
चला रे वैष्णवहो जाऊ पंढरीयेसी।
प्रेमामृत खुण मागों त्या विठ्ठलासी।।
चालिले गोपाळ दाविताती वाकुंलिया।
भरले प्रेमरसे मग ते वाताती टाळीया।।
दिंड्या गरुडटके मृदुंगाचे नाद।
गाताती विठ्ठलनाम करिताती आल्हाद।।
पावले पंढरी भीमा देखियेली दृष्टी।
वैष्णवांचा गजरू आनंदे हेलावली सृष्टी।।
गजरु गोपाळांचा श्रवणी पडियेला।
शंखचक्र करीं विठ्ठल सामोरा आला।।
कांसवदृष्टी न्याहाळीतु रंगी नाचतु पै उगला।
सोपान म्हणे आम्ही केला वाळुवंटी काला।।