार परिषदेत माहिती देताना आमदार परिचारक म्हणाले, वाखरी येथील बाह्यवळण रस्ता ते पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान साडेआठ किलोमीटरचा लांबीचा मार्ग आहे. हा मार्ग सिमेंट काँक्रिटचा करण्यात येत आहे. वाखरी बाह्यवळण रस्ता ते एमआयटी शाळा हा ८३० मीटरचा रस्ता दोन पदरी असेल. हा रस्ता १० मीटर्स रुंदीचा काँक्रिटचा तयार केला जाणार आहे. एमआयटी शाळा ते पंढरपूर अर्बन को ऑपरेटीव्ह बँकेपर्यंतचा सुमारे सव्वा सात किलोमीटरचा रस्ता चौपदरी होणार आहे. दोन्ही बाजूंनी मिळून चौदा मीटर सिमेंट काँक्रिटचा रस्ता होणार आहे. अर्बन बँक ते नगरपालिकेमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतचा सुमारे ५०० मीटर्सचा रस्ता दोन पदरी सिमेंट काँक्रिटचा असेल.

या मार्गावर वाखरी ओढ्यावर मोठा पूल, पांडुरंग कारखान्याच्या ऑफिसजवळ एक पूल, मलपे ओढा येथे दूध डेअरीपासून एक पूल प्रस्तावित आहे. रेल्वे मार्गावर ओव्हरब्रीज ४६२ मीटर लांबीचा असणार आहे. संपूर्ण मार्गाच्या दोन्ही बाजूनी पेव्हर ब्लॉक, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेज व्यवस्था, दुभाजकांवर पथदिवे असतील. इसबावी येथे स्थानिक नागरिकांच्या रहदारीसाठी या मार्गाखालून ४ मीटर रुंदीचा अंडरपास रस्ता मंजूर करण्यात आलेला आहे. पंढरपुरात वर्षाभर विविध वाऱ्यांसाठी लाखो भाविक येत असतात. रोजची भाविकांची संख्याही मोठी असते. अशा वेळी या गर्दीचे व्यवस्थापन करणे, वाहतूक सुरळीत ठेवणे, आपत्कालीन परिस्थिती हाताळणे यासाठी या रस्ता रुंदीकरणाचा मोठा उपयोग होईल, असे परिचारक यांनी म्हटले आहे.

शहरात मंजूर झालेेला एकमेव महामार्ग
वाखरी एमआयटीपासून पंढरपूर अर्बन बँकेपर्यंत सध्या हा रस्ता चौपदरी आहे. त्यामुळे या मार्गावर कुठेही भूसंपादन करावे लागणार नाही. अर्बन बँक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत सध्या असलेल्या रस्त्यानुसारच दोन पदरी काँक्रिट रस्ता तयार केला जाणार आहे. त्यासाठी भूसंपादन करण्याची गरज नाही. पुढील ५० वर्षांसाठी या प्रमुख रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण शहरी भागातील रस्ते करीत नसते. मात्र पंढरीचे महत्त्व आणि वारकऱ्यांच्या सोयीसाठी नगरपालिका हद्दीतील या मार्गास मंजुरी मिळाली आहे.

गडकरींनी केली तातडीने कार्यवाही
पालखी मार्गाच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त पंढरपूर येथे नितीन गडकरी आले असता या मार्गाच्या चौपदरीकरणाची घोषणा त्यांनी केली होती. त्याअनुषंगाने या रस्त्याचा १२० कोटींचा प्रस्ताव तयार करून राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाकडे दाखल केला होता. परंतू वाखरी ते पंढरपूर हा रस्ता पंढरपूर नगरपालिका आणि राज्य बांधकाम विभाग यांच्या अधिपत्याखाली आहे. त्यामुळे हा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग अ‍ॅथॉरटीने नामंजूर केला होता. त्यादरम्यान गडकरी सोलापूर येथे २४ एप्रिल २०२२ रोजी आले असता प्रशांत परिचारक यांनी त्यांची भेट घेऊन रस्त्याचा प्रश्न कानावर घातला. त्यानंतर गडकरी यांनी तातडीने कार्यवाही करून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला, असे परिचारक यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *