संत साहित्यातून जीवनप्रेरणा
घेतलेले आचार्य प्र. के. अत्रे
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज. शिक्षक, लेखक, कवी, नाटककार, सिनेमाकार, पत्रकार, वक्ता, राजकारणी, संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार अशा विविधांगी भूमिका अत्र्यांनी जगल्या आणि गाजवल्या. त्यांच्या या सर्व भूमिकांवर किंबहुना संपूर्ण आयुष्यावरच संत साहित्याचा, विचारांचा मोठा प्रभाव होता. आज आचार्य अत्रे यांची जयंती. त्यानिमित्त त्यांचे संत साहित्यावरील हे विचार…
– डॉ. श्रीरंग गायकवाड
ज्या क्षेत्रात गेले त्या क्षेत्रातील रुढ वाटा मोडत अत्र्यांनी इतिहास घडवला. त्या अर्थाने अत्रे बंडखोरच होते. त्यांच्या बंडखोरीच्या नेमक्या प्रेरणा काय होत्या, हे शोधायला गेलं. तर पहिल्यांदा संत तुकोबारायांचं दर्शन होतं. अत्रे पूर्ण तुकोबामय होऊन गेले होते. तुकारामांची गाथा उशाला घेऊन झोपणाऱ्या अत्र्यांना खऱ्या अर्थाने तुकोबांच्या तत्वज्ञानाचा साक्षात्कार झाला होता. ‘महाराष्ट्राचा बंडखोर लोककवी’या शीर्षकाने त्यांनी एक लेख लिहिला होता. त्यात म्हणतात, ‘महाराष्ट्र ही बंडखोरांची भूमी आहे. या भूमीमध्ये गेल्या सातशे आठशे वर्षांत अनेक मोठमोठी बंडे झालेली आहेत. आणि अनेक महान बंडखोर निर्माण होऊन गेलेले आहेत.
महाराष्ट्राच्या पठारावरून सैरावैरा वाहणाऱ्या वाऱ्यामध्येच मुळी बंड आहे. महाराष्ट्राच्या डोंगरावरून आणि खडकाळ प्रदेशांमधून झराझरा आणि भराभरा वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्यातच मुळी बंड आहे. महाराष्ट्राच्या कोरड्या आणि काळ्याभोर जमिनीत रडतखडत पिकणाऱ्या बाजरी जोंधळ्यांच्या कणसांमधील प्रत्येक दाण्यादाण्यांत बंड भरलेले आहे. महाराष्ट्राचे हे बंडखोर वारे श्वासून, महाराष्ट्राचे हे बंडखोर पाणी प्राशून आणि महाराष्ट्राच्या बंडखोर भाकरी झणझणीत मिरच्यांच्या चटणीसोबत खाऊन महाराष्ट्राचा सारा पिंडच मुळी बंडाचा झाला आहे. महाराष्ट्राच्या रक्तात बंड आहे. ते कधी गोठत नाही. महाराष्ट्राच्या हाडांत बंड आहे. ते कधी मोडत नाही. महाराष्ट्राच्या डोक्यात बंड आहे. ते कधी वाकत नाही.
महाराष्ट्राच्या डोळ्यांत बंड आहे. ते कधी विझत नाही. महाराष्ट्राच्या छातीत बंड आहे. ते कधी हटत नाही. महाराष्ट्राच्या मनगटात बंड आहे. ते कधी पिचत नाही. बंड करणे हा मुळी महाराष्ट्राचा स्वभावच आहे. महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा कोणी दास्य लादण्याचा प्रयत्न करतो, महाराष्ट्राच्या हातापायांत गुलामगिरीच्या शृंखला अडकवण्याचा डाव मांडतो, तेव्हा तेव्हा ते दास्य झुगारून देण्यासाठी आणि त्या गुलामगिरीच्या शृंखला तोडण्यासाठी महाराष्ट्रात बंडखोर निर्माण होत असतात. आणि त्या बंडखोराच्या हाकेला सा-या महाराष्ट्राकडून साद मिळते.’
‘धर्ममार्तंडांनी आणि पंडितांनी धर्माची तत्त्वे आणि विद्या ब्राम्हणांच्या किल्ल्यांत आणि संस्कृताच्या कड्याकुलुपात बंदिस्त करून जनतेला वर्षानुवर्षे अज्ञानात आणि दास्यात ठेवले. त्याविरुद्ध ज्ञानेश्वरांनी गोदावरीच्या काठी बंडाचा झेंडा प्रथम उभारला आणि ते ज्ञानाचे आणि विद्येचे भांडार मराठी भाषेत वाहून घरोघर पोहोचते केले. परकीय मोगल सत्तेच्या महापुरात अवघे महाराष्ट्र भूमंडळ बुडून सर्व मराठी बुद्धी आणि कर्तबगारी नामशेष होण्याची पाळी आली तेव्हा त्या सत्तेविरुद्ध बंडाचा भगवा झेंडा तोरणागडावर उभारण्यासाठी हातात भवानी तलवार घेऊन आणि कृष्णा घोडीवर स्वार होऊन महाराष्ट्राचा पहिला बंडखोर छत्रपती अवतीर्ण झाला. वेदस्थापित धर्माचे देव्हारे माजवून, वर्णश्रेष्ठत्वाचे पोकळ नगारे वाजवून, टिळे टोपी घालणाऱ्या आणि साधुत्वाचा आव आणणाऱ्या दांभिकांनी जेव्हा महाराष्ट्रातील अडाणी बहुजनांना आत्मोद्धाराचे सारे मार्ग बंद करून टाकले, तेव्हा इंद्रायणीच्या काठी भंडाऱ्याच्या डोंगरावर एका देहूच्या वाण्याने बंडाची पताका उभारली आणि नुसत्या नामसंकीर्तनाच्या सामर्थ्यावर वैकुंठपेठ खाली ओढून आणण्याचा अभंगमंत्र महाराष्ट्राला दिला.’
ज्ञानेश्वर, तुकाराम आणि शिवछत्रपती यांनी केलेल्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय क्रांतीच्या बंडखोर परंपरा या क्षणापर्यंत महाराष्ट्राने चालू ठेवलेल्या आहेत आणि त्यांनी शिकवलेल्या बंडखोर मंत्रांचे पुनश्चरण महाराष्ट्र अद्यापही आपल्या मनामध्ये करीत बसलेला आहे. महाराष्ट्राच्या कलेत, वाड्मयात आणि जीवनात चोहिकडे बंडच बंड भरलेले आहे. लावण्या, पोवाडे हे कलेतले बंड आहे. डफ, कडे हे वाद्यातले बंड आहे. ओवी, अभंग हे काव्यातले बंड आहे. चटणी-भाकरी हे भोजनातले बंड आहे. महाराष्ट्रातल्या या बंडाला आशीर्वाद देण्यासाठी एका हातात तरवार घेऊन अन् दुसऱ्या हाताने भंडार उधळीत मल्हारी मार्तंड खंडोबा जेजुरीच्या डोंगरावर उभा आहे. तर महाराष्ट्राच्या या बंडाचे कौतुक करीत चंद्रभागेच्या वाळवंटात पुंडलिकाने फेकलेल्या वीटेवर कमरेवर हात ठेवून अठ्ठावीस युगे विठोबा माऊली उभी आहे.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले।
तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा।।
जगातील सर्व गरीबांना आणि दलितांना नवनीतासारख्या कोमल अंत:करणाने आणि समबुद्धीने जो आपल्या हृदयाशी धरतो, तोच खरा ईश्वराचा अवतार. हे पृथ्वीमोलाचे महान सत्य संसार सागराच्या तळाशी बुडी मारून तुकारामाने बाहेर काढले.’
‘जगामधल्या कोणत्या धर्मसंस्थापकाने, तत्वज्ञाने आणि पंडिताने याच्यापेक्षा अधिक महत्त्वाचे तत्त्व आजपर्यंत सांगितले आहे? तुकारामाचे हजारो अभंग ही समाजातील हजारो रंजल्या गांजल्यांना हृदयाशी धरून दिलेली सहानुभूतीची आलिंगणे होत आणि त्यांच्या दु:खित अंत:करणावर घातलेल्या समाधानाच्या शीतळ फुंकरा होत. केवढे शहाणपण, केवढी शांती आणि केवढा संतोष तुकारामाच्या एकेका शब्दांत आणि ओळीत भरलेला आहे. म्हणूनच तुकारामाचा एखादा रसाळ अभंग एखाद्या वारकऱ्याच्या, भाविकाच्या किंवा भिकाऱ्याच्या तोंडून गोड स्वरांत कानावर पडला म्हणजे प्रापंचिक माणूस आपले दु:ख क्षणभर विसरून आनंदाने डोलू लागतो. ’
‘अहो, आम्हा महाराष्ट्रातल्या माणसांचे केवढे हे भाग्य की, तीनशे वर्षांपूर्वी इंद्रायणीच्या काठी शूद्र कुळात जन्माला आलेला एक सत्पुरुष गेली तीनशे वर्षे सतत आपल्या हातांनी आमच्या डोळ्यांमधले अश्रू पुसत आहे आणि आपल्या अभंगवाणीने आम्हाला आशा देऊन, धीर देऊन, जागृती देऊन, आमचा उद्धार करीत आहे! या महाराष्ट्रातले लक्षावधी भोळेभाबडे, अडाणी आणि गरीब प्रापंचिक लोक गेली तीनशे वर्षे तुकारामाची भाषा बोलत आहेत आणि तुकारामाचे तत्त्वज्ञान सांगत आहेत. एवढ्या साध्या, सुबोध आणि रसाळ भाषेत संसाराचे सार इतके सोपे करून या जगात कुठे कोणी तरी सांगितले असेल काय हो? ’
महाराष्ट्रातल्या आजच्या बहुजन समाजाने ‘आम्ही तुकारामाचे वारस आहोत, आम्ही तुकारामाची मराठी भाषा बोलत आहोत आणि तुकारामाने आम्हाला विचार करायला शिकवले आहे’, असे मान वर करून अभिमानाने सांगायला हवे. डोहात बुडवलेले तुकारामाचे अभंग तेरा दिवस देखील इंद्रायणीला आपल्या उदरात ठेवता आले नाहीत. तीनशे वर्षे ती तुकारामाची गाथा आपल्या डोक्यावर घेऊन काळ वाट चालतो आहे. मानवतेचे हे अमर धन काळपुरुषाला आपल्या डोक्यावर घेऊन आणखी किती युगे मिरवावे लागणार आहे, ते कोण सांगू शकेल?’’
आपल्या बंडखोरीचा वारसा अत्रे असा ठसठशीतपणे पुढे ठेवतात. अत्र्यांवर तुकारामांचा मोठा प्रभाव होता. तुकारामबाबांची गाथा उशाला घेऊनच ते झोपत असत. लंडनला जातानाही त्यांनी तुकारामांची गाथा सोबत नेली होती. प्रत्येक तुकारामबीजेला अत्रे आवर्जून तुकारामांवर लेख लिहित. मराठी माणसांची अत्र्यांनी एक व्याख्या केली होती. ‘‘तुकोबाचा निदान एक अभंग ज्याला पाठ येतो, तो मराठी माणूस. ज्याच्या घरी नाही तुकोबाची गाथा, त्याच्या शिरी लाथा हाणा चार.’’
संयुक्त महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून अत्र्यांनी ‘मराठा’ नावाचा पेपर सुरू केला. श्री शिवछत्रपती, महात्मा फुले आणि लोकमान्य टिळक या महाराष्ट्राच्या तीन दैवतांचे फोटो त्यांनी ‘मराठा’च्या शिरोभागी टाकले होते. शब्दांचे शस्त्र करून लढायचे ही तुकारामांची शिकवण त्यांनी अंगी बाणवली होती. म्हणूनच तर ‘मराठा’च्या अग्रलेखाच्या डोक्यावर ‘भले तरी देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाचे काठी देऊ माथा’ ही ‘मराठा’ची भूमिका सांगणारी तुकोबांच्या अभंगाची ओळ झळकत असे.
संत तुकाराम आणि इतर संतांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता. संतांचे हे विचार समाजापर्यंत पुन्हा पोचवण्यासाठी त्यांनी ‘तुकाराम साप्ताहिक’ सुरू केले. या साप्ताहिकातून अत्रे संतांचे समाजप्रबोधनाचे विचार लिहित होते. ‘म्हण सारे मंगल आहे‘ या लेखात अत्रे तुकोबांसोबतच संत कबीर, गाडगेबाबा, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांचे ईश्वरविषयक विचार सांगतात.
‘शेकडो लोक आपापली कामेधामे सोडून कुठल्या कुठे लांब यात्रेला जातात अन् रोगराईने किंवा अपघाताने किड्यामुंग्यांसाखे मरून जातात. देव का डोळ्यांनी दिसण्याची वस्तू आहे?’ महात्मा फुले म्हणतात, ‘माध्यान्हीचा सूर्य डोळ्यांनी बघता येत नाही. मग अशा अनंत सूर्यांना आणि चंद्रांना निर्माण करणारा ईश्वर माणसाला कसा बघता येईल? मला ईश्वर भेटला, मला ईश्वर दिसला, असे जे म्हणतात, ते अज्ञ जनांचा बुद्धीभेद करतात’. गाडगेबाबा म्हणतात, ‘देवदर्शनाने आणि गंगास्नानाने पापे जातात असे जे सांगतात ते धर्माचा काळा बाजार करतात. जिवंत माणसांना पायाखाली तुडवायचे आणि दगडामातीच्या मूर्ती डोक्यावर घेऊन नाचायचे, ही धर्माची शुद्ध विटंबना होय’. डॉ. आंबेडकर म्हणाले, ‘ज्या राष्ट्राचा धर्म सडला आहे, त्याला भविष्यकाळ नाही. ‘जे जे भेटे भूत ते ते जाणिजे भगवंत’ या मंगल आणि पवित्र धर्माची ओळख या देशातील यच्चयावत लोकांना ज्या दिवशी होईल तो सुदिन!’
ज्ञानदेव आणि चांगदेव असो की गांधीजी आणि रामनाम. ‘तुकाराम’ साप्ताहिकातून अत्रे त्यांचे तत्वज्ञान सोप्या भाषेत उलगडून दाखवतात. ‘गांधीजींचा राम म्हणजे दशरथाचा पुत्र राम नव्हे. त्या रामाला ज्या रामाचे नाव देण्यात आले तो. सर्वांच्या अंतर्यामी असणारा आत्माराम. निर्गुण रामाचा पहिला उपासक कबीर होता. निर्गुण निराकाराच्या पलिकडचे जे परब्रम्ह, त्याला कबीर राम म्हणतो. ‘निर्गुण राम जय हुरे भाई’. गांधीजीही निर्गुण रामाचेच भक्त होते. रामनाम हे आत्मशोधन आहे, असे गांधीजी म्हणत.’ याच साप्ताहिकातील लेखांमध्ये अत्र्यांनी मूर्तीपूजा, संतांचे जातीभेद निर्मूलनाविषयी विचार सांगितले आहेत. ‘पवित्र ते कुळ, पावन तो देश’ या लेखात अत्रे तुकोबांनी वर्णन केलेली सर्व जातीधर्माच्या संतांची मांदियाळी सांगतात.
तुळाधाराची जात वैश्य होती. गोरा कुंभार होता. रोहिदास हा चांभार. कबीर मोमीन. लतिफ मुसलमान. सेना न्हावी. कान्होपात्रा वेश्या. दादु हा पिंजारी. चोखामेळा महार. पण यापैकी कोणाचीही जात ईश्वरप्राप्तीच्या आड येत नाही. जनी नामयाची बोलूनचालून दासी. पण देवाच्या दरबारात तिचा केवढा भाव? म्हणून सांगतो, ‘यातायाती धर्म नाही विष्णुदासा। निर्णय हा ऐसा वेदशास्त्री।। ‘हरिचे दास जातीचा धर्म मानीत नाहीत. केवळ वर्णभेदाच्याच नव्हे तर वर्ग नि अर्थभेदाच्या मर्यादाही तुकोबांनी झुगारून दिलेल्या आहेत.’
यातच अत्रे विनोबांचेही अध्यात्मिक तत्त्वज्ञान सांगतात. ‘देवा, माझी हरवलेली वस्तू मला मिळू दे, अशी प्रार्थना कशाला करावयाची? वस्तू मिळो वा ना मिळो, माझ्या चित्ताची शांति न ढळो, अशी प्रार्थना करावी.’ संतांवर टीका करणारे इतिहासाचार्य राजवाडे यांचाही या माध्यमातून अत्र्यांनी समाचार घेतला आहे. ‘ज्ञानेश्वर-तुकारामासारख्या संताळ्यांनी महाराष्ट्राचा नाश केला आणि त्याला तीन शतके पंगू करून टाकले. अन् समर्थ रामदासांनी महाराष्ट्रधर्माची दीक्षा देऊन महाराष्ट्राचे संरक्षण केले’, हे इतिहासाचार्य राजवाड्यांचे भ्रामक मत प्रा. न. र. फाटकांनी कसे खोडून काढले हे अत्रे ‘ज्ञानेश्वर काय नुसतेच कवी होते काय?’ या लेखात सांगतात.
अत्रे गाडगेबाबांच्या प्रेमात तर आकंठ बुडून गेले होते. बाबांच्या दैनंदिनीचे, कीर्तनाचे ते इत्थंभूत वर्णन करतात. बाबा त्यांच्या खंडाळ्याच्या बंगल्यावर येतात. बाबांसोबत अत्रे आळंदीला जातात. वाळवंटातलं त्यांचं कीर्तन ऐकतात. बाबांचा उपदेश अत्रे लोकांपर्यत पोहोचवतात. गाडगेबाबा कोणत्याही देवळात पाय ठेवीत नाहीत, किंवा मूर्तीचे दर्शन घेत नाहीत. पंढरपूरला कोणी तरी बाबांना म्हणाले, ‘बाबा, देवळात चला की!’ बाबांनी विचारले, ‘काय हाय रे देवळात?’ ‘वा! बाबा, देवळात विठोबा आहे ना!’ त्या माणसाने सांगितले. बाबा म्हणाले, ‘अन तिथे त्यो काय करतोय?’ ‘कमरेवर हात ठेवून उभा आहे ना तो!’ माणूस म्हणाला. तेव्हा तोंड वेडेवाकडे करून बाबा म्हणाले, ‘अरे, अरे, अरे, कमरेवर हात ठेवून का उभा हाय त्यो? त्याला म्हणावं हातात खराटा अन् पाटी घे अन् बाहेर ये. बाहेर तुझ्या भक्तांनी एवढी घान करूनशान ठेवली हाये, ती काढून टाक.’
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल अत्रे म्हणतात, ‘ईश्वराची भक्ती ही केवळ वैयक्तिक मोक्षप्राप्तीचे साधन नसून ती समाजसेवेचे आणि राष्ट्रोध्दाराचे उत्तम हत्यार होऊ शकते, हे तुकडोजी महाराजांनी आपल्या कृतीने दाखवून दिले. समाजात खोल रुजून बसलेल्या अनिष्ट रुढी आणि दुराग्रही प्रवृत्ती उखडून काढून समाजाला नवे आचार-विचार शिकवण्यासाठी तुकडोजीमहाराजांनी आपल्या खंजिरी भजनांचा अतिशय कल्पकतेने उपयोग करून घेतला.’
कऱ्हेचे पाणी या आपल्या आत्मचरित्रात भक्ती-शक्तीचे संस्कार झालेल्या आपल्या जन्मभूमीचा ते मोठ्या गौरवाने उल्लेख करतात. “शक्तीचे आणि भक्तीचे पावनतीर्थ होते माझे सासवड गाव. महाराष्ट्रातील संतांच्या नि वीरांच्या पदस्पर्शाने त्याच्या भूमीचा कण न् कण पुनीत झालेला आहे. ज्ञानदेवांची पालखी दरवर्षी सोपानदेवांचे दर्शन घेऊनच पुढे पंढरीला जाते. त्यावेळी आमच्या गावात दिंड्यापताकांची अशी गर्दी उडते आणि टाळमृदुगाच्या गजराने सारे शिवार असे दुमदुमते म्हणता! बालपणात झालेल्या या सर्व संस्कारांनी माझा पिंड घडविलेला आहे.
वाचकांना तुकाराम महाराजांची शिकवण सांगताना ते लिहितात, ‘एखादी वस्तू अग्नीत टाकली म्हणजे ती जशी अग्निरूप होते, परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचा जसा दागिना होतो. नद्या नि ओढे गंगेला मिळाले म्हणजे जशी त्यांची गंगा होते, चंदनाच्या स्पर्शाने नि वासाने इतर वृक्ष ज्याप्रमाणे चंदन होतात त्याप्रमाणे संतांच्या संगतीने समाजात चांगुलपणाचा महापूर येतो. पापातापाची ‘तुटी’ होते आणि सर्व दैन्य ‘उठाउठी’ निघून जाते…
तुकाराम महाराजांनी सामाजिक समतेचा पाया कसा घातला आहे. याविषयी ते म्हणतात, पवित्र ते कुळ पावन तो देश। जेथे हरिचे दास जन्म घेती ।। या अभंगात जातीधर्माविरूद्ध तुकोबांनी कडक आवाज काढला आहे. आजच्या काळात हा विचार महामोलाचा आहे. वर्णद्वेषाच्या विषाने भारतातील सर्व जीवन शतकानुशतके दूषित करून टाकलेले आहे. तुकोबांच्या काळात वर्णाभिमानाची तीव्रता काही कमी नव्हती. त्याची झळ त्यांनाही पुष्कळच सोसावी लागली. म्हणूनच त्यांना गर्जून सांगावे लागले की, पावित्र्य हे कुळावर किंवा देशावर अवलंबून नसते. ज्या कुळात किंवा ज्या देशात हरीचे दास जन्माला येतात, ते कुळ पवित्र तो देश क्षेत्राप्रमाणे पावन !
वर्णद्वेष, जातिभेद याविषयीचे तुकोबांचे अभंग याच लेखात अत्रे उलगडून सांगतात. ‘वर्ण अभिमाने कोण झाले पावन’, ‘अंत्यजादी योनी तरल्या हरिभजनी’, ‘उत्तम चांडाळ नरनारी बाळ’, ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ’, ‘दया करणे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी’ आदी अभंगांतून तुकोबांचे अस्पृश्यता निवारणाविषयीचे विचार सांगून अत्रे म्हणतात, ‘केवळ वर्णभेदाच्याच नव्हे तर वर्गभेदाच्या नि अर्थभेदाच्या मर्यादाही तुकोबांनी झुगारून दिलेल्या आहेत. सर्व विश्व ईश्वर आहे. ‘विश्व देव सत्यत्वे’ असा तुकोबांचा अनुभव होता, म्हणून कोणताही भेदभाव न बाळगता सर्वांच्या उद्धाराचा मार्ग त्यांनी सारख्याच तळमळीने दाखवून ठेवलेला आहे.
सामाजिक समतेचा आग्रह धरणाऱ्या तुकोबांना पर्यावरणाच्या, निसर्गाच्या सान्निध्यात आत्मपरीक्षणही कसे करता आले याचेही विवेचन अत्रे करतात. त्यासाठी ते ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’, ‘आपुला विचार करीन जीवासी’, ‘कासया गुणदोष पाहो आणिकांचे’, ‘चंदनाच्या वासे धरतील नाक’, ‘पिकलिया सेंद कडुपण गेले’ आदी अभंगांचे आपल्या ‘तुकाराम’ साप्ताहिकातील २९ मे ५४ रोजी लिहिलेल्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या लेखातून रसाळ विवेचन करतात.
तुकोबांसोबतच महाराष्ट्रातील इतर संतांविषयी अत्रे भरभरून लिहितात. आपल्या लेखणीच्याद्वारे त्यांचे चरित्र आणि विचार सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवितात. संत नामदेव’ या लेखात नामदेवांचे चरित्र आणि त्यांनी लिहिलेल्या अभंगांची ओळख ते करून देतात. नामदेवांवर लिहिलेल्या इतर पुस्तकांमधील संदर्भही ते आवर्जून देतात आणि नामदेवांची थोरवी वर्णन करताना शेवटी म्हणतात, ‘नामदेवांची सतवाणी भावमाधुयनि आचवलेली आहे. प्रेमळपणाने फुललेली आहे. प्रासादिक रसिकतेने मोहोरलेली आहे आणि वात्सल्य व कारूण्य यांनी बहरलेली आहे.
या संतांबरोबरच अत्रे गाडगेबाबा, विनोबा या समकालीन संतांच्या कार्याचीही ओळख तेवढ्याच रसाळपणे वाचकांना करून देतात. गाडगेबाबांचे विचार, त्यांचे सामाजिक कार्य, त्यांचा लोकविलक्षण स्वभाव, याचे अत्यंत वस्तुनिष्ठ वर्णन अत्रे करतात. अंगावर चिंध्या आणि डोक्यावर खापर घालून या अद्भुत माणसाने पन्नास वर्षांत लाख जमविले पण सुतळीच्या तोड्याला कधी हात लावला नाही असे गाडगेबाबाचे वर्णन करून अत्रे म्हणतात, “भागवतधर्माचा पाया ज्ञानोबांनी घातला. तुकोबा त्याचे कळस झाले. आमचे गाडगेबाबा त्या कळसावरची पताका आहेत. लोकोद्धाराचा जो मार्ग ज्ञानोबा आणि तुकारामांनी सांगितला, त्याच मार्गाने आज विनोबा आणि गाडगेबाबा जनतेला नेत आहेत.” संत विनोबांबद्दलही अत्र्यांच्या मनात खूप आदर आहे. त्यांच्या भूदान चळवळीचा गौरव करताना ते म्हणतात, ‘विनोबाएवढा मोठा जमीनदार आज जगात कोणी नसेल’. ‘गेली ४० ते ५० वर्षे उम्र वैराग्याच्या आणि प्रखर साधनेच्या ऐरणीवर स्वतःच्या बुद्धीचा आणि देहाचा कण न् कण बडवीत अन् घडवीत हा महापुरूष एकसारखा बसलेला आहे.” असे विनोबांचे माहात्म्य सांगताना ‘विनोबा हे वैदिक आणि भारतीय संस्कृतीचे उद्गाते आहेत’ असा गौरवही करतात. दिशभर संचार करणारे विनोबा हे एक चालतेबोलते आचार्यकुल किंवा जंगम विद्यापीठ आहे’ असे अत्रे कौतुकाने म्हणतात.
संतांवरील लिखाणात अत्रे महात्मा गांधींचाही समावेश करतात. गांधीजींनी रामनामाचा अंगीकार केल्यानेच त्यांना स्वातंत्र्यलढ्यासाठीचे आत्मबळ मिळाले असेही मत ‘तुकाराम’मधील ‘गांधी आणि रामनाम’ या लेखात ते व्यक्त करतात. त्यात ते म्हणतात, ‘रामनाम हा हिंदु समाजाला प्राप्त झालेला एक महान मंत्र आहे. रामनामावर त्याचे जेवढे प्रेम आहे, तेवढे दुसऱ्या कशावरही नाही. रामनामाची महती सर्वच संतांनी गायली आहे. पण रामनाम आचरणात आणण्याचा गांधींसारखा प्रयत्न कोणीच केला नसेल. आधुनिक काळातील रामनामाचे महान पुरस्कर्ते असाच गांधीजींचा उल्लेख करावा लागेल.’ संत आणि त्यांच्या साहित्यावर लिहिणाऱ्या आचार्य अत्र्यांनी विविध धार्मिक सण, समारंभ, प्रसंगांनिमित्त वृत्तपत्रातून लिहिले. आषाढी एकादशीनिमित्त ते भक्त पुंडलिकावर लिहून त्याने बहुजन समाजाला दिलेला संदेश अग्रलेखातून विशद करतात. तसेच एकादशीच्या निमित्ताने वारकरी संप्रदायाचे आचार-विचार आणि तत्त्वज्ञान सुबोध भाषेत मांडतात. कार्तिकीच्या निमित्ताने लिहिताना ते सामाजिक, राजकीय परिस्थितीचे विश्लेषण मांडत राहतात.
गोकुळ अष्टमीच्या दिवशी मराठा’तून लिहिलेल्या ‘श्रीकृष्ण जन्म’ या लेखात श्रीकृष्ण जन्माची पौराणिक कथा सांगत सांगत श्रीकृष्णाचे जगणे सर्व सामान्यांच्या जगण्याशी कसे साधर्म्य ठेवून होते हे सांगतात. ‘श्री तुळजा भवानी’, ‘समर्थाचा नवा अवतार’, ‘महावीर आणि मांसाहार’ आदी सामाजिक संदर्भ असणारे अग्रलेख त्यांनी मराठातून लिहिले. याबरोबरच हिंदू धर्माचा अभिमान बाळगणारे अत्रे धर्मप्रसाराच्या आडून राजकारण करणाऱ्यांविरोधात हिंदू धर्मीयांना नादाला लावणाऱ्यांच्या विरोधात लेखणी परजतात. या भूमिकेतूनच अने ‘फेरूबाबाचा दंभस्फोट’, ‘फॅसिस्ट फादर फेरर’, ‘पाद्रीशाही नष्ट करा’ आदी लेख लिहितात.
‘ज्ञानेश्वरांनी ऐन उमेदीत बुद्धी निकोप असताना आत्महत्या केली असावी’ असे मत वि. द. घाटे यांनी मांडले. त्यावर हल्ला करताना अत्रे म्हणतात, “अशी राक्षसी विटंबना करणारा नराधम गेल्या सहाशे वर्षांत महाराष्ट्रात काही निपजला नसेल. साधुसंतांबद्दल असली बेजबाबदारपणाची भाषा केवळ अडाणी आणि मतलबी लोकच करतात असे नव्हे तर चांगले सुशिक्षित आणि विद्वान साहित्यिकसुद्धा त्याबाबत शेण खायला कमी करीत नाहीत. असे असले तरी समाजाच्या कल्याणासाठी त्यांच्यापर्यंत संतसाहित्य निकोप आणि सात्विकपणे पोहोचावे हीच पत्रकार अत्र्यांची इच्छा आहे. अत्र्यांच्या या लिखाणाबाबत ल. रा. नासिराबादकर म्हणतात, “ज्ञानोबा, तुकोबा, विनोबा आणि गाडगेबाबा यांच्या वाङ्मयातून आणी वाणीतून स्रवणाऱ्या तत्त्वज्ञानाच्या प्रवाहांचे सुंदर छोटे पाट काढून अत्र्यांनी ते बहुजन समाजापर्यंत पोहोचविले आहेत आणि त्यांच्या मनोभूमीत भक्तिरसाचे मळे फुलविले आहेत. समाजमन संस्कारित करण्यासाठी अक्षर अशा संतवाङ्मयाचे आलोकन करणाऱ्या पत्रकार अत्र्यांचे एक नवेच रूप येथे पाहावयास मिळते.
महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी अत्र्यांच्या संत साहित्याच्या व्यासंगाचे मोठे हृद्य वर्णन केले आहे. ते लिहितात, ‘अनेकांनी मराठी भाषा लिहिली, अनेक लिहितील; परंतु तरीही अत्र्यांचे स्वतंत्र सिंहासन कुणी हिरावून घेऊ शकणार नाही. गंगेचा अखंड आणि स्वच्छ प्रवाह ज्याप्रमाणे कधी स्थिर किंवा कधी खळखळत जातो आणि अनेक मुखांनी सागराला जाऊन मिळतो, तसा अत्र्यांच्या कऱ्हेच्या पाण्याचा प्रभाव आहे. परमेश्वर गुणी आहे ही अपार श्रद्धा कऱ्हेपठारात दुमदुमणाऱ्या संतवाणीच्या घोषातून अत्र्यांच्या नसानसात भिनली नि हेच त्यांच्या अंतरंगातील अपार बळ होय. या संतवाणीच्या प्रसादामुळे अंतःकरणाची शुद्धी त्यांच्या ठायी स्थिर झाली. मन उदार आणि उदात्त राहिले. क्षुद्रता, कटुता असल्या गोष्टी त्यांच्या अंतरंगात प्रवेश करू शकल्या नाहीत. ते थोर आणि उदारच राहिले.
‘अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याचे गळा माळ असो-नसो’ हे तुकोबांचे वचन आपल्या हृदयावर अत्रे यांनी कोरून ठेवलेले होते. मनामध्ये क्वचित ‘आजि शिवला क्रोध, मग माझे विटाळले अंग’ हे त्या काळच्या भाषेत, तुकारामांनी वर्णन केले आहे, त्याप्रमाणे जरी कधी क्वचित आविष्कार अत्र्यांकडून झालेले दिसले, तरी त्यांच्या अंतःकरणाच्या रत्नमंजुषेत या असल्या गोष्टींना बिलकूल थारा नसे. अशा संतवाणीचे अमृतप्राशन केलेला अत्र्यांसारखा अन्य कोणी क्वचितच भेटेल. त्यांच्या अंतरंगात शिरून त्यांची मूळ प्रवृत्ती किती मनोहर, किती प्रेममय, किती विशुद्ध, किती उज्ज्वल होती, याचा ठाव घेण्याचा जो कोणी यत्न करील त्याला त्या पुण्यात्म्याला वंदनच करावे लागेल!’ अशा या महाराष्ट्राच्या महामानवाला अर्थात आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना त्यांच्या १२४व्या जयंतीनिमित्त ‘ज्ञानबातुकाराम’ परिवाराचे त्रिवार वंदन.
सुंदर लेख
अतिशय सुंदर विवेचन.