पंढरपूरच्या श्री विठ्ठलच्या
अन्नछत्रात राबणाऱ्या अन्नपूर्णा
दूर दूर अंतरावरून आलेल्या भाविकांना दर्शन देण्यासाठी कमरेवर हात ठेवून उभा राहिलेला विठोबा आणि दर्शनानंतर शिणले भागलेले ‘पोटोबा’ शांत करणारे अन्नपूर्णा देवींचे हात… असं दृश्य सध्या पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिरात दिसत आहे.
https://www.facebook.com/dnyanbatukaram/videos/357039766148450
कोरोनामुळे गेले दोन वर्षे बंद पडलेले अन्नछत्र सुरू झाल्याने या अन्नछत्रात काम करणाऱ्या महिलांना पुन्हा सेवेचे समाधान मिळू लागले आहे. आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त ।।ज्ञानबातुकाराम।। टीमने या महिलांचे सेवाभावी हात कॅमेऱ्यात टिपले.
लाखो करोडो भाविकांना महाप्रसादाचा लाभ देणाऱ्या या अन्नछत्रालयाची सुरुवात १९९८ मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने केली. तेव्हापासून इथे दररोज हजारोच्या संख्येने भाविक प्रसादाचा लाभ घेऊ लागले. कोरोनाकाळात त्यावर बंधनं आली. मात्र या काळात अन्नछत्रालय जरी भाविकांसाठी बंद असलं तरी त्यांच्यासाठी पाकीटबंद अन्नवाटपाची सेवा सुरूच होती.
लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर १९ फेब्रुवारी पासून अन्नछत्रालय पुन्हा एकदा भाविकांच्या सेवेसाठी खुलं झालं आहे. इथे सेवेसाठी एकूण २८ कामगार आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक महिला सेवेकरी आहेत. अन्नछत्रालय पुन्हा खुले झाल्याने या महिलांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.
दुपारी १२ ते २ या काळात इथे प्रसादाची सेवा सुरू असते. आठवडाभर भाविकांना अखंड सेवा देणाऱ्या या अन्नछत्रालयात शनिवार आणि रविवारी भाविकांची गर्दी अधिक असते. या अन्नछत्रात दररोज सुमारे दीड हजार भाविक प्रसादाचा लाभ घेतात.
मंदिरे समिती या अन्नछत्रासाठी देणग्याही स्वीकारत आहे. या अंतर्गतच्या ‘वाढदिवस’ योजनेत २५ हजारांपासून पुढे रक्कम स्वीकारली जात आहे. यात देणगीदारांना इच्छित दिवशी अन्नदान करता येत आहे. इच्छुक धान्य तसेच किराणा माल देणगीही जमा करू शकतात, असे मंदिरे समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
व्हिडिओ : स्वाती गोडसे, पंढरपूर