संत आणि थोर व्यक्ती
पुस्तकांतून विद्यार्थ्यांपर्यंत
देहू : आज जागतिक साक्षरता दिन. यानिमित्त मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पुण्यातील वाचनवेड संस्कृती आणि देहू येथील अभंग प्रतिष्ठानच्या वतीने संत साहित्य तसेच समाजसुधारक, शास्त्रज्ञ, थोर व्यक्तिमत्त्वे यांच्यावरील पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
जागतिक साक्षरता दिनानिमित्त मावळ तालुक्यातील सुमारे ३२ शाळांना या पुस्तकांचे वाटप केले गेले. गेल्या काही वर्षांपासून या दोन संस्था हे अक्षरदानाचे काम करत आहेत. आतापर्यंत तालुक्यातील २००हून अधिक शाळांना पुस्तके देण्यात आली आहेत.
या पुस्तक वाटपाच्या चळवळीतून प्रेरणा घेत मावळ भागाचे गट विकास अधिकारी सुधीर भागवत यांनी महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. प्रत्येक शाळेने किमान एक तास विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठी द्यावा, असे परिपत्रक काढणार असल्याचे भागवत यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर त्यांनी हा उपक्रम राबविल्याबद्दल वाचन वेड संस्कृती आणि अभंग प्रतिष्ठान या संस्थांचे आभार मानले आहेत.
या उपक्रमाबाबत बोलताना ‘वाचनवेड संस्कृती’चे संयोजक किरीटी मोरे म्हणाले, संत साहित्यासह अवांतर वाचनाचे संस्कार ग्रामीण, दुर्गम भागातील मुलांवर व्हावेत तसेच ‘व्हाट्स अप’ सारख्या समाज माध्यमांतून दिशाभूल करणारा मजकूर त्यांच्या वाचनात जाण्याऐवजी पुस्तकांमधील मूळ मजकूर त्यांनी वाचावा, यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे.
‘अभंग प्रतिष्ठान’चे विकास कंद म्हणाले, संत तुकाराम महाराज यांनी “शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन। शब्दे वाटू धन जन लोकां।।” असे म्हटले आहे. त्यांच्या या शब्दांना डोळ्यासमोर ठेऊनच आम्ही हे पुस्तकवाटपाचे काम हाती घेतले आहे. मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, हा उपक्रमामागचा आमचा उद्देश आहे.
या उपक्रमाबद्दल शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षक उमेश माळी यांनी या दोनही संस्थांचे आभार मानले आहेत.