विदर्भातील दुसरे प्रतिपंढरपूर अशी वर्धा जिल्ह्यातील घोराड या गावाची ओळख आहे. तेथील संत श्री केजाजी महाराज यांनी वारकरी विचारांचा प्रचार, प्रसार करणाचं मोठं कार्य केलं. त्यांचा आज पुण्यतिथी उत्सव साजरा होत आहे.
नागपूर जिल्ह्यातील बेला या गावात १८४३ मध्ये महाराजांचा जन्म झाला. आई चंपाबाई आणि वडील सखाबुवा भांदककर हे स्थलांतर करत घोराड येथे आले. त्यावेळी छोटे केजाजीदेखील सोबत होते. त्यांचे वडील जमीनदाराच्या शेतात काम करत असताना केजाजीदेखील मदतीला जात असत. विठूनामात तल्लीन होऊन ते काम करत राहत. इतके, की त्यांना भान राहत नसे. पुढे विठ्ठल भक्ती आणि वारी या माध्यमातून केजाजी महाराज यांचे संत रूप जगासमोर आले. नागपूरचे राजे रघुजीराजे भोसले हे नियमितपणे केजाजी महाराज यांच्या दर्शनाला येत असत, अशी नोंद आहे. या दोघांनी द्वारकेला जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. तेथे केजाजी महाराज यांच्या हस्ते श्रीकृष्णाला अभिषेक घालण्यात आला. रघोजीराजे भोसले आणि केजाजी महाराज यांचे ऋणानुबंध अखेरपर्यंत कायम होते.
केजाजी महाराज यांनी अनेक वर्षे पंढरपूर पायी वारी केली. त्यांच्यासोबत अनेक भक्तगण असत. संत केजाजी महाराज आणि संत गजानन महाराज हे समकालीन संत होते. संत गजानन महाराजांनी घोराडला भेट दिली, असे ग्रंथात नमूद आहे. १९०७ मध्ये ते आपले पुत्र नामदेव आणि काही भक्तांना घेऊन प्रयाग येथे गेले आणि तेथेच मकरसंक्रातीच्या दिवशी त्यांनी आपला देह ठेवला. प्रयाग येथे केजाजी महाराजांची समाधी आहे. केजाजी महाराज यांनी घोराड येथे विठ्ठलाचे भव्य मंदिर उभारले आहे. येथे केजाजी महाराज यांच्या उत्सवानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण, विष्णूसहस्रनाम, समाधी पूजन, भजन, कीर्तन असे कार्यक्रम आयोजित केले जातात. मंदिर संस्थानाने येथे भव्य भक्त निवास, सभामंडप बांधला आहे. शिवाय अत्यल्प रकमेत गोरगरिबांचे विवाह सोहळे आयोजित केले जातात. आषाढी, कार्तिकी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते, असे मंदिर संस्थानाचे अध्यक्ष बाबाराव तेलरांधे यांनी सांगितले.
केजाजी महाराजांनी २०० वर्षांपूर्वी सुरू केलेली पंढरपूर पायी वारीची परंपरा संस्थानातर्फे सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील केजाजी महाराजांचे भक्त नरेश महाराज पाटील यांनी ह. भ. प. बबन महाराज माहुरे यांच्या नेतृत्त्वात २००४ पासून आळंदीहून केजाजी महाराजांची पंढरपूरला जाणारी दिंडी सुरू केली आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे या वारीत खंड पडला आहे; परंतु वारकरी घोराड येथील मंदिराला तसेच पंचक्रोशी प्रदक्षिणा करून वारीचा नित्यनेम पूर्ण करतात.
लवकरच आपल्या सेवेत येत आहे –
www.dnyanbatukaram.com