शरद पवार यांच्या हस्ते
पंढरपूर येथे कार्यक्रम
पंढरपूर : दलितांच्या मंदिर प्रवेशासाठी साने गुरुजींनी दिलेल्या ऐतिहासिक लढ्याच्या स्मृती जागविणाऱ्या स्मारकाचे आज (दि. ८ नोव्हेंबर) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते येथे उद्घाटन होणार आहे.
पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिर दलितांना खुले व्हावे यासाठी स्वातंत्र्यसेनानी साने गुरुजी यांनी १९४७मध्ये उपोषण करत जनआंदोलन उभारले. त्यांच्या या सत्याग्रहाला यंदा ७५ पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त समतेचा संदेश देण्यासाठी राष्ट्र सेवा दलाच्या वतीने सानेगुरुजींनी ज्या ठिकाणी उपोषण केले, त्या पंढपुरातील तनपुरे बाबा मठात स्मारक साकारण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण आज (दि. ८ नोव्हेंबर) माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. संत तनपुरे महाराज चारोधाम मंडप ट्रस्टचे अध्यक्ष बद्रीनाथ महाराज तनपुरे, पद्मश्री पोपटराव पवार आणि साने गुरुजी स्मारक समितीचे अध्यक्ष राजा अवसक यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
राष्ट्रसंत तनपुरे महाराज यांच्या ३७ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम होत आहे. वारकरी संप्रदायाने समतेचे तत्व सांगितले. परंतु पंढपुरात १९४७ सालापर्यंत दलितांना श्री विठ्ठल मंदिरात प्रवेश नव्हता. हे मंदिर दलितांना खुले व्हावे, यासाठी राज्यभर जनजागृती करून १ ते १० मे १९४७ या कालावधीत सानेगुरुजींनी पंढरपुरात प्राणांतिक उपोषण केले. या उपोषणासाठीही गुरुजींना पंढरपुरात जागा मिळत नव्हती. संत गाडगेबाबांचे अनुयायी आणि मूळचे अहमदनगर येथील दगडवाडीचे संत कुशाबा महाराज तनपुरे यांनी गुरुजींना उपोषणासाठी आपल्या मठात जागा दिली. त्यांनी समतेच्या या लढ्याला मोलाची साथ दिली.
या घटनेचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. वारकऱ्यांना देशातील विविधतेतील एकता अनुभवता यावी म्हणून राष्ट्रसंत कुशाबा महाराज यांनी चारोधाम पदयात्रा सुरू केल्या. तसेच गाडगेबाबांच्या प्रेरणेतून पंढरपुरात अन्नदान सुरू केले. या सर्व उपक्रमांचा, भारतीय स्वातंत्र्याचा आणि सानेगुरुजींच्या ऐतिहासिक लढ्याचा यंदा अमृत महोत्सव आहे.
आजतागायत पंढरपुरात या लढ्याचे अथवा सानेगुरुजींचे कसलेही स्मारक नव्हते. राष्ट्रसेवा दलाचे माजी राज्याध्यक्ष राजाभाऊ अवसक यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यातून सानेगुरुजीप्रेमींची स्मारक समिती तयार झाली. या समितीतर्फे हे स्मारक साकारण्यात आले आहे. सानेगुरुजींच्या या स्मारकाला तनपुरे मठानेच जागा दिली. त्यासाठी ह. भ. प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी पुढाकार घेतला.
या सर्व घटनांच्या निमित्ताने पंढपुरात दोन दिवस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ७ नोव्हेंबर रोजी राज्यभरातून वारकरी दिंड्या आणि राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते पंढपुरात दाखल झाले. या सर्व वारकरी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रार्थना दर्शन सोहळा पार पडला. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता शरद पवार यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार बबन शिंदे राहणार आहेत, अशी माहिती बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.