
सात मजली मंडपाच्या जागी;
अधिक सुविधा उभ्या करणार
पंढरपूर : श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी बांधलेला सात मजली दर्शन मंडप लवकरच पाडण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
१९८७ मध्ये मंडपाची उभारणी
हा मंडप पाडून दर्शनबारीसाठी अधिक सुविधाजनक व्यवस्था करावी, अशी शिफारस पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात करण्यात आली आहे. तिरुपती बालाजीच्या धर्तीवर दर्शन रांग उभारण्याबाबतही विचारविनिमय करण्यात येत आहे. वारीच्या काळात ऊन पावसापासून वारकऱ्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी १९८७ मध्ये हा दर्शन मंडप उभारण्यात आला. त्यासाठी विठ्ठल मंदिर समितीचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रभाकर देशमुख यांनी पुढाकार घेतला होता. गेल्या अनेक वर्षांपासून दर्शन रांगेसाठी याच दर्शन मंडपाचा वापर सुरू होता.
सुविधांअभावी मंडप बंद
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरालगत असलेल्या दर्शन मंडपातील अपुऱ्या सुविधांमुळे हा दर्शन मंडप मागील अनेक दिवसांपासून बंद ठेवण्यात आलेला आहे. या मंडपातील काही ठराविक भागाचा दर्शन रांगेसाठी वापर केला जात आहे. दरम्यान, आता नव्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात विठ्ठल मंदिराशेजारी असलेला दर्शन मंडप पाडून त्या ठिकाणी वाहनतळ आणि मंदिर समितीचे कार्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वारकऱ्यांच्या दर्शन रांगेसाठी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर काही योजना राबवता येतील का, याची पाहणी करण्यासाठी एक शिष्टमंडळ सध्या बालाजी देवस्थानमध्ये गेले आहे.
मंडपाच्या जागी होणार वाहनतळ
सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थितीमध्ये मंदिर समितीचे अध्यक्ष, वारकरी प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये दर्शन मंडपासह मंदिर परिसरातील इतर कामांबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी हा दर्शन मंडप पाडून त्या ठिकाणी वाहनतळ आणि मंदिर समितीचे कार्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांसदर्भात लवकरच एक बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये दर्शन मंडप पाडण्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तिरुपती, काशी, नांदेड, नाशिकचा अभ्यास
इतर तीर्थस्थळांवरील दर्शन व्यवस्था आणि गर्दी व्यवस्थापन कसे आहे हे पाहण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या नेतृत्वाखाली चार अधिकाऱ्यांचे पथक सध्या तिरुपती दौऱ्यावर आहे. या तिरुपती दौऱ्यानंतर अधिकाऱ्यांचे पथक नाशिक कुंभमेळा व्यवस्थापन आणि नांदेड गुरुद्वारा व्यवस्थापन याचाही अभ्यास दौरा करणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, दर्शन व्यवस्थापनासाठी ‘काशी पॅटर्न’ची जोरदार चर्चा होऊन त्यावर मुख्यमंत्र्यांचीही बैठक झाली होती.
काशी येथील गंगेच्या काठावर असणाऱ्या घाटांप्रमाणे चंद्रभागेवरील घाटांचा आराखडा बनवण्यात येणार आहे. याच पद्धतीने ‘काशी स्मार्ट सिटी’प्रमाणे पंढरपूरमध्येही आराखडा बनवण्याचे ठरत आहे. दरम्यान, पंढरपूरच्या विकासासाठी विठ्ठल मंदिर ते पालखी मार्गासाठी दोन हजार कोटींचा आराखडा बनवल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जाहीर केले आहे.
चैत्री, आषाढी, कार्तिकी, माघी अशा पंढरपुरात वर्षभरातून चार प्रमुख यात्रा भरतात. यात सर्वाधिक गर्दी आषाढी यात्रेला होते. सुमारे १५ लाख भाविक यावेळी पंढरपुरात दाखल होतात. त्यापैकी बहुतेक भाविक विठ्ठलाचे पददर्शन घेण्यासाठी १२ ते ४० तास रांगेत उभे राहतात. दोन दिवसांत दीडेक लाख भाविक पदस्पर्श दर्शन घेऊ शकतात. लाखो भाविक मुखदर्शन घेतात, तर उर्वरित भाविक कळस आणि चंद्रभागा दर्शनावर समाधान मानतात.