चांदीची नवी मुखप्रतिमा
मंदिर विश्वस्तांकडे सुपूर्द
आळंदी : आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवरील सुंदर, सुकुमार, तेजस्वी मुखवटा पाहिल्यावर ‘रूप पाहता लोचनी। सुख जाले हो साजणी।। अशी भावावस्था प्रत्येक भाविक, वारकऱ्याची होते. हे सुख-समाधान देणारे साजिरे रूप भाविकांना यंदा माऊलींच्या नव्या मुखवट्याच्या माध्यमातून नव्याने अनुभवण्यास मिळणार आहे.
यंदा कर्नाटकातील कलबुर्गी (गुलबर्गा) येथील कारागिरांकडून बनविण्यात आलेला सुंदर चांदीचा मुखवटा बुधवारी (दि. १६) माउलीचरणी अर्पण करण्यात आला. यावेळी मुखप्रतिमेवर सहस्र कुंभ जलाभिषेक करण्यात आला. यावेळी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त विकास ढगे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, ह. भ. प. चैतन्य महाराज कबीर आदी उपस्थित होते.
स्वतःला ज्ञानेशकन्या म्हणून आयुष्यभर माऊलींच्या सेवेत व्यतीत करणारे दृष्टीहीन संत गुलाबराव महाराज यांनी माऊलींच्या प्रतिमेचे वर्णन केले होते. हीच माउलींची प्रतिमा डोळ्यांसमोर ठेवत या नव्या मुखवट्याची निर्मिती करण्यात आली आहे.
कलबुर्गी येथील शिल्पशास्त्राचे वंशपरंपरागत काम करणारे शिल्पकार मानय्या यांनी ही सुंदर चांदीची मुखप्रतिमा साकारली आहे. योगीरुपातील माऊलींचे हे लोभस दर्शन भाविकांना सुखावणारे आहे.