वृक्षदाई प्रतिष्ठानतर्फे देहूत

पारिजातक वृक्षांची लागवड

देहू : भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिन अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आज (दि. १८ ऑगस्ट) देहूतील गोपाळपुरा येथील श्रीकृष्ण मंदिराच्या प्रांगणात वृक्षदाई प्रतिष्ठानाच्या वतीने प्राजक्ताच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

यावेळी रावेत येथील श्री गोविंद धाम, इस्कॉन मंदिराचे व्यवस्थापक प. पु. श्री. गोपती प्रभू, देहूतील श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. नितीन महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे विश्वस्त ह. भ. प. शिवाजी महाराज मोरे आदी उपस्थित होते.

यानिमित्ताने गोपती प्रभू म्हणाले, वृक्षदाई प्रतिष्ठानने पर्यावरण संवर्धनासाठी हाती घेतलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. प्रतिष्ठानतर्फे संत तुकोबारायांची तपोभूमी भंडारा डोंगरावर एक लाख वृक्ष लावण्यात आले आहेत. त्यांच्या या कार्यात आपण सहभागी होणे गरजेचे आहे. ‘इस्कॉन’तर्फे आम्ही या कार्याला सर्वतोपरी मदत करणार आहोत.

शिवाजी महाराज मोरे म्हणाले, संतांनी आपल्याला वृक्षसंवर्धन, पर्यावरण संवर्धनाचा संदेश आपल्या साहित्यातून देऊन ठेवला आहे. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,
जो खांडावया घाव घाली।
का लावणी ज्याने केली।
दोघा एकचि साऊली वृक्षु दे जैसा।।
अशा पद्धतीने मानवासाठी सर्व काही देणारे वृक्ष आपण जतन केले पाहिजेत.

देहूमधील तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन स्थान परिसराला गोपाळपुरा असे संबोधले जाते. तेथे भगवान श्री कृष्णाचे मंदिर आहे. या मंदिर परिसरात आज (दि. १८) कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते प्राजक्त अर्थात पारिजातकाचा वृक्ष लावण्यात आला.

यानिमित्ताने पारिजातक वृक्षाचे अध्यात्मिक महत्त्व सांगताना ह. भ. प. माणिक महाराज मोरे म्हणाले, एकदा श्री नारदमुनींनी भगवान श्रीकृष्णाला पारिजातकाची फुले भेट दिली. श्रीकृष्ण आपल्या कोणत्या पत्नीला ही फुले देतात, याची वाट पाहत राहिले. श्रीकृष्णाने ती फुले रुक्मिणीला देताच त्याबद्दल श्रीकृष्णाची दुसरी पत्नी सत्यभामेला सांगितली. त्यावर रुसून सत्यभामेने नारदाच्या सांगण्यावरून श्रीकृष्णाकडे फुलांऐवजी अख्ख्या झाडाचीच मागणी केली.

श्रीकृष्णाने स्वर्गात असलेला हे पारिजातकाचा वृक्ष सत्यभामेसाठी पृथ्वीवर आणला. मग रुक्मिणीलाही या फुलांचा मोह झाला. मग श्रीकृष्णाने हा वृक्ष सत्यभामेच्या दारात असा लावला की, त्याची फुले रुक्मिणीच्या अंगणात पडतील. अशा प्रकारे सत्यभामेने मागितलेले प्राजक्ताचा वृक्ष मागितला, तिला तो मिळाला. रुक्मिणीला प्राजक्ताची फुले हवी होती, ती तिला मिळाली.

या कार्यक्रमाला देहूकर आणि भाविकांनी हजेरी लावली होती. ‘तुकाराम तुकाराम’च्या गजरात वृक्षलागवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *