विदर्भाच्या संत परंपरेतील

अग्रमान असलेले सत्पुरुष

विदर्भातील संतांच्या परंपरेत अग्रभागी असलेले श्री नगाजी महाराज यांची आज पुण्यतिथी. आताच्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्‍यात पार्डी येथे त्यांचे भव्य समाधी मंदिर आहे. फक्‍त पार्डीच नव्हे; तर विदर्भातील चंद्रपूर, अमरावती आदी जिल्ह्यांत त्यांचा शिष्य वर्ग पसरलेला आहे. महाराजांची पालखीदेखील या जिल्ह्यांतून निघते. प्रामुख्याने नाभिक समाजबांधव महाराजांची जयंती आणि पुण्यतिथी उत्सव मोठ्या भक्‍तिभावाने साजरा करतात.

भव्य समाधी मंदिर

पोथरा आणि वणा नद्यांच्या काठावर नगाजी महाराज यांच्या समाधीचे क्षेत्र आहे. या मंदिराची फार मोठी अख्यायिका आहे. श्री संत नगाजी महाराज यांचा जन्म कार्तिक शुद्ध ५ शके १६७६ ला झाला. त्यांनी अश्विन वद्य २ शके १७६६ ला पारडी येथे समाधी घेतली. सुमारे ९० वर्षांच्या अवतारकाळात महाराजांनी हजारो जणांना परमार्थाकडे वळवले. महाराज स्वतः उत्कृष्ट चित्रकार, मूर्तीकार, शिल्पकार होते, अशी माहिती भाविक सांगतात. समाधी मंदिर परिसर नदीकाठावर वसलेला आहे. त्यामुळे नैसर्गिक वातावरण आणि प्रसन्नता आपोआप निर्माण होते. सोबत भक्‍तिभाव असल्याने येथे येणारा भाविक आत्मिक शांतीने तृप्त होतो.

महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव

श्री संत नगाजी महाराज सामाजिक सेवा समिती, चिमूर यांच्यावतीने मागील दोन दशकांपासून महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा केला जातो. तत्पूर्वी श्री संत नगाजी महाराज यांचे पटशिष्य श्री संत आबाजी महाराज यांनी पालखीची १५० वर्षांपूर्वी सुरू केली. ती आजही अखंडपणे सुरू आहे. पालखी दरवर्षी कार्तिक कृष्ण ६ ला पार्डीवरून प्रस्थान ठेवते. वाटेत टेंभा,अल्लिपूर टाकळी (चनाजी)ला मुक्काम करून कार्तिक कृष्ण एकादशीला सोनेगाव (आबाजी)च्या भेटीला श्री संत आबाजी महाराज समाधी मंदिरात जंगी स्वागतात आगमन करते. दहीहांडी व गोपाळ काल्यानंतर ४ दिवसांच्या वास्तव्यानंतर पालखी पुढे मार्गक्रमण करते.

यंदाचा पुण्यतिथी उत्सव

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्‍यात येणाऱ्या पारडी येथे येत्या १३ ऑक्‍टोबर रोजी संत नगाजी महाराज यांची पुण्यतिथी परंपरेनुसार तृतीयेला साजरी करण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना निर्बंधांमुळे पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करता आले नाही. मात्र, यावर्षी परंपरेनुसार भजन, कीर्तन करत आयोजन करण्यात येणार आहे. पारडी येथे सुमारे २१० वर्षांपासून पुण्यतिथी उत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो.

पुण्यतिथीनिमित्त महाप्रसाद

हजारो भाविक या ठिकाणी पुण्यतिथी उत्सवाला दरवर्षी येतात. विशेष म्हणजे महाप्रसाद कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केला जातो. महाप्रसादात परंपरेनुसार भाजी पोळी, वरण, डाळभाजी भात, कढी, भजे आणि तांदळाची खीर असे पदार्थz असतात. पुण्यतिथी उत्सव तृतीयेला साजरा केला जातो तेव्हा मोठा उत्साहात भजन कीर्तन आणि गोपाळकाल्याचे देखील आयोजन केले जाते.

गावोगावी पुण्यतिथी
संत नगाजी महाराज यांची पुण्यतिथी फक्‍त पार्डी येथेच नव्हे, तर वर्धा जिल्ह्यातील गावोगावी साजरी केली जाते. अनेक समाज बांधव या सोहळ्यात सहभागी होत असतात. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात आणि गावागावांत संत नगाजी महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात येते प्रथेप्रमाणे पालखी मिरवणूक आणि महाप्रसादाचे आयोजनही केले जाते.
जुन्या काळातही परंपरा आणि रुढीवाद्यांचा विरोध झुगारून श्री नगाजी महाराजांनी हजारो सामान्य भाविकांना देवधर्मापर्यंत आणले. त्यांना ईश्‍वरसाधनेचे महत्त्व पटवले. अशा या थोर विभूतीस ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *